Tuesday, December 11, 2012

भाकरी आणि मेथीची भाजी


इथे आल्यापासून  प्रथमच बिग बझार या मॉल मध्ये गेलो होतो. भारतात आहोत यावर विश्वासच बसत व्हता इतका झगझगाट, चकचकीतपणा सगळीकडे होता.  पण त्याचबरोबर आश्चर्याचा सुखद धक्काहि बसला कारण तिथे चक्क पिठाची गिरणी होती. धान्य तिथून विकत घ्यायचे  आणि ताजे पीठ घरी न्यायचे. सहीच! 

माझी किती दिवसांची इच्छा होती भाकरी करायची, खायची. ती आता पूर्ण होणार या विचारानेच अत्यानंद झाला. झकासपैकी  बाजरी आणि ज्वारी दळून घेतली. अगदी तिथे उभं राहून. तो पिठाच्या गिरणीचा typical गंध, तो चक्की फिरण्याचा घर-घर आवाज मग  त्याचावर ठप-ठप आवाज करत ते पीठ पिशवीत ढकलणारा तो चक्कीवाला असलं सगळं क्षणार्धात कित्ती वर्ष मागे घेऊन गेलं. मग अगदी आई जसं  चक्कीवाल्याला बजावून सांगायची की, "जरा जाडच  ठेवा पीठ  ". तसं मी पण म्हटलं "भैय्या, आटा medium ही पिसना " मस्तच वाटलं. अगदी मोठ्ठ झाल्यासारखं ! अर्हनला पण तिथं उभं राहून चक्की, दळण दाखवलं, सांगितले. जाड कागदी पिशव्यांमध्ये ही पीठ घालून घरी  आणली. मला तर माझं स्वप्न, जीव त्यात बांधून आणल्यासारखे वाटलं. मग काल रात्री बेत ठरवला. मेथीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा. कित्येक महिन्यानी भाकरी करणार होते. जरा धाकधूक होती. पण सगळ लक्षातही  होत याची गम्मत वाटली. पीठ भिजवले, भाकरीला लावायला एका वाटीत पाणी घेतले. ती तव्यावर उलटण्यासाठी उलथने, लाटण्यासाठी पोळपाट अशी  जय्यत तयारी झाली. आणि मस्तपैकी भाकऱ्या केल्या.  सगळ्याना छान पोळी पण निघाली. निर्मितीचा एक वेगळाच आनंद मिळाल्यासारख वाटलं. 

भाकरी ज्वारीची केली पण रंग जरा काळपात आला होता. बहुदा बाजरीवर दळले गेले असावी. पुढच्या वेळी हि काळजी घ्यायला हवी अशी मनात नोंद केली.

भाकरीचा बेत ठरल्यावर संध्याकाळीच मेथीची गड्डी निवडली होती. अगदी शिस्तीत आठवून लसून, मिरची अशा तयारीसकट. मस्त पैकी  मेथीची पातळ भाजी केली.  त्यात डाळीच पीठ असल्याने प्रथिनाचा प्रश्न मिटला होता . 

चीन मधल्या मेथीला आपल्या मेथीसारखा कडूपणा नाही जाणवला कधी. त्यामुळे,  हा एक ओळखीच्या चवीचा अजून आनंद. अत्यंत healthy असं जीव ओतून केलेले हे whole-meal तयार झाल्यावर पटकन हे फोटो काढले. आणि अगदी मन लाऊन पोटभर जेवले. जेवल्यावर आमची आजी म्हणते तसं " अन्नदाता अन्न्भूमी सुखी भव ! " अस  आपसूकच तोंडातून निघालं. इथे भारतात परत आल्यावर हे असले छोटे छोटे आनंद सापडायला लागलेत. जे कशातच मोजता येणार नाहीत. ज्याचे मोल जे देशाबाहेर राहतात ते नक्कीच अधिक ओळखू शकतील.  हे आनंद सतत भेटत राहोत हीच इच्छा, प्रार्थना !


   

Post a Comment