प्रतिसादाची साखळी

स्थळ:- होंग-छ्याव रोडवरील एक बस-थांबा, शांग-हाय. वेळ:- दुपारी साधारण १२.३० पात्रे:- आजी, आजोबा, २ छोटी नातवंडे आणि मी . पार्श्वभूमी:- दुपा...

Sunday, May 6, 2012

गोष्ट त्थीयान हानची ..

( पूर्वप्रसिद्धी :- ' पुढे चला ' सांगत राहणारा त्थीयान  हान !, "सप्तरंग " सकाळ, रविवार, 6 मे 2012.   )

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर : अनेक ओळखीपैकी एक ठसठशीत ओळख म्हणजे भारतीय राष्ट्रगीताचे निर्माते! 


आतापर्यंत अनेकदा चीनी राष्ट्रगीत ऐकले होते. भारीच! सुरुवातीला अर्थ काही कळला नाही पण दणदणीत वाटले. म्हणून जरा शोधाशोध केली आणि शोधता शोधता सापडला ... त्थीयान हान ! आणि त्याची जीवन कहाणी ! (नाव लिहिण्याच्या चिनी पद्धतीनुसार आडनाव प्रथम लिहिले जाते. त्याप्रमाणे त्थीयान हे आडनाव आहे तर हान हे त्या व्यक्तीचे नाव आहे. ) त्याच्याबद्धल वाचताना मनातल्या मनात उगाचच त्याची रवींद्रनाथ टागोरांशी तुलना होत होती. कारण बरीच साम्यस्थळ सापडत राहिली. पण फरक मात्र शेवटी कळला !

त्थीयान हान : चीनी कला आणि साहित्य विश्वातील एक खास व्यक्तिरेखा ! ह्याच्या नावापुढेहि अनेक विशेषणे आवश्यक आहेत. कारण आहेच तो तसा खास ! लेखक, नाटककार, आधुनिक चीनी संगीत नाटकांचा (Chinese Opera) संस्थापक आणि चीनी राष्ट्रगीताचा निर्माता !

हा त्थीयान, दक्षिण चीन मधील हुनान प्रांतातल्या, छान्ग्षा शहरातला. म्हणजे सछुआन (मराठीत आपण "शेजवान" म्हणतो) प्रांताच्या दक्षिण पूर्वेला.

माओ सुद्धा हुनान-करच ! ( हे हुनानकर जहाल तिखट खाणारे म्हणून चीन मध्ये प्रसिद्ध!) हुनान चा शब्दशः अर्थ होतो, सरोवराच्या दक्षिणेला. हु म्हणजे सरोवर आणि नान म्हणजे दक्षिण. चीनी प्रांतांची, शहरांची नावेही फार अभ्यासनीय आहेत. त्या नावांच्या अर्थातूनच कित्येकदा त्या प्रांत, शहराचे भौगोलिक स्थान, दिशा, महत्त्व समजते. 

तर ह्या त्थीयान हानची गोष्ट.. सुरु होते ती चीनमध्ये, १९१६ साली. तो १८ वर्षांचा असल्यापासून..... 

वयाच्या १८ व्या वर्षी तो इंग्रजी भाषा शिकण्यासाठी म्हणून हुनानहून जपानला गेला. पुढची ५--६ वर्षे तो जपानमध्येच राहिला. इंग्रजी भाषा शिकता शिकता त्थीयान इंग्रजी साहित्याच्या प्रेमातच पडला. आणि त्याने शेक्सपिअर चीनमध्ये आणला ! शेक्सपिअरच्या ह्याम्लेत चा सर्व प्रथम चिनी भाषेत अनुवाद त्थीयानने केला. चीनी लोकांना खऱ्या अर्थी इंग्रजी साहित्याची, संस्कृतीची, नाटकांची दारे त्याने उघडी करून दिली.

जपानमध्ये असताना, संवेदनशील त्थीयानच्या कानी मायदेशातील अस्वस्थ घडामोडी पडू लागल्या. तरुण रक्ताचा त्थीयान जपान मधील चीनी तरुणांच्या संघटनेचा सदस्य बनला. आणि ४ मे १९१९ च्या विध्यार्थ्यांच्या साम्राज्यवादविरोधी चळवळीत तोही सहभागी झाला. 

पुढे शिक्षण संपवून त्थीयान चीनला परत आला ते १९२१-२२ मध्ये. उपजत साहित्य, कलेची आवड आणि त्याला पाश्चात्त्य शिक्षणाची जोड असा संकर झाला. परिणामी, प्रसिद्ध चीनी लेखक गुओ मोरुओ , (Guo Moruo, ज्यांच्यावर रवींद्रनाथ टागोरांचा प्रभाव होता.) त्थीयान आणि इतर दोन मित्र यांनी "क्रीएशन सोसायटी" ची स्थापना केली. त्याचा उद्धेश होता, सृजनशील साहित्याला, कल्पकतेला प्रोत्साहन देणे. त्याच काळात त्याने व त्याच्या पत्नीने साउथ चायना नावाचे द्विसाप्ताहिक सुरु केले. या दाम्पत्याने साउथ चायना नाटक मंडळीची स्थापना केली. नाटकांचे स्क्रिप्ट लिहिणे ते सादरीकरण असा सगळा कारभार सांभाळला. त्याच्या सुरुवातीच्या काही नाटकांची कथानक कल्पनाविश्वात रमणारी, प्रणयरम्य अशी होती. Night at a Cafe (१९२२), आणि The Night When a Tiger Is Captured (१९२४) हि त्यापैकी काही गाजलेली नाटक.

त्यानंतर (१९२७) मध्ये शांग-हाय आर्ट युनिवर्सिटीच्या अध्यक्षपदावर तो निवडून आला. रंगभूमीवरील कलाकाराच्या हाल-अपेष्ठा दाखवणारे त्याचे "प्रसिद्ध कलाकाराचा मृत्यू" हे नाटक वास्तववादी परिस्थितीचे निदर्शक म्हणून बरेच गाजले. त्याच काळात त्याने "वसंत आगमनाचे गीत" अशा अर्थाच्या नावाच्या एका चित्रपटाची निर्मितीही केली. पुढे त्याच्याच प्रयत्नाने साउथ चायना नाटक कंपनी आणि साउथ चायनाआर्ट्स स्कूलचीही स्थापना झाली. ह्या नाटक कंपनीने शहरोशहरी फिरून आपल्या नाटकांचे प्रयोग सादर केले. त्थीयानच्या या उपक्रमामुळे चीनी रंगभूमी लोकांपर्यंत पोहोचली. रंगभूमीच्या विकासाला चालना मिळाली.

१९३० मध्ये त्याचे "स्वतःच स्वतःवर टीका" प्रसिद्ध झाले. यात त्थीयानने आपला कल्पनाविश्व ते वास्तववाद असा प्रवास मांडला होता. परिणामी, त्याची भरती डाव्या गटाच्या लेखकात झाली. त्याला साउथ चायना नाटक कंपनी बंद करावी लागली.

त्थीयानने अनेक टोपण नावे वापरूनही लेखन केले. आता त्याच्या नाटकातून राजकीय रंग उतरू लागले. वर्ग संघर्ष, संप असे विषय तो हाताळू लागला. वयाच्या ३४ व्या वर्षी, १९३२ मध्ये, त्याने कम्युनिस्ट पार्टीत प्रवेश केला. आणि डाव्या गटातील नाटककार आणि रंगभूमी संघाचा तो सचिव झाला. सुरुवातीच्या काळात कल्पना विश्वात रमणारा पुढे समाजप्रबोधन, क्रांतीच्या वाटेला लागला. 

१९३४-३५ साली,कुओ मीन तांगच्या सेनेने केलेल्या तुरुंग भरतीत त्थीयानचाही समावेश होता. त्याला शांग-हाय मध्ये अटक करण्यात आली. २-३ वर्षांनी त्थीयानची तुरुंगातून सुटका झाली. 

असं म्हणतात कि, इथे तुरुंगात असताना सिगारेटच्या पाकीतालील चंदेरी कागदावर "स्वयंसेवकांचे संचलन" हे काव्य, आजचे चीनी राष्ट्रगीत जन्मास आले ! 

चीनच्या इतिहासातील १९३७ ते १९४५ हा काल म्हणजे जपान विरुद्ध युद्धाचा. युद्ध काळात जनसामान्यांची मानसिकता घडवण्यासाठी त्थीयानने अनेक चीनी संगीत-नाटके शब्दबद्ध केली. नाटकाच्या माध्यमातून आपली राजकीय भूमिका मांडली. 

१९४९ : चीन प्रजासत्ताक स्थापना ! त्थीयानचे, "स्वयंसेवकांचे संचलन" हे काव्य राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले !

माओच्या या कार्यकाळात, बेईजिंग पारंपारिक संगीत-नाटक प्रायोगिक शाळेचे अध्यक्षपद त्याने भूषविले. त्याशिवाय रंगभूमी आणि कलेसंबंधी काही संस्थाचा तो पदाधिकारीहि होता. नाट्यलेखन सुरूच होते. त्या काळातील त्याच्या एका नाटकाचा इंग्रजी अनुवादही झाला आहे. १९६१ साली लिहिलेले "श्ये यावहुआन" हे ऐतिहासिक संगीत नाटक (बेईजिंग ओपेरा) म्हणजे त्याच्या लेखन कारकीर्दीच शिखर मानलं जात. आणि तेव्हाच त्थीयान हानची शोकांतिका सुरु होते.
ह्या नाटकाच्या माध्यमातून त्थीयान माओच्या धोरणांवर टीका करतोय असा आरोप सांस्कृतिक क्रांतीच्या काळात सूत्रधार असणाऱ्या "चांडाळ चौकडीने" (माओची तिसरी बायको आणि इतर तिघे) केला. १९६६ मध्ये त्थीयानला अटक करण्यात आली. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. अतोनात छळ सहन न झाल्याने वयाच्या ७० व्या वर्षी, १९६८ मध्ये तो मरण पावला. 

आणि चीनी कमाल म्हणजे त्याच्या मृत्युपश्चात ११ वर्षांनी, १९७९ साली, तत्कालीन चीनी सरकारने त्थीयानला पुनःरुउजीवीत केले. रिकामा "अस्थी कलश" साक्ष ठेऊन त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्याच्या "त्याच" ', "श्ये यावहुआन" च्या प्रयोगाचे चित्रपटात रूपांतरही करण्यात आले. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या "पीपल्स डेली" मध्ये "त्याच" "चांडाळ चौकडी" चा समाचार घेतला गेला !

ज्याने देशाचे राष्ट्रगीत लिहिलेय त्याचा अशा प्रकारे छळ करून मृत्यू अशी घटना नाही वाटत कि इतर कोणत्या देशाच्या इतिहासात घडली असेल म्हणून! 

पण वाटत रहात कि , "बुंद से गयी, वो हौद से नाही आती", असं जागृक चीनी, विचारवंत तेव्हा मनातल्या मनात तरी नक्कीच म्हटले असतील ना ! 
------------------------------------------------
त्थीयान हान रचित चीनी राष्ट्रगीत "स्वयंसेवकांचे संचलन"(March of the volunteers) त्याचा हा मराठी भावानुवाद...

मराठीतील "उठा राष्ट्रवीर हो....(१९६३)" हि कविता जर नुसती वाचली, तर त्यातले भाव हे ह्या "स्वयंसेवकांचे संचलन" सारखी वाटतात . हि दोन्ही काव्ये पद्य स्वरूपातच आहेत. रवींद्र भटांच्या ह्या काव्यातील भाव, शब्दसामर्थ्य आणि सुधीर फडक्यांच्या संगीतातला जोश, आवेशहि ह्या राष्ट्रगीतासारखाच वाटावा असा. 

