Translate

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

" छांग-शा " ( १९२५)

गेली जवळपास चार-पाच वर्षे मी चीन मध्ये राहते आहे. पूर्वी बेईजिंगला आता शांग-हाई मध्ये. चीनी भाषा शिकले आहे. आजूबाजूला पाहते आहे, वाचते आहे, अनुभवते आहे. त्यातून स्वाभाविकपणे प्रश्न पडतात. त्यांचा माझ्या परीने पाठलाग करते आहे. थोडेफार उलगडले आहे(असं वाटतंय), डोक्यातून laptop वर उतरले आहे ते इथे मांडण्याचा  प्रयत्न करणार आहे.  बघू किती जमतंय. कस जमतंय ते ! 

चीनचा एकेकाळचा सर्वेसर्वा म्हणजे चेअरमन माओ च्या सुप्रसिद्ध कवितेचा हा मराठी भावानुवाद.

" छांग-शा " ( १९२५)

शरद ऋतूतील थंडीत....

नारिंगी बेटाच्या एका टोकाशी,
एकटाच उभा असताना :

शियांग नदीचा प्रवाह उत्तरेकडे वाहतो आहे ...

मी पाहतो आहे,
हजारो पर्वतरांगा, लालिमा ल्यालेल्या....

जंगल, गडद गहिऱ्या रंगाने गच्च भरलेलं ;

बलाढ्य प्रवाह,
मर्गझी प्रकाश किरणांचा वर्षाव करणारा ,

शत नौकांची चढाओढ ...


गरुडाची उत्तुंग भरारी, अवकाश भेदणारी ,

उथळ पाण्यावर तरंगणारे मासे ;

हजारो जीव, बर्फाळ आकाशाखाली,

सगळे झगडत आहेत, स्वातंत्र्यासाठी.....

उगाचच, उदास अवस्थेत चिंतन करत असताना,

मुक्त, निळ्याभोर आकाशाला मी विचारले;
प्रारब्धातील चढ-उतार कुणाच्या हातात आहेत?

एकदा मी आलो होतो इथे,
शेकडो सहकाऱ्यांसह....

अजूनही लख्ख आठवतात ते महिने आणि ती वर्षे,
अभिमानाने भरलेला उर.... 

शाळकरी मित्र होतो आम्ही, सळसळत्या रक्ताचे तरुण,
निर्मळ, प्रामाणिक, आमच्या आयुष्याच्या ऐन बहरात,
उतावीळ विध्यार्थी, उत्साह ओसंडून जाणारे,

धाडसीपणे सगळी बंधने आम्ही बाजूला सारली.

चीनसाठी,
त्याच्या पर्वतांसाठी, नद्यांसाठी .....

लोकांना आमच्या शब्दांनी प्रज्वलित केलं ,

आणि,

उच्च पदस्थांना कस्पटासमान लेखलं ,

तुम्हाला अजून आठवतंय का?:

कसं,
प्रवाहाच्या भर मध्यातून जाताना,
वल्ह्यांनी पाणी कापलेलं,

आणि
त्या लाटा तरीही तशाच ....आपल्या नौकांचा मारा सहन करूनही ?

तृप्ती ,
२३ नोव्हेंबर, २०११

थोडक्यात कवितेची पार्श्वभूमी :-

छांगशा हे चीनच्या दक्षिणेकडील हुनान प्रांताच्या राजधानीचे शहर. माओ हा मुळचा 'हुनान' चाच. त्याच्या जन्मगावापासून १०० किमी वर असणाऱ्या छांगशा शहरात त्याचे शिक्षण झाले आणि काही काल तो तिथेच शिक्षक म्हणून कामही करत होता. ह्याच शहरातील एका बेटावर हि कविता माओला स्फुरली म्हणून कवितेचे नाव "छांगशा ".

१९२५ सालच्या हिवाळ्यात हि कविता लिहिली गेली. तेव्हा माओ ३२ वर्षांचे होते. असं म्हणतात कि तेव्हा माओने केस बरेच वाढवले होते किंवा वाढले होते. (?)


१९२१ साली चायनीज कम्युनिस्ट पार्टीचा जन्म झाला आणि त्याचे पहिले अधिवेशन शांगहायच्या दक्षिणेकडील एका सरोवरातील बोटीवर भरले होते. याचा संदर्भ ह्या कवितेत सापडतो. १९२१ नंतर कम्युनिस्ट पार्टीच्या चळवळी सर्वत्र वेगाने पसरू लागल्या होत्या. १९२५ साली जपान, अमेरिकन आणि ब्रिटीश भांडवलशहा,साम्राज्यावाद्याविरुद्ध, कामगार,शेतकऱ्यांच्या क्रांतीकारी चळवळी ऐन भरात होत्या. त्याला वचक म्हणून भांडवलशहा,साम्राज्यावाद्यानी दडपशाहीचा वापर करून जबर प्रत्तुतर दिले होते. कामगारांनीही दीर्घकाळ संप करून तोडीस तोड असे उत्तर दिले होते. या पार्श्वभूमीवर, माओ शांगहाई हून हुनान ला शेतकरी चळवळींना गती मिळावी म्हणून परत आला होता. तेव्हा त्याच्याविरुद्ध "जहालवादी" म्हणून अटकेचे warrant निघाले.आपली पत्नी आणि दोन मुलांना तिथेच ठेऊन त्याने छान्ग्षा सोडले.

असं म्हणतात,कि, तत्पूर्वी, त्याने निसर्गरम्य छ्युज बेटाला(शब्दशः अनुवाद, छ्युज म्हणजे संत्रबेट. कारण इथे संत्र्याची पुष्कळ झाडे आहेत) भेट दिली होती. तेव्हाची त्याची मनोवस्था ' छांगशा ' मधून दिसून येते.