Friday, April 26, 2013

माझी गाडी मागं राहून चालेल का ?

( आज जिममध्ये असताना डोक्यात सुरु झालेलं हे असचं काहीतरी )

पूर्वीच्या बायका घरातच जात्यावर धान्य, डाळी दळायच्या.  दळण करताना ओव्या, गाणी म्हणायच्या. घरबसल्या व्यायाम होत होता. भेसळ नसलेलं पौष्टीक पीठही मिळत होतं.  stamina,  strength आणि flexibility ही फिटनेसची त्रिसूत्री पूर्ण होत होती. 

आता आम्ही बाजारातून पीठ विकत आणतो. फिटनेससाठी, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जातो. " मेरे फोटो को सिने से यार, चीपकाले सैय्या फेविकॉलसे " हे अचाट गाणं जिममधील FM वरून ऐकत treadmill वर पळत राहतो. 

पूर्वीच्या बायका नदीवर, ओढ्यावर  जाऊन कपडे हाताने धुवायच्या.  stamina,  strength आणि flexibility ही फिटनेसची त्रिसूत्री पूर्ण होत होती.  कपडे आपटताना छळनाऱ्या नणंदा, सासु यांच्या बद्धलचा राग कपड्यांवर निघून कपडे स्वच्छ निघत होते. बाकीच्या मैत्रिणींशी बोलून मनं मोकळी होत होती. कामाचा थकवा जाणवत नव्हता. 

आम्ही रोज-रोज अगदी २-३ कपड्यांसाठी washing machine वापरतो. पाणी-विजेचा अपव्यय करतो आणि वजन कमी करण्यासाठी फसव्या जाहिरातीच्या बळी होतो. slim नट्यांचे फोटो  बघून झुरतो किंवा ऐश्वर्या राय पण अजून कशी जाड आहे हे video, फोटो बघून विचित्र समाधान मिळवतो. 

स्टेशन सोडून गाडी बरीच पुढ निघून आली आहे. कशासाठी, कुठे जातोय नक्की कळत नाहीए. पण सगळ्यांच्याच गाड्या निघाल्यात सुसाट वेगात. माझी गाडी मागं राहून चालेल का ?   


Thursday, April 18, 2013

रामनवमी !

शांघाय मध्ये असताना रामनवमीच्या दिवशी पडलेला हा प्रश्न.  त्याचे उत्तर डायरी लिहून सोडवले. इथे प्रसिद्ध करताना थोडेफार संस्कार केलेत त्यावर.

रामनवमी. माझा आवडता दिवस, आतापर्यंत उण्यापुऱ्या तीसएक रामनवम्या अनुभवल्या. अनुभव एकच. आनंद, प्रसन्नता, चैतन्य देणारा दिवस ! सहज डोक्यात विचार आला, का बरं या दिवशी नेहमीच इतके उत्साही, आनंदी वाटते ? आणि, शोधता-शोधता, निसर्ग त्यावर आधारित मानवनिर्मित संस्कृती, त्यातून होणारे संस्कार अशा एक एक परस्परवलंबी साखळ्या उलगडत गेल्या.  विचार करता-करता रामनवमीशी जुळलेली नाळ, असलेले नातं उलगडत गेलं, सापडलं. मन फ्लशबक मध्ये गेलं.

ठसा उमटवून गेलेली पहिली रामनवमी असावी ही. लहान असताना, (बहुधा ४ -५ वर्षांची असताना) रामनवमीला आम्ही गावाला जायचो. गावाला घराच्या अगदी समोरच रामाचं मंदिर आहे. त्यामुळे सगळा सोहळा अगदी बारकाईने अनुभवायला मिळायचा. रामनवमीच्या आदल्या रात्री, आमचं घर आणि मंदिरासामोरील रस्त्यावर पताका लावल्या जायच्या. त्या पताका तयार होत असताना पाहायला मिळायच्या. कागदापासून तयार केल्या जाणाऱ्या, त्रिकोणी आकाराच्या, विविधरंगी पताका ! सगळे रंग शिस्तीत एकापाठोपाठ उभे जणू. ते रंगीत त्रिकोणी तुकडे खळीने सुतळीला एकमेकाशेजारी डकवले जायचे. एक एक पताका येवून सुंदर तोरण बनायचे. आत्ताआत्तापर्यंत जमिनीवर असणारे ते छोटे त्रिकोणी तुकडे. बघताबघता त्यांची माळ व्हायची आणि ते एकदम उंच, दूर जायचं. आज ती पताका मला, लग्नानंतर परदेशात वास्तव्य करणाऱ्या एखाद्या मुलीसारखी वाटते. मुलगी दूर, उंच गेल्याचं कौतुक आणि मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी हळहळही !

http://mellanoandcompany.files.wordpress.com/2012/10/making-marigold-lei.jpg

रामनवमीच्या दिवशी मंदिरात आणि घरातही विशेष लगबग असायची.  मंदिर सजलं जायचं. मंदिराच्या दारावर  झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं एकाआड एक ओवून तोरण बांधलं जायचं. उत्सवमूर्तीला नवीन कपडे, दागिने, फुलांच्या माळा चढवल्या  जात. गाभाऱ्याबाहेरील मोठ्या मंडपात रामाचा पाळणा अडकवला जायचा.  कीर्तनाचा कार्यक्रम असायचा. मग कीर्तनकारांना बसण्यासाठी किंवा उभं राहण्यासाठी विशेष जागा निवडली जायची. गाभाऱ्यात मूर्ती, मुख्य मंडपात रामाचा पाळणा आणि त्याच्या दोन्ही बाजूला भक्तगण. एकीकडे स्त्रिया, दुसरीकडे पुरुष आणि मध्यभागी रामाच्या मूर्तीकडे तोंड करून उभ्या ‘बंग’ बाई अशी बैठक व्यवस्था असे. तेव्हा मंदिरात रामनवमीला बंग नावाच्या बाई कीर्तन सांगायला येत. कीर्तन संपल्यावर त्यांना सगळेच नमस्कार करायचे. मला त्या फार आवडायच्या. का ते आता नेमके माहिती नाही. कदाचित त्यांची कीर्तन सांगण्याची शैली, त्या म्हणत असलेली गाणी, भजनं आवडत असतील. त्या वयात या सगळ्यातून काय कळत होत, ते तो रामच जाणे ! असो, ते काहीही असो. पण अजूनही सगळ चित्रासारखं डोळ्यापुढे उभं राहतं.

आठवणींचा दुसरा 'रेशीम' धागा दुसरीत असतानाचा.  आमच्या देशपांडे बाइंनी वार्षिक स्नेहसंमेलनासाठी म्हणून गीतरामायणातील "आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे" या गाण्यावर, आमचा नाच बसवला होता. त्याची हमखास आठवण या दिवशी होते. आणि nostalgic व्हायला होत. आजही ते ऐकले तरी आपसूक अंगात लय येते, हात -पाय ठेका धरतात. पुढे नंतर कळत्या वयात, पुणे आकाशवाणीवरून रामनवमीच्या दिवशी गीत रामायणाचे सूर कानी पडायला लागले. शब्दांमागील अर्थ उमगू लागले. ते शब्द, ते संगीत, बाबुजींचा आवाज सगळेच मोहिनी घालू लागले. मग गीतरामायण हा एक हळवा कोपरा, weak -point होऊन बसला. अगदी आजही आता भारताबाहेर असले तरी रामनवमी म्हