Translate

मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

खेळण

(Marathi translation of Ravindranath Tagore's poem Playthings)

मुला, तू कसला सुखी आहेस,
धुळीत बसलास ,
सकाळ पासून त्या मोडक्या फांदीशी खेळतोस.

तुझा तो छोट्या,
मोडक्या फांदी बरोबरचा खेळ पाहून,
मी तुझ्या खेळाला हसतो.

गेले काही तास,
मी आकड्यांच्या बेरजा करतोय, 

मी माझ्या हिशोबात व्यग्र, 
कदाचित तू माझ्याकडे पाहून,
विचार केला असशील, 

" सगळी सकाळ वाया घालवण्याचा काय हा वेडगळ खेळ !"

मुला,
काडया आणि मातीच्या ढेकळन बरोबर,
तल्लीन होऊन जायची कला,
मी विसरून गेलोय रे.

मी, महागडी खेळणी धुंडाळत बसतो आणि,
सोन्या-चांदीची गठडी जमा करतो.

तू, तुला जे काही सापडेल त्याशी,
मजेत खेळत बसतोस,

मी, मात्र माझा वेळ आणि शक्ती,
अशा गोष्टीत घालवतो,
ज्या मला कधीच मिळणार नाहीत. 

माझ्या दुबळ्या नावेत मी धडपडतो,
हव्यासांचा समुद्र पार करण्यासाठी,

आणि विसरतोकी,
मी सुद्धा एक खेळच खेळतोय.

रवींद्रनाथ टागोर, 
"चंद्राची कोर "
अनुवाद:-तृप्ती 

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

रवींद्रनाथ टागोर - चीनी नजरेतून

( पूर्वप्रसिद्धी :- रवींद्रनाथ टागोर - चीनी नजरेतून,  ई-सकाळ, 6 डिसेंबर 2011.  )
शांघायमध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या "बिसर्जोन ऊर्फ विसर्जन" नाटकाचा चीनी भाषेतला प्रयोग पहिला. एका शब्दात सांगायचे तर "अप्रतिम'! भारतात न पाहिलेले "बिसर्जोन' शांघाय मध्ये पाहायला मिळाले. चीनी भाषेतून, चीनी कलाकारांनी, भारतीय कलाकाराला दिलेली सलामी!

तरुण चिनी कलाकारांनी बसार्जोन सुंदरच वठवले होते. कथानक, विविध पात्रांच्या भूमिका त्यांनी जिवंत केल्या होत्या. चिनी जिभेच्या वळणातून आलेली, कथेतील पात्रांची भारतीय नावे; अपर्णा, जयसिंग, रघुपती, गोविंदा, गुणवती इत्यादी, कानाला फारच गोड वाटत होती. शिवाय, चिनी कलाकारांना राजा, राणी, पुजारी यांना भारतीय वेशभूषेत पाहणे हा छान अनुभव होता. रंगमंचाच्या बाजूच्या स्क्रीनवर, नाटकात काय सुरू आहे याचा अंदाज येईल इतपत इंग्रजी समालोचनाची व्यवस्थाही. चिनी न समजणाऱ्यासाठी केलेली होती. नाही म्हणायला, खटकले ते, नाटकात उगाचच घातलेली सध्याची बॉलिवूडमधील गाणी! ती मात्र भूतकाळातून एकदम जमिनीवर आणून आपटत असल्यासारखी वाटली. बाकी, त्यांच्या अभिनयावरून स्पष्ट होत की, नाटकाचा आशय त्यांना नक्कीच समजलाय. बिसार्जोनमधून टागोरांना जे सांगायचे होते ते त्यांच्यापर्यंत पोचले होते. 

शांघायमध्ये आल्याआल्याच, वर्षापूर्वी, "टागोर' भेटले. शांघायमधील प्रसिद्ध "ओरिएंटल पर्ल टॉवर'च्या पायथ्याशी भूमिगत संग्रहालयात! या संग्रहालयात शांघायचा इतिहास, मानवी मेणाचे पुतळे, तत्कालीन वस्तू, वातावरण इत्यादीद्वारे फार सुंदर दाखवला आहे. त्यात, "शांघायमधील परदेशी' या मथळ्याखाली, हुबेहूब टागोरांसारखा, (जरी तिथे टागोरांचे नाव नसले तरी) खुर्चीवर बसून चर्चा करत असलेला एक मेणाचा पुतळा पाहिला. पण नंतर टागोर भेटले ते नावानिशीच, पुराव्यानिशी! शांघायमधील यान-आन महामार्गालगतच्या एका छोटेखानी वस्तीतील नामफलकावर. इथे टागोर राहिले होते म्हणून! 

रवींद्रनाथ टागोरांच्या "गीतांजली'ला नोबेल पारितोषिक मिळाल्यावर दोन वर्षांतच या काव्याचा चीनी अनुवाद प्रसिद्ध झाला. "कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना'चे एक संस्थापक सदस्य, छन दुश्‍यु यांनी हा अनुवाद केला होता. यामागे प्रथमच कोणीतरी आशियायी लेखकाला नोबेल पारितोषिक मिळाले याबद्दलची उत्सुकता व आनंद होता. नोबेल मिळाल्यानंतर टागोरांना बऱ्याच देशांतून भेटीची निमंत्रण येत होती. चीनमधून व्याख्यानासाठी निमंत्रण आले. चीनला जाणाऱ्या बोटीवर बसण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना टागोर म्हणतात, ""मला जेव्हा हे निमंत्रण मिळाले तेव्हा वाटलं की, हे भारतालाच मिळालेले निमंत्रण आहे. या निमंत्रणाचा भारताचा एक विनम्र पुत्र म्हणून स्वीकार केला पाहिजे. मी अशी अशा व्यक्त करतो की, माझी ही भेट या दोन सभ्यतांमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दुवा पुन्हा साधेल. आपणही विद्वान लोकांना आमंत्रणे दिली पाहिजेत आणि विचाराचे आदान-प्रदान व्हायला पाहिजे. जर मी हे करू शकलो तर मला समाधान वाटेल.'' 

खऱ्या अर्थी चीन नामक, पूर्वेकडील शेजारी देशाला, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरचा प्रथम पदस्पर्श झाला तो 12 एप्रिल 1924 रोजी! टागोर तेव्हा 63 वर्षांचे होते. या भेटीत जवळपास दोन महिने त्यांचा चीनमध्ये मुक्काम होता. या वास्तव्यात त्यांनी बीजिंग, शांघाय, हांग चौ, नानजिंग इत्यादी प्रमुख शहरांना भेटी दिल्या. चीनमध्ये राजकीय परिवर्तनाच्या, अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट होत होती. एका बाजूला, 1920 साली टागोरांनी लिहिलेल्या एका लेखात, ब्रिटिश भारतात पिकणाऱ्या आणि चीनमध्ये पोचणाऱ्या अफूच्या धंद्याला "चिनी लोकांना मारण्याचा व्यापार,' असं म्हटलं होतं. याशिवाय, "गीतांजली'च्या माध्यमातून टागोरांचा एक सकारात्मक प्रभाव चिनी विचारवंतांवर होताच. तर दुसऱ्या बाजूला, 1919-20ची चीनी विद्यार्थी चळवळ अजून चर्चेत होती. 

आधुनिकता, विज्ञान, पाश्‍चात्य तेच उत्तम अशा नव-विचारांनी ती पिढी भारावलेली होती. 1921मध्ये "कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना'ची स्थापना झाली होती. चीनच्या इतिहासातील तो काळ म्हणजे पूर्व विरुद्ध पश्‍चिम, आधुनिकता विरुद्ध परंपरा अशा चर्चांनी गाजत असलेला होता. तथाकथित आधुनिक विचार करणारे पश्‍चिमेच्या अनुकरणाने झपाटले होते. त्यांना टागोर हे एकसंध आशिया, आपली पूर्वेकडील पारंपरिक संस्कृती, मूल्ये, परंपरा याबद्दल बोलणारे परंपरावादी वाटले. ज्याची कीर्ती त्याच्या आगमनापूर्वीच पसरली आहे, असा हा कवी लोकांना विचलित तर करणार नाही ना अशी भीती त्यांना होती. अशा "नव-विचारवंतांना' टागोर हा, पायघोळ अंगरखा, वाढलेली दाढी अशा वेशातील कुणी परंपरावादी आध्यात्मिक गुरू वाटला. या कारणांमुळे, गुरुदेवांच्या चीन भेटी दरम्यान टीकेची एक लाटही उठली होती.थोडक्‍यात, त्यांचे स्वागत संमिश्र स्वरूपाचे होते. 