" उठा ! गुलामी मान्य नसलेल्या लोकांनो !

आपल्या रक्त-मासाने आपण नवीन लांब भिंत (great -wall ) निर्माण करूयात !

चीन मधील जनता हि अत्यंत कठीण समयास सामोरे जात आहे .

प्रत्येकाने अखेरची डरकाळी फोडलीच पाहिजे .

उठा ! उठा ! उठा !

आपण दशलक्ष पण हृदयस्पंदन एकच ,

शत्रूच्या तोफ गोळ्यांना सामोरे जा, पुढे चला !

शत्रूच्या तोफ गोळ्यांना सामोरे जा, पुढे चला !

पुढे चला ! पुढे चला ! पुढे ! "

असं हे संपूर्ण राष्ट्रालाच कायम युद्धसज्ज ठेवणारे राष्ट्रगीत. हे राष्ट्रगीत आणि ह्या राष्ट्रगीतापूर्वीचे ध्वजारोहण जर पाहता आले तर अवश्य पाहावे असे ! जबरदस्त! आत्मविश्वासपूर्ण! महासत्तेची जणू ताकद दाखवणारं !

(youtube वर क्लीप आहे. लिंक,
http://www.youtube.com/watch?v=px6X_otbZI0&feature=related.

ते पाहिल्यावर त्या क्षणापुरता तरी मनातल्या मनात त्या कवीला, संगीतकारला salute ठोकावासा वाटतो.

तर लगेच दुसऱ्याक्षणी त्थीयान हानची शोकांतिका आठवते. आणि ह्या ह्या देशाला गूढ म्हणावे कि अजून काही वेगळे असा प्रश्न पडतो !
----------------------------------------------
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि त्थीयान हान !
वयाचा फरक पाहता त्थीयान हान गुरुदेवांच्या मुलासमान म्हणावा असा.....दोघात ३७ वर्षाचे अंतर ... .

गुरुदेव आणि त्थीयान हान ची भेट झाली होती का ? 
टागोर चीनमध्ये आले होते ते १९२४ मध्ये आणि मार्च १९२९ आणि जून १९२९ मध्ये. गुरुदेवांच्या चीन भेटीत त्थीयान हान त्यांना भेटला होता का ह्याबाद्धाल पुरावा असा काही सापडत नाही . परंतु १९२४ किंवा १९२९ मध्ये ते भेटले नसावेत असंही म्हणता येत नाही . मला वाटत कि एकूण त्थीयान हान चा पिंड पाहता त्याला टागोरांविषयी अपार उत्सुकता नक्कीच असणार. ते भेटले असल्याची दाट शक्यता आहे कारण नोबेलविजेता प्रथम आशियायी, भारतीय आपल्या देशात येतोय हि दुर्लभ संधी होती . 

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि त्थीयान हान दोघांमधील साम्यस्थळे ???
दोघेही जमीनदार कुलीन, घरंदाज कुटुंबात जन्मलेले...दोघेही संवेदनशील.....कवी मनाचे.....लेखक....नाटककार ... देशभक्त....राष्ट्रगीत निर्माते !!!

दोघातील फरक???
जन्मभूमीचा, कर्मभूमीचा ... त्यातील राजकीय व्यवस्थेतील मुल्यांचा ? ....फरक राज्यकर्त्यांच्या भावनिकतेचा, मानसिकतेचा ?????
 ---------------------------------------------------------
गुरुदेव...आम्हा भारतीयांच्या गुरुस्थानी ....आजही ज्यांच्या व्यक्तिमत्वाची मोहिनी आम्हाला भुरळ पाडते....

त्थीयान हान .......बळी चीनमधील ऐतिहासिक सांस्कृतिक क्रांतीचा... एक विस्मृतीतील चीनी नाव .

( पूर्वप्रसिद्धी :- ' पुढे चला ' सांगत राहणारा त्थीयान  हान !, "सप्तरंग " सकाळ, रविवार, 6 मे 2012.   )

http://www.esakal.com/esakal/20120506/5416914898391539521.htm

No comments: