Monday, April 25, 2011

चिनी चहा


शांघायमध्ये नुकताच "शांघाय आंतरराष्ट्रीय संस्कृती परिषद' या संस्थेच्या वतीने "चिनी चहापान समारंभ' आयोजित केला होता. भारतातर्फे प्रतिनिधी म्हणून मला तिथे जाण्याची संधी मिळाली. चिनी चहा संस्कृतीची, इतिहासाची परदेशी प्रतिनिधींना ओळख करून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

दोन-अडीच तासांच्या या कार्यक्रमात चिनी चहाचा इतिहास, त्याचे सांस्कृतिक महत्व, चहाचे विविध प्रकार याविषयी तज्ज्ञांकडून माहिती मिळाली. विविध प्रकारच्या चहाच्या चवीही अनुभवण्यास मिळाल्या. जगभरातील चहा संस्कृतींचा जनक असणाऱ्या या देशातील चहाची महती ऐकून, अनुभवून मी थक्क झाले. चहापानामुळे मेंदूला उत्तेजना मिळाली, म्हणून अधिक माहिती मिळविली आणि हे "चिनी चहाख्यान' जन्मास आले.

चिनी चहा संस्कृतीला चार हजार वर्षांपेक्षा जास्त काळाचा इतिहास आहे. प्राचीन काळी, हान राजवटीमध्ये चहाच्या पानांचा वापर, एका औषधी वनस्पतीपुरताच मर्यादित होता. कागदोपत्री असा चहाचा उल्लेख साधारण 1200 वर्षांपूर्वी थांग राजवटीच्या काळात सापडतो. यात काळात चहा या विषयावर एका अभिजात ग्रंथाची निर्मिती झाली. संशोधन करून लिहिलेल्या या ग्रंथात चहाविषयी इत्थंभूत माहिती आढळते.

चहाचा वापर नंतर पाकक्रियांमध्येही सुरू झाला आणि शेवटी त्याने दैनंदिन जीवनात महत्वाचे स्थान पटकाविले. असे म्हणतात, की बौद्ध भिख्खूंनी रोजच्या वापरात चहा आणला. चहा पिण्याबरोबरच ज्या पद्धतीने तो तयार व सादर केला जातो, तसंच कडुसर चवीतून तत्त्वज्ञान सांगणे हासुद्धा त्यांचा उद्देश होताच. निसर्गप्राप्ती कृतज्ञता आणि जीवनातील अनित्यता त्या दोन मूल्यांचा प्रसार करण्यासाठी बौद्ध भिख्खूंनी चिनी चहाचा माध्यम म्हणून उपयोग केला. बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबरच चहाचाही प्रसार मोठ्या प्रमाणावर होत गेला. चीनमधून ही संस्कृती जपानमध्ये गेली. बौद्ध धर्माचा प्रसार भारतातून चीन व जपानमध्ये झाला, तर चीनमधून चहा संस्कृती जपान व भारतात आली. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाण-घेवाणीच्या इतिहास किती प्राचीन आहे याची यावरून कल्पना येऊ शकते.

थांग राजवटीनंतर आलेल्या सुंग राजवटीत चहा तयार करणे ही एक कला आहे, असा दृष्टीकोन विकसित झाला. त्यानंतर आलेल्या मिंग राजवटीत चहाचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास झाला. चहाच्या पानांचे विविध प्रकार, त्या पानांवर प्रक्रिया करणे, या गोष्टींचा शोध लागला. या संपूर्ण अभ्यासाला लोककलेद्वारे सादरीकरणाचा भाग जोडला गेला. चहाच्या दुकानाला चिनी भाषेत "छा दियान' म्हणतात. अशी दुकाने मनोरंजनाची केंद्रे बनली. आजही सच्युआन (शेजवान) प्रांतात अशी ठिकाणे आहेत. डच, पोर्तुगीज आणि अरब व्यापाऱ्यांमार्फत सन 1600 च्या आसपास चहा चीनमधून युरोपात गेला.

चहाच्या जन्माच्या दोन आख्यायिका प्रसिद्ध आहेत. चीनचा सम्राट शन नुंग हा शेती, आयुर्वेदआणि वनस्पतीतज्ज्ञ आणि त्याचा पुरस्कर्ताही होता. आयुष्यमान वाढविण्यासाठी शेतजमीन कसा आणि पाणी उकळून प्या, या दोन मंत्रांचा त्याने प्रचार केला. शन नुंग एकदा शेतातील झाडाखाली बसून उकळलेले पाणी पीत होता. सहज त्याने पाण्यात पाहिले, तर त्यात झाडाची काही पाने पडलेली दिसली. ते पाणी प्यायल्यावर त्याला उत्साही, ताजेतवाने वाटले आणि चहा नामक पेयाचा उदय झाला. 

दुसरी एक गमतीदार आख्यायिका बौद्ध धर्माशी निगडीत आहे. बोधीधर्म नामक एक मूळचा तमिळ बौद्ध भिख्खू भारतातून धर्मप्रसारासाठी चीनमध्ये गेला होता. चीनमध्ये असताना सलग नऊ वर्षे एका मंदिरात त्याचे वास्तव्य होते. त्याने मंदिरातील एकाच भिंतीकडे पाहून ध्यानधारणा केली. सतत त्याच भिंतीकडे पाहिल्याने थकून त्याला झोप आली. जागा झाला तेव्हा त्याला स्वतःचीच घृणा वाटली. त्यामुळे त्याने स्वतःच्या डोळ्यांच्या पापण्या कापल्या आणि तिथेच जमिनीवर फेकल्या. आख्यायिकेनुसार, त्या जागी चहाचे झुडूप उगवले. बोधीधर्माने त्या झुडुपाच्या पानांची चव घेतली आणि अमृतदायी चवीमुळे तो सदैव ताजातवाना आणि जागा राहिला.

चिनी नववर्ष, महत्वाचे सण समारंभ, विवाह अशा कार्यक्रमात सर्व नातेवाईक-मित्रपरिवारासह चहापान करणे, हा त्या आनंद सोहळ्याचा अविभाज्य भाग असतो. सुट्यांच्या दिवशी, सणांच्या दिवशी हॉटेल्स, चहाची दुकाने खच्चून भरलेली असतात. इतर दिवशीही जेवताना साध्या पाण्याऐवजी चहाचे गरम पाणी घोट-घोट पीत ते आपल्या जेवणाचा आनंद द्विगुणित करतात. यांच्या सामाजिक-कौटुंबिक जीवनात चहाचे स्थान अगदी अमूल्यच.

चिनी भाषेत चहाला "छा' म्हटले जाते. आमच्यासाठी "गोंगपू चहापान समारंभ' आयोजित करण्यात आला होता. "गोंग' या शब्दाचा अर्थ मेहनत, कष्ट असा होतो. तर गोंगफूचा शब्दशः अर्थ म्हणजे मेहनतपूर्वक केलेला. या चहापान पद्धतीचा उगम चीनच्या दक्षिणपूर्वेला असणाऱ्या गुआंगतोंग किंवा फुजिआन प्रांतात झाला. हा चहा-पान समारंभ मुख्यत्वे मोठमोठ्या चहाच्या दुकानांकडून आयोजित केला जातो. त्यात प्रामुख्याने विविध प्रकारच्या चहांची ओळख करून देणे हा व्यावसायिक उद्देश असतो.

या चहापान समारंभाचेसुद्धा विविध प्रकार आहेत. हे तुलनेने अलीकडच्या कालात उदयास आलेले आहेत या समारंभाचे उद्देश त्यांच्या नावातच सापडतात.

अजून एक चहापान समारंभ म्हणजे "वू वो चहापान समारंभ' "वू' म्हणजे अहम्‌, गर्व आणि वो म्हणजे मी स्वतः, स्वतःबद्दल असणारा अहम्‌ बाजूला सारणे. या समारंभाचा उद्देश धन, ज्ञान, रुप, वर्ग आदी भेद बाजूला सारुन आपण सर्वजण समान आहोत ही भावना रुजविणे. निरंतर चहापन समारंभ किंवा "स शु छ हुई' हा तिसरा उल्लेखनीय प्रकार. "स' म्हणजे चार, "शु' म्हणजे "क्रम' चार ऋतुंचे एकापाठोपाठ निरंतर चक्र सुरू असते. त्यातून निसर्गातील सातत्य, लय, एकरुपता आदी समजून घेणे, असा काहीसा तत्त्वज्ञानाकडे झुकणारा "सशु ला हुई'चा मुख्य उद्देश. 

या चहापान समारंभाचे प्रात्यक्षिक दाखविणाऱ्या किंवा तो सादर करणाऱ्या बहुतांशी स्त्रियाच असतात. या प्रसंगी त्या त्यांचा लाल रंगाचा पारंपरिक वेष "छिपाओ' परिधान करतात. चहा तयार करणे आणि तो सादर करणे ही एक कला आहे. त्यामुळे सादरकर्तीच्या मानसिकतेपासून ते तिच्या कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टींचे नियम आहेत.

आम्हाला जिने हे प्रात्यक्षिक दाखविले ती ऐपिंग लिना ही 30 वर्षे वयाच्या आसपासची असावी. तिने लाल "छिपाओ' घातला होता आणि केसांचा अंबाडा बांधलेला होता. "छिपाओ'मुळे त्या अधिकच सुंदर दिसतात. ऐपिंगने चहाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, शास्त्रीय महत्त्व विषद केले. ती चहासाठी प्रसिद्ध असलेल्या फुजिआन प्रांतातली.

ऐपिंग समोर असणाऱ्या टेबलावर मध्यभागी एक जाळी सलेला सुबक पाट होता. साधारण दीड फूट लांबी आणि एक फूट रुंदी असणारा जाळीदार पाटाला, खाली जोडलेला ट्रे जोडला होता. पाटावरचे पाणी ट्रेमध्ये जमा होते. पाटावरच अत्यंत आकर्षक अशी पारदर्शक काचेची आणि चिनी मातीची 3-4 छोटी चहा करण्याची भांडी होती. या भांड्यांना "गायवान' असं म्हणतात. "गाय' म्हणजे झाकण आणि "वान' म्हणजे भांडे थोडक्‍यात, झाकण असणारे भांडे, चहाच्या प्रकारानुसार ही चहा बनविण्याची भांडीही वेगवेगळी असतात. त्या टेबलावरील एका पारदर्शक काचेच्या किटलीत मध्यभागी उभी अशी जाळीदार नळकांडी होती. ज्यातून चहाची पाने गाळली जातील. पाटाला लागूनच, रोपिंगच्या उजव्या हाताशी एक गरम पाण्याची किटली होती, तर त्यांच्या जरा पुढे पाटाच्या दुसऱ्या बाजूला एक लाकडी स्टॅंड होते. त्या स्टॅंडमध्ये 3-4 लांब आणि निमुळत्या आकाराचे लाकडी चमचे होते. त्यांचा वापर तिने चहाची सुकी पाने "गायवान'मध्ये टाकण्यासाठी केला.

रोपिंगच्या डाव्या हाताला, लाकडी पाटाच्या बाजूला लागूनच विविध प्रकारचे चहाचे डबे होते. त्यातच एक काचेचे आयताकृती छोटे भांडेही होतं. त्यात चहाची सुकी पाने होती. साधारणपणे, पाश्‍चात्य टी सेटमध्ये साखरेसाठी जे भांड असते, त्यासारखेच चिनीमातीचे, पण एका बाजूला त्यातून चहाची पाने सहज पडावीत अशी व्यवस्था होती.

ग्रीन टी हा चिनी चहांच्या अनेक प्रकारांपैकी एक. हिरवा चहा, पांढरा चहा, काळा चहा, ऊलोंग चहा, फुअर चहा, फुलांचा चहा, लौंगजिंग चहा, असे चहाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक चहाचे उगमस्थान, बनविण्याची पद्धती भिन्न अगदी कोणत्या चहासाठी किती तापमानापर्यंत पाणी गरम करायचे, कोणत्या ऋतूत कोणता चहा प्यायचा याचे नियम ठरलेले असतात.

सर्वसामान्य चिनी माणसाला, "शम्म श झुई हावद छा?' म्हणजे "सगळ्यात चांगला चहा कोणता?' तर त्यांचे उत्तर "लौंगजिंग छा' हेच असते. कारण माओ झेडॉंग पासून चौ एनलाय आणि दंग शाओपिंग नेत्यांची पहिली पसंती लौंगजिंग चहालाच होती.

(पूर्वप्रसिद्धी :- चिनी संस्कृतीतील चहापानाचे महत्त्व, ई-सकाळ, 25 एप्रिल, 2011.)