टागोरांच्या पूर्वेकडील प्रवासावर माहितीपट करणाऱ्या बिवाश मुखर्जीच्या मते, 1920मध्ये राष्ट्रवाद, देशभक्ती यांनी पेटलेल्यांना एकसंध आशिया, ही टागोरांची कल्पना तेव्हा समजू शकली नाही, अजूनही समजत नाही. इतिहास सांगतो, भारतातही काही वेगळी परिस्थिती नव्हती. शांग-हायमध्ये असताना, श्‍यु च मो या त्यांच्या कवीमित्राच्या घरात टागोरांचा मुक्काम होता. (आज ते घर अस्तित्वात नाही. उड्डाणपुलाचा मार्ग सुकर करण्यासाठी ते पाडण्यात आलंय.) प्रसिद्ध चीनी साहित्यिक गो मोरोआ, हु शे आणि श्‍यु च मो यांनी युरोप-अमेरिकेत शिक्षण घेत असतानाच, टागोरांच्या साहित्याचा इंग्रजी अनुवाद वाचला होता. श्‍यु च मो 1923मध्ये केंब्रिजमध्ये शिकत असताना इंग्लंडमध्ये टागोर साहित्य विश्वातील प्रस्थापित नाव झाल होत्‌. शेली, किट्‌स या इंग्रजी कवींचा भक्त श्‍यु च मो, टागोरांच्या प्रेमात पडला. श्‍यु च मो आणि गुरुदेव यांची मैत्री हा भारत-चीन साहित्य इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय मानला जातो. वास्तविक पाहता, टागोर हे श्‍यु च मोपेक्षा 27 वर्षांनी मोठे होते. पण वयाची अडचण त्यांच्या या मैत्रीत आली नाही. 'श्‍यु च मो माझा मुलगा आणि त्याची पत्नी लु ही माझी सून,' अशी ओळख ते आपल्या पाहुण्यांना करून देत. हेच श्‍यु च मो, टागोरांच्या चीन वास्तव्यात अनुवादाची भूमिकाही बजावत होते. टागोर नावाच्या जवळ जाणारा चीनी शब्दोच्चार म्हणून, त्यांना " थाय गअर' असं चीनी नावही तेव्हा देण्यात आले. 

आपल्या शांग-हाय मधील प्रथम भाषणात टागोर म्हणतात, "मी म्हणेन की, अस्पष्ट आवाजांना साद घालणे, अपूर्ण स्वप्नामध्ये विश्वास जागा करणे आणि संभ्रमात असणाऱ्या जगाला आशेचा किरण दाखविणे, कळी उमलणार असल्याची सुवार्ता पोचविणे, हे कवीचे कार्य आहे. (चीनमधील भाषणे, 1924). 

आश्‍चर्य म्हणजे, टागोरांच्या चीन भेटीदरम्यान विविध वर्तमानपत्रात, मासिकात आलेले लेख सहजासहजी सापडत नाहीत. त्यापैकी काही लेख संभवता नष्ट केले गेले तर काही हरवले आहेत. टागोरांनी चीनमध्ये दिलेल्या भाषणाचीही तीच परिस्थिती. काही संस्कारित केली गेली तर काहींमध्ये विपर्यास आहे. काही भाषणे विश्व-भारतीच्या वार्तापत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी बहुतांश सगळी "टागोर्स टॉक इन चायना'मध्ये प्रसिद्ध झालेली होती. पण, काही अज्ञात कारणास्तव, टागोरांनी ह्या पुस्तकाच्या वितरणावर बंदी आणली. पुढील वर्षी त्यांनी या पुस्तकाची नवीन आवृत्ती काढली ज्यात लक्षणीयरीत्या दुरुस्त्या केलेल्या होत्या. भूतकाळाच्या या उदरात काय-काय दडलंय हे शोधणे हे कधी-कधी खरेच जिकिरीचे, दुरापास्त असते. भविष्य बदलण्याची ताकद असणाऱ्या व्यक्तींच्या निर्णयामागे, विशेषतः, जे निर्णय देश, व्यक्ती, घटना, भविष्य बदलू शकतात, त्यामागची कारण शोधणे, हे मानवी मनासारखंच अगम्य वाटते. 


