Translate

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

Golden Trumpet AKA चषकपुष्पी !


गेल्या काही दिवसांपासून हे झुपके लगडलेल पुष्पसौदर्य, वैभव  खुणावतय. मोहात पाडतय. 

स्वच्छ निळ आकाश, हिरवागार पर्णभार  अशा पार्श्वभूमीवर हे फुलांचे झुपके जाम खुलून दिसतात.  थंडीच्या दिवसात सकाळच्या कोवळ्या उन्हात अंगावर तेज, झळाळी लेवुन उगाचच भाव खात असतात आपले ! 

रोज सकाळी भेटतात, खुणावतात, छळतात.  म्हणून जरा त्यांचा माग काढावा म्हटलं. नाव, गाव, काम काय करतात  इत्यादी. म्हणून जरा आजूबाजूला चौकशी केली. महाजालावर शोधाशोध केली. आणि भेटली बुवा एकदाची ! मस्तच ! एक कुतूहल तूर्तास शमलय. 





तर ह्या झाडाच इंग्रजी नाव    Golden Trumpet आहे असं कळलंय.  त्याच्या सौंदर्याच तंतोतंत वर्णन करणारं. संस्कृत मध्ये ह्याला "चषकपुष्पी " म्हणतात. फुलाच्या आकारचं चषकाशी असणार साधर्म्य सांगणारं.  तर हिंदीमध्ये याला "सैतानी फुल " , "जहरी" किंवा  "जहरी सोनटक्का"  म्हणतात. त्याच्या गुणधर्माची ओळख करून देणारं ! "सौंदर्य विषारी असतं" असं कुठतरी वाचल्याचं एकदम आठवलं. 



ही चषकपुष्पी मुळची मध्य अमेरिका आणि ब्राझील मधली. भारतातही सापडते. भाल्याच्या आकाराची पान असणाऱ्या या चषकपुष्पीची फुलं सफेद, जांभळ्या, गुलाबी किंवा नारंगी रंगाची सुद्धा असतात. पुनरुत्पादन फुलांपासून  होत नाही. ते होते त्याच्या शेंगामधील दाणे किंवा बियांपासून. चषकपुष्पीच्या toxic गुणामुळे त्याच्या फुलं, पान आणि झाडाच्या सालीचा औषध म्हणून उपयोग केला जातो. पित्तदोष, डोकेदुखी  इत्यादीवर या वनस्पतीचा आयुर्वेदात वापर केला जातो म्हणे. 





सध्या राहते आहे तो परीसर निसर्ग समृद्ध आहे. रोज नवनवीन फुल, पान, झाडं, पक्षी भेटत असतात. असं लक्षपूर्वक आजूबाजूला पाहायला कधी वेळच मिळाला नव्हता.

बघुयात कुणाकुणाची भेट घालून देतंय हे नवीन लागलेले वेड !

(फोटो मोबाईल च्या कॅमेरातून काढलेत. त्याच्या मर्यादा संपूर्ण वापरून. तेवढे समजून घ्यालच. आणि या चषकपुष्पी विषयी तुम्हाला अजून माहिती असल्यास अवश्य सांगा.)    


शनिवार, १५ डिसेंबर, २०१२

English Vinglish च्या निमित्ताने




काल English Vinglish सिनेमा पाहिला. एक अत्यंत तरल चित्रपट. तो पाहिल्यावर प्रकर्षाने डोक्यात विचार आला तो  म्हणजे दोन व्यक्तींमधील नातेसंबंधातील "राजकारणाबद्धल ". समोरच्याला समजून न घेणं, गृहीत धरण, समोरच्याला मोठ्ठ होऊ न देणं.  

शशी म्हणजे लाडू करण्यासाठीच जन्माला आली आहे. तिला English बोलताच येणार नाही असं वारंवार तिचा नवरा, सतीश  तिला म्हणून तिच्यात न्यूनगंडच निर्माण करत राहतो. तिची टिंगल करतो. अगदी मुलांसमोर. मग मुलही आईची टिंगल करतात. नातेसंबंध कसे घडत-बिघडत जातात याचे हे उत्तम उदाहरण वाटलं. 

