Translate

शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

पिल्लू


( हे साधारण ६ वर्षांपूर्वी दिल्लीत असताना लिहिलेले आहे. परत दिल्लीत आल्यावर कबुतर अशीच घरात घुसू लागली आहेत. तेव्हा या लेखाची आठवण झाली म्हणून ...)

एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा. त्यावेळी घरात cooler ही नव्हता. दिल्लीत भासणारी cooler ची अत्यावश्यकता आता चांगलीच जाणवत होती. सुट्ट्यासाठी आणि दिल्ली पाहण्यासाठी म्हणून बहिण घरी आलेली होती. भयंकर उकाडा म्हणून रात्री  बाल्कनीत झोपायचे ठरले. बेड बाल्कनीत हलवला. त्यामुळे उन्हाळा सुसह्य झाला. जवळपास १० दिवस तो बेड बाल्कनीतच होता. नेहमीप्रमाणे कबुतरे येऊन जाऊन असायची. आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी ते routine होते.

१० दिवसांनतर बेड घरात घ्यायचे ठरले. तेव्हा बेडवर  पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा  छोटा TABLE TENNIS चा बॉल दिसला. क्षणार्धात उलगडा झाला, हा बॉल नसून पक्षाचे अंडे आहे. आता त्या अंड्याचे काय करायचे हा गहन प्रश्न होता. तात्पुरते ते तसच उचलून बाल्कनीत एका कोपऱ्यात ठेवले आणि आमचा बेड आत आणण्याचा कार्यक्रम सुरु झाला. बेड हलविला आणि त्याच्याखाली अर्धवट बांधलेल्या घरट्यात अजून २ अंडी दिसली.

मग सापडलेले ते अंडे घरट्यात त्या २ अंड्याबरोबर ठेवले. कबुतराची ती अंडी वाचवायची होती. मग त्यासाठी एक टीपॉय वापरायचे ठरले. एकदा दुपारी लक्षात आले की  घरट्यात दोनच अंडी आहेत. वाईट वाटले. आता उरलेली अंडी तरी वाचवायलाच हवी होती. कावळे टीपॉयच्या उघड्या बाजूतून आत जाऊ शकत होते. घरात एक मोठ्ठ पोत  होत. ते त्या टिपॉयवर घातले. अंडी पूर्णपणे सुरक्षित झाली.   किमान आता ही अंडी तरी कावले नेऊ शकणार नव्हते.

कबुतराच्या 'त्या' जोडीला पोत्याखाली येता -जाता यावे म्हणून पोते थोडे वर उचलून घेतले. त्या जोडीचे त्या अंड्यावर पूर्ण लक्ष होते. ते त्या  टीपॉयखाली कायम असत.

आता वेळ मिळेल तेव्हा त्या कबुतरांच,त्या अंड्यांच निरीक्षण करण्याचा छंदच जडला.

या सगळ्या प्रकाराला एव्हाना २५ दिवस झाले होते. त्या अंड्यातून पिल्ले बाहेर आलेली नव्हती. कधी-कधी वाटायचं खरच पिल्ले बाहेर  येतील का ?

आमच्या कामानिमित्त आम्हा दोघांनाही दिल्लीबाहेर जावं लागणार होतं. आता अंड्यांच काय होणार  ? त्यांच्याकडे लक्ष ठेवणे, निरीक्षण करणे अशक्य होते. आठवडाभर घर पूर्णपणे बंद होते. अधिक सुरक्षितता म्हणून बाल्कनी काड्या आणि प्लास्टिक मिश्रित (typical दिल्लीत मिळणाऱ्या ) पडद्यांनी बंदही करून घेतली.

आठवड्यानंतर निनाद दिल्लीत परत गेला. तेव्हा मी पुण्यात होते. निनादने फोनवरून बातमी दिली..... " कबुतराच्या अंड्यातून एक पिल्लू बाहेर आलंय". खूप आनंद झाला. दुसऱ्या अंड्याच काय झालं हे कळायला काही मार्गच नव्हता. पण किमान एक पिल्लू तरी जगले होते. निनादने तर त्याचा फोटो पण काढला.

त्यानंतर साधारण ४-५ दिवसांनी मी पण दिल्लीला परत गेले. पिल्लू पाहिले. मस्तच होते. प्रथम त्याच्या जवळ जायची भीती वाटली. खूपच छोटे होते ते. त्याचे आई-वडील, कबुतरे त्याच्या जवळपासच असत. पिल्लाचे डोळे काळे होते. पायही काळपट होते. डोक्यावरील केसांचा रंग पोत्याच्या दोऱ्याच्या रंगासारखा  होता. इतर कबुतरांप्रमाणे (किमान त्याच्या आई-वडिलांप्रमाणे) त्याचे डोळे लालसर नव्हते, ना पायही गुलाबी होते. मानेवरही चमकदार गुलाबी-हिरव्या रंगाची छटा नव्हती. पिल्लूच होत ते वाढीच्या मार्गावरच. जरासा आवाज झाला कि घाबरून बसणार !


(फोटो सौजन्य :- इंटरनेट )

नंतरच्या आठ दिवसात ते छान चालू लागलं. बाल्कनीतल्या बाल्कनीत ते फिरत असायचे. त्याची आई त्याला चोचीतून भरवायची. त्याच्या डोक्यावरच्या केसातून चोचीने काहीतरी करायची. कदाचित साफ करत असेल.

काही दिवसांनी  तो टीपॉय हलवायचे ठरवले. आता त्याची गरज नव्हती. उबेसाठी म्हणून पोत मात्र तसच ठेवल . आता पिल्लावर नजर ठेवण  सोप होत. टीपॉय काढला. सुरवातीला पिल्लू घाबरले. पण काही काळच !
आता आम्हाला एकमेकांची सवय झाल्याने दोघांचेही माझे आणि पिल्लाचे एकमेकांना घाबरणे कमी झाले.

एव्हाना पिल्लू उडायला शिकले होते. म्हणजे फरशीवरून टीपॉय च्या कप्प्यापर्यंतच. त्यानंतर ४-५ दिवसात ते 
 टीपॉयवरही बसू लागले. नंतर कपडे वाळवायच्या दोऱ्यांवर आणि त्यानंतर बाल्कनीच्या कठड्यावरही . हे सगळ पाहताना खूप मजा येत होती.   आश्चर्य मिश्रित  कौतुक वाटत होते. जोनाथन सीगल ची गोष्ट आठवायची- विशेषत पिल्लाच्या वाढीचे नवनवीन टप्पे पाहताना. 

अधूनमधून ते पिल्लू पाय लांब करून आळस सोडत असे. पंख वर करून बसत असे. रात्री तर अंगाचे मुटकूळ करून शांत झोपायचे. 

त्या पिल्लाला आता थोडे उडता येत होते. आणि तो टीपॉय काढल्यावरच ते उडण्याचा  प्रयत्न करू लागले. किमान मला तरी तसे वाटत होते. म्हणून २-३ दिवसांनी पोते आणि घरटेही उचलले. कारण पिल्लू बर्यापैकी मोठे झाले होते. त्याला त्यांची फारशी गरज नव्हती. अर्थात हेही माझ मत. खर तर त्या घाणीला आता मी कंटाळले होते. :-)

परवा आणि कालही सकाळी उठून पहिले. पिल्लू बाल्कनी आणि घरातही कुठे दिसले नाही. मग काही वेळाने ते बाल्कनीत दिसले. लागोपाठ २-३ दिवस असेच घडले. आता कळलंय की ते पिल्लू साधारण १ फुट एवढे अंतर  उडू शकते. म्हणून ते बाल्कनीतून उडते. खिडकीच्या कठड्या पर्यंत चालत जाउन पलीकडच्या मोकळ्या  स्ल्याबवर जाऊन बसते.  

एव्हाना पिल्लाची बरीच प्रगती झाली होती. म्हणजे त्याला बाल्कनी बाहेरचे जगही कळायला लागले होते. 

परवा पाउस झाल्यावर पोत्याखाली दडले होते. म्हणजे एक पाउसही अनुभवला तर ! 

मग ठरवले आता खूप झाले. त्या पिल्लाचे अजून लाड नाही करायचे. अजून किती दिवस त्याची काळजी करणार? आता त्याला "जग" कळू देत. स्वतच स्वतःच संरक्षण करू देत. पिल्लाला अंड्यातून बाहेर येऊन जेमतेम १५-२० दिवस झालेत. पण त्यापूर्वीपासून म्हणजे दीड - दोन महिन्यांपासून त्याची शक्य तेवढी काळजी घेतली आहे. 

हा सगळा विचार करून त्या पिल्लाला थोडे घाबरवले. त्यात स्वार्थ तर होताच. पण कबुतराच्या पिल्लाने आता स्वतःचे संरक्षण करावे असाही विचार होताच. 

ते आता असच परत एकदा  बाल्कनीतून उडल्यावर बाल्कनी पडद्यांनी बंद करून घेतली आहे. पण ते पिल्लू खिडकीच्या बाहेर कठड्यांवर बसून आहे. खिडकीच्या काचेतून बघतय माझ्याकडे. त्याला काय माहिती की मी त्याच्यावरच लिहिते आहे म्हणून !  

(पूर्व प्रसिद्धी :- "सकाळ", २४  जून, २००६.)

२ टिप्पण्या:

Nikhil म्हणाले...

Currently we are also goining throgh same experiance..nice read!

Trupti म्हणाले...

Oh..wow! Nice to know. Sorry for the belated comment reply Nikhil:-)