"टागोर्स टॉक इन चायना' हे टागोरांच्या महत्त्वाच्या काही लेखनापैकी एक. तरीही त्याच्याकडे हवे तसे लक्ष ना बंगाल मधल्या विद्वानांनी दिले ना भारत-चीन संबंधांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी. एक गोष्ट अत्यंत नोंद घेण्यासारखी आहे, ती म्हणजे टागोरांचे इतके साहित्य चीनी भाषेत अनुवादित झाले तरी, त्या भाषणांचा चिनी अनुवाद मात्र झालेला नाही, असे "भारतीय साहित्याचा इतिहास"चे लेखक, शिशिर कुमार दास नमूद करतात. 

भारत आणि चीनमधील सांस्कृतिक, वैचारिक देवाणघेवाण करणारे हे आधुनिक भारतातील राजदूत 1924 नंतर पाच वर्षांनी पुन्हा 1929 मार्च मध्ये जपान आणि अमेरिका भेटीवर जाताना शांग-हाय मध्ये येऊन गेले होते.

त्यांची तिसरी आणि अखेरची भेट झाली ती जून 1929 मध्ये. पहिल्या भेटीच्या तुलनेने नंतरच्या या भेटी प्रसिद्धीच्या झोतापासून जरा दूरच होत्या. या तिन्ही भेटीदरम्यान आणि नंतरही भारत आणि चीन ह्या दोन महान सभ्यतांमधील परस्पर संवादाची गरज त्यांनी व्यक्त केली होती. 1937 मध्ये विश्वभारतीमध्ये स्थापन झालेले "चीना भवन' हे या भेटीचे मूर्त रूप. या दोन्ही संस्कृतीमधील मूलभूत संकल्पना एकच आहे. आपण म्हणतो, "वसुधैव कुटुंबकम" तर चीनी म्हणतात, "श ज्ये दा थोंग", भाषा भिन्न तरी अर्थ, भाव एकच. पुढे 1937 साली जपान्यांनी चीनवर केलेल्या आक्रमणानंतर त्यांनी आपल्या चिनी मित्राजवळ काळजी, नाराजी व्यक्त केली होती, अशीही नोंद सापडते. 


चीन लोकप्रजासत्ताक स्थापनेनंतर 1950च्या दशकात, मोठ्या प्रमाणावर टागोरांचे साहित्य लोकवाचनात होते. पुढे चीनच्या इतिहासातील महत्त्वाचे पर्व असणाऱ्या, 1966-76 या सांस्कृतिक क्रांतीच्या काळातही भूमिगतरित्या, चोरून काही मोजक्‍याच परदेशी लेखकांचे साहित्य वाचले जात होते. टागोर, त्यापैकी एक, असं चित्रलेखा बसू यांना दिलेल्या मुलाखतीत, प्रसिद्ध लेखक आणि शांग-हाय रायटर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष चाव लीहोंग म्हणतात. चाव आपल्या लेखनावर असलेला टागोरांचा ठसा उघडपणे कबूल करतात. 1979 मध्ये पुन्हा एकदा चीनी लोकांचे लक्ष टागोरांकडे गेले. एकूण 20 खंड म्हणजे एक कोटी शब्द एवढ्या मोठ्या प्रमाणावर, टागोर अनुवादाचे काम तेव्हा सुरू झाले. निमित्त होते," चिमुकल्या पाखरा, तू कुठे निघालास,' या अर्थाचा चाव यांचा एक लेख. ज्यात त्यांच्या पिढीतील चीनी कवीवर असलेला टागोरांचा प्रभाव मांडला आहे. 

आणि आता टागोरांची 150वी जयंती!


सध्याचे चीनमधील राजकीय नेतृत्वही टागोरांचे महत्त्व कबूल करते. 2010 मध्ये चीनी पंतप्रधान वन ज्याबाव भारत भेटीवर आले असता दिल्लीमधील टागोर इंटरनॅशनल स्कूलला त्यांनी भेट दिली. त्या भेटीदरम्यान टागोरांविषयी एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, ""चीनमधील महान साहित्यिकांवर टागोरांचा मोठा प्रभाव होता. तेव्हा रवींद्रनाथ टागोर हे नाव घरोघरी पोचले होते.'' 

आज ब्लॉगवर तरुण पिढी आपल्या व्हॅलेंटाइन डेच्या संदेशात टागोरांच्या कविता उद्‌धृत करताहेत. इतर अनेक पर्याय उपलब्ध असतानाही तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर टागोरांचे साहित्य वाचत आहे. बीजिंग विद्यापीठातील भारत विषयक अभ्यासकेंद्रात पन्नासहून अधिक तज्ज्ञ टागोरांच्या साहित्यावर संशोधन, मार्गदर्शन करत आहेत. या केंद्राच्या उप-निदेशकांच्या मते, ""जागतिक सत्ताकेंद्र बदलाच्या आजच्या या काळात टागोरांचे विचार अतिशय महत्त्वाचे आहेत. पौरात्यमूल्ये, आदर्श यांचे टागोर हे प्रतीक होते. जेव्हा पाश्‍चात्य नेतृत्वाला आव्हान नव्हते, त्या काळी ते 'पूर्वेची आशा' होते.'' 


जगभरच सगळ्या भारतीय दूतावासातून 2010-11 हे वर्ष टागोर जयंती म्हणून साजरे केले जात आहे. चीनमध्ये या जयंती सोहळ्याचे विशेष अशासाठी की, हे भावी महासत्ता म्हणून कडवे प्रतिस्पर्धी असलेल्या, बहुसंख्यांच्या मते शत्रू म्हणून गणल्या जाणाऱ्या राष्ट्रांत सांस्कृतिक आदान-प्रदान होते आहे. टागोरांच्या साहित्याचे वाचन, चित्र-प्रदर्शन, परिषद , शालेय स्तरावरील आदान-प्रदान (टागोर इंटरनॅशनल स्कूल आणि शांग हायमधील जीन युआन सिनिअर हाय स्कूल ) इत्यादी विविध माध्यमातून टागोरांना परत एकदा जगभरातील लोकांपर्यंत पोचवले जात आहे. या जयंती सोहळ्याचा एक भाग म्हणून या वर्षी मेमध्ये जी शांघायमध्ये टागोरांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुतळा आहे टागोरांचे मित्र श्‍यु च मो याच्या घरालगत, शांगहायच्या मध्यवस्तीत! आणि नुकतंच मागच्या महिन्यात शांग-हाय रायटर्स असोसिएशन आणि भारतीय वाणिज्य दूतावासातर्फे टागोरांच्या कवितांचं वाचन झाले. चीनी, इंग्रजी, बंगाली आणि मराठीतही! टागोरांची "ओ दोखीन हवा' ही पुलंनी अनुवादित केलेली "अरे दक्षिणेच्या वाऱ्या, अरे वाटसरू वाऱ्या' ही कविता वाचण्याची संधी मला मिळाली. चीनी लेखकांनीही अगदी समरसून काव्यवाचन केले. सध्यातरी परत एकदा चीनी कला आणि साहित्य क्षेत्रात टागोरांच्या साहित्याची लाट आली आहे. हे निश्‍चित!



इथे टागोर भेटत आहेत ते चिनी नजरेतून. टागोरांकडे पाहण्याच्या माझ्या मराठी, भारतीय नजरेत आता ही चीनी नजरपण मिसळत आहे!

( पूर्वप्रसिद्धी :- रवींद्रनाथ टागोर - चीनी नजरेतून,  ई-सकाळ, 6 डिसेंबर 2011.  )