मला तर वाटतं दोन व्यक्ती मग ते कुणीही असोत आई-मुल, वडील-मुल, नवरा-बायको, दोन मित्र, दोन मैत्रिणी, नणंद-भावजय, सासू-सून, सासरा-सून, ऑफिसमधील दोन सहकारी इत्यादी इत्यादी. यांच्या परस्पर संबंधात, नात्यात जेव्हा कुरबुरी असतात किंवा एकमेकांबद्धल असमाधान, तक्रारी असतात तेव्हा बऱ्याचदा miscommunication असतं. किंवा कुणीतरी एक जण   "राजकारण" करत असतो. समोरच्याला dominate करत असतो. समोरच्याच खच्चीकरण करत असतो. त्याला सारखं बोलून बोलून, टिंगल करून त्यात न्यूनगंड निर्माण करतो. कारण त्याला स्वतःच्या स्थानाबद्दल, ते जाईल कि काय, किंवा समोरचा माझ्यापेक्षा मोठा / वरचढ झाला तर ? अशी भीती, शंका  असते. किंबहुना त्याला स्वतः बद्धल आत्मविश्वास, खात्री नसते.

बायकांना तर ह्या नातेसंबंधाना आयुष्यभर हाताळाव लागतं. माहेर-सासर या दोऱ्यांवर कसरत करत.

दुर्दैवाने, बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला मिळणारी वागणूक ही तुम्ही व्यक्ती म्हणून कशा आहात यापेक्षा इतर "घटकच" ठरवतात. या घटकांमुळेच प्रसंगी तुमच्या आजूबाजूला अचानक लोकांची गर्दी होते तर प्रसंगी लोक सोयीस्करपणे बाजूला सरकतात. हे घटक म्हणजे तुमची "लेबल्स". ज्याला समाजशास्त्रात ascribed status असंही म्हणतो. तुम्ही स्त्री आहात की पुरुष,  तुमचं आडनाव काय, मग त्यावरून तुमची जात कोणती, मग तुमच्या पालकांचे सामाजिक स्थान काय, त्यांची आर्थिक ताकद किती (बहुतेक वेळा, डिग्री आणि संवेदनशीलता, Emotional intelligence जो दोन व्यक्तीच्या नातेसंबंधात महत्वाची भूमिका बजावतो, यांचा काडीचा संबंध नसतो ) इत्यादी, इत्यादी. म्हणजे दोन व्यक्तींचे  संबंध, त्यांच्यात असणारी  जवळीक याच गोष्टीमुळे असते. 

पण जो खरा सुज्ञ असतो तो या लेबल्स च्या पलीकडे जाऊन "माणूस" पाहतो.  स्वच्छ, कोऱ्या पाटीसारखं मन ठेऊन. मग हाच 'खरा' माणूस त्याच्या स्वतःच्या मनातील, त्याच्या संबंधात येणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या कोऱ्या पाट्यांवर नक्षी रेखाटतो, त्याला त्या समोरच्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या प्रतिसादातून, वागणुकीतून. इथे जर " I am Okay, You are Okay " असं असेल तर सुंदर रेखीव रांगोळी जमते. पण "राजकारण" असलं तर नुसते रेषांचे वार, नक्षी बिघडवणारे.

का बरं दुसऱ्याच मोठ्ठ होणं खपत नाही काही जणांना ? कदाचित ते स्वतःलाच घाबरत असतील. स्वतःलाच ओळखत नसतील. 

तुम्ही नशीबवान असाल तरचं अशी "खरी" माणस तुम्हाला मिळतात का ? काय सुंदर वीण असते या अशा समान,  I am Okay, You are Okay नात्यात ! अशी नाती, अशी माणस सर्वांना मिळोत. आमच्या मनाच्या पाट्या "लेबल्स" ने न ठरोत. एवढच त्याच्याकडे मनापासूनच  मागण !

ॐ सह नाववतु ।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै ।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ।





मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

भाकरी आणि मेथीची भाजी


इथे आल्यापासून  प्रथमच बिग बझार या मॉल मध्ये गेलो होतो. भारतात आहोत यावर विश्वासच बसत व्हता इतका झगझगाट, चकचकीतपणा सगळीकडे होता.  पण त्याचबरोबर आश्चर्याचा सुखद धक्काहि बसला कारण तिथे चक्क पिठाची गिरणी होती. धान्य तिथून विकत घ्यायचे  आणि ताजे पीठ घरी न्यायचे. सहीच! 

माझी किती दिवसांची इच्छा होती भाकरी करायची, खायची. ती आता पूर्ण होणार या विचारानेच अत्यानंद झाला. झकासपैकी  बाजरी आणि ज्वारी दळून घेतली. अगदी तिथे उभं राहून. तो पिठाच्या गिरणीचा typical गंध, तो चक्की फिरण्याचा घर-घर आवाज मग  त्याचावर ठप-ठप आवाज करत ते पीठ पिशवीत ढकलणारा तो चक्कीवाला असलं सगळं क्षणार्धात कित्ती वर्ष मागे घेऊन गेलं. मग अगदी आई जसं  चक्कीवाल्याला बजावून सांगायची की, "जरा जाडच  ठेवा पीठ  ". तसं मी पण म्हटलं "भैय्या, आटा medium ही पिसना " मस्तच वाटलं. अगदी मोठ्ठ झाल्यासारखं ! अर्हनला पण तिथं उभं राहून चक्की, दळण दाखवलं, सांगितले. जाड कागदी पिशव्यांमध्ये ही पीठ घालून घरी  आणली. मला तर माझं स्वप्न, जीव त्यात बांधून आणल्यासारखे वाटलं. 



मग काल रात्री बेत ठरवला. मेथीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा. कित्येक महिन्यानी भाकरी करणार होते. जरा धाकधूक होती. पण सगळ लक्षातही  होत याची गम्मत वाटली. पीठ भिजवले, भाकरीला लावायला एका वाटीत पाणी घेतले. ती तव्यावर उलटण्यासाठी उलथने, लाटण्यासाठी पोळपाट अशी  जय्यत तयारी झाली. आणि मस्तपैकी भाकऱ्या केल्या.  सगळ्याना छान पोळी पण निघाली. निर्मितीचा एक वेगळाच आनंद मिळाल्यासारख वाटलं. 

भाकरी ज्वारीची केली पण रंग जरा काळपात आला होता. बहुदा बाजरीवर दळले गेले असावी. पुढच्या वेळी हि काळजी घ्यायला हवी अशी मनात नोंद केली.

भाकरीचा बेत ठरल्यावर संध्याकाळीच मेथीची गड्डी निवडली होती. अगदी शिस्तीत आठवून लसून, मिरची अशा तयारीसकट. मस्त पैकी  मेथीची पातळ भाजी केली.  त्यात डाळीच पीठ असल्याने प्रथिनाचा प्रश्न मिटला होता . 

चीन मधल्या मेथीला आपल्या मेथीसारखा कडूपणा नाही जाणवला कधी. त्यामुळे,  हा एक ओळखीच्या चवीचा अजून आनंद. अत्यंत healthy असं जीव ओतून केलेले हे whole-meal तयार झाल्यावर पटकन हे फोटो काढले. आणि अगदी मन लाऊन पोटभर जेवले. जेवल्यावर आमची आजी म्हणते तसं " अन्नदाता अन्न्भूमी सुखी भव ! " अस  आपसूकच तोंडातून निघालं. 



इथे भारतात परत आल्यावर हे असले छोटे छोटे आनंद सापडायला लागलेत. जे कशातच मोजता येणार नाहीत. ज्याचे मोल जे देशाबाहेर राहतात ते नक्कीच अधिक ओळखू शकतील.  हे आनंद सतत भेटत राहोत हीच इच्छा, प्रार्थना !


   

शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

पिल्लू


( हे साधारण ६ वर्षांपूर्वी दिल्लीत असताना लिहिलेले आहे. परत दिल्लीत आल्यावर कबुतर अशीच घरात घुसू लागली आहेत. तेव्हा या लेखाची आठवण झाली म्हणून ...)

एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा. त्यावेळी घरात cooler ही नव्हता. दिल्लीत भासणारी cooler ची अत्यावश्यकता आता चांगलीच जाणवत होती. सुट्ट्यासाठी आणि दिल्ली पाहण्यासाठी म्हणून बहिण घरी आलेली होती. भयंकर उकाडा म्हणून रात्री  बाल्कनीत झोपायचे ठरले. बेड बाल्कनीत हलवला. त्यामुळे उन्हाळा सुसह्य झाला. जवळपास १० दिवस तो बेड बाल्कनीतच होता. नेहमीप्रमाणे कबुतरे येऊन जाऊन असायची. आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी ते routine होते.

१० दिवसांनतर बेड घरात घ्यायचे ठरले. तेव्हा बेडवर  पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा  छोटा TABLE TENNIS चा बॉल दिसला. क्षणार्धात उलगडा झाला, हा बॉल नसून पक्षाचे अंडे आहे. आता त्या अंड्याचे काय करायचे हा गहन प्रश्न होता. तात्पुरते ते तसच उचलून बाल्कनीत एका कोपऱ्यात ठेवले आणि आमचा बेड आत आणण्याचा कार्यक्रम सुरु झाला. बेड हलविला आणि त्याच्याखाली अर्धवट बांधलेल्या घरट्यात अजून २ अंडी दिसली.

मग सापडलेले ते अंडे घरट्यात त्या २ अंड्याबरोबर ठेवले. कबुतराची ती अंडी वाचवायची होती. मग त्यासाठी एक टीपॉय वापरायचे ठरले. एकदा दुपारी लक्षात आले की  घरट्यात दोनच अंडी आहेत. वाईट वाटले. आता उरलेली अंडी तरी वाचवायलाच हवी होती. कावळे टीपॉयच्या उघड्या बाजूतून आत जाऊ शकत होते. घरात एक मोठ्ठ पोत  होत. ते त्या टिपॉयवर घातले. अंडी पूर्णपणे सुरक्षित झाली.   किमान आता ही अंडी तरी कावले नेऊ शकणार नव्हते.

कबुतराच्या 'त्या' जोडीला पोत्याखाली येता -जाता यावे म्हणून पोते थोडे वर उचलून घेतले. त्या जोडीचे त्या अंड्यावर पूर्ण लक्ष होते. ते त्या  टीपॉयखाली कायम असत.

आता वेळ मिळेल तेव्हा त्या कबुतरांच,त्या अंड्यांच निरीक्षण करण्याचा छंदच जडला.

या सगळ्या प्रकाराला एव्हाना २५ दिवस झाले होते. त्या अंड्यातून पिल्ले बाहेर आलेली नव्हती. कधी-कधी वाटायचं खरच पिल्ले बाहेर  येतील का ?

आमच्या कामानिमित्त आम्हा दोघांनाही दिल्लीबाहेर जावं लागणार होतं. आता अंड्यांच काय होणार  ? त्यांच्याकडे लक्ष ठेवणे, निरीक्षण करणे अशक्य होते. आठवडाभर घर पूर्णपणे बंद होते. अधिक सुरक्षितता म्हणून बाल्कनी काड्या आणि प्लास्टिक मिश्रित (typical दिल्लीत मिळणाऱ्या ) पडद्यांनी बंदही करून घेतली.

आठवड्यानंतर निनाद दिल्लीत परत गेला. तेव्हा मी पुण्यात होते. निनादने फोनवरून बातमी दिली..... " कबुतराच्या अंड्यातून एक पिल्लू बाहेर आलंय". खूप आनंद झाला. दुसऱ्या अंड्याच काय झालं हे कळायला काही मार्गच नव्हता. पण किमान एक पिल्लू तरी जगले होते. निनादने तर त्याचा फोटो पण काढला.

त्यानंतर साधारण ४-५ दिवसांनी मी पण दिल्लीला परत गेले. पिल्लू पाहिले. मस्तच होते. प्रथम त्याच्या जवळ जायची भीती वाटली. खूपच छोटे होते ते. त्याचे आई-वडील, कबुतरे त्याच्या जवळपासच असत. पिल्लाचे डोळे काळे होते. पायही काळपट होते. डोक्यावरील केसांचा रंग पोत्याच्या दोऱ्याच्या रंगासारखा  होता. इतर कबुतरांप्रमाणे (किमान त्याच्या आई-वडिलांप्रमाणे) त्याचे डोळे लालसर नव्हते, ना पायही गुलाबी होते. मानेवरही चमकदार गुलाबी-हिरव्या रंगाची छटा नव्हती. पिल्लूच होत ते वाढीच्या मार्गावरच. जरासा आवाज झाला कि घाबरून बसणार !


(फोटो सौजन्य :- इंटरनेट )

नंतरच्या आठ दिवसात ते छान चालू लागलं. बाल्कनीतल्या बाल्कनीत ते फिरत असायचे. त्याची आई त्याला चोचीतून भरवायची. त्याच्या डोक्यावरच्या केसातून चोचीने काहीतरी करायची. कदाचित साफ करत असेल.

काही दिवसांनी  तो टीपॉय हलवायचे ठरवले. आता त्याची गरज नव्हती. उबेसाठी म्हणून पोत मात्र तसच ठेवल . आता पिल्लावर नजर ठेवण  सोप होत. टीपॉय काढला. सुरवातीला पिल्लू घाबरले. पण काही काळच !
आता आम्हाला एकमेकांची सवय झाल्याने दोघांचेही माझे आणि पिल्लाचे एकमेकांना घाबरणे कमी झाले.

एव्हाना पिल्लू उडायला शिकले होते. म्हणजे फरशीवरून टीपॉय च्या कप्प्यापर्यंतच. त्यानंतर ४-५ दिवसात ते 
 टीपॉयवरही बसू लागले. नंतर कपडे वाळवायच्या दोऱ्यांवर आणि त्यानंतर बाल्कनीच्या कठड्यावरही . हे सगळ पाहताना खूप मजा येत होती.   आश्चर्य मिश्रित  कौतुक वाटत होते. जोनाथन सीगल ची गोष्ट आठवायची- विशेषत पिल्लाच्या वाढीचे नवनवीन टप्पे पाहताना. 

अधूनमधून ते पिल्लू पाय लांब करून आळस सोडत असे. पंख वर करून बसत असे. रात्री तर अंगाचे मुटकूळ करून शांत झोपायचे. 

त्या पिल्लाला आता थोडे उडता येत होते. आणि तो टीपॉय काढल्यावरच ते उडण्याचा  प्रयत्न करू लागले. किमान मला तरी तसे वाटत होते. म्हणून २-३ दिवसांनी पोते आणि घरटेही उचलले. कारण पिल्लू बर्यापैकी मोठे झाले होते. त्याला त्यांची फारशी गरज नव्हती. अर्थात हेही माझ मत. खर तर त्या घाणीला आता मी कंटाळले होते. :-)

परवा आणि कालही सकाळी उठून पहिले. पिल्लू बाल्कनी आणि घरातही कुठे दिसले नाही. मग काही वेळाने ते बाल्कनीत दिसले. लागोपाठ २-३ दिवस असेच घडले. आता कळलंय की ते पिल्लू साधारण १ फुट एवढे अंतर  उडू शकते. म्हणून ते बाल्कनीतून उडते. खिडकीच्या कठड्या पर्यंत चालत जाउन पलीकडच्या मोकळ्या  स्ल्याबवर जाऊन बसते.  

एव्हाना पिल्लाची बरीच प्रगती झाली होती. म्हणजे त्याला बाल्कनी बाहेरचे जगही कळायला लागले होते. 

परवा पाउस झाल्यावर पोत्याखाली दडले होते. म्हणजे एक पाउसही अनुभवला तर ! 

मग ठरवले आता खूप झाले. त्या पिल्लाचे अजून लाड नाही करायचे. अजून किती दिवस त्याची काळजी करणार? आता त्याला "जग" कळू देत. स्वतच स्वतःच संरक्षण करू देत. पिल्लाला अंड्यातून बाहेर येऊन जेमतेम १५-२० दिवस झालेत. पण त्यापूर्वीपासून म्हणजे दीड - दोन महिन्यांपासून त्याची शक्य तेवढी काळजी घेतली आहे. 

हा सगळा विचार करून त्या पिल्लाला थोडे घाबरवले. त्यात स्वार्थ तर होताच. पण कबुतराच्या पिल्लाने आता स्वतःचे संरक्षण करावे असाही विचार होताच. 

ते आता असच परत एकदा  बाल्कनीतून उडल्यावर बाल्कनी पडद्यांनी बंद करून घेतली आहे. पण ते पिल्लू खिडकीच्या बाहेर कठड्यांवर बसून आहे. खिडकीच्या काचेतून बघतय माझ्याकडे. त्याला काय माहिती की मी त्याच्यावरच लिहिते आहे म्हणून !  

(पूर्व प्रसिद्धी :- "सकाळ", २४  जून, २००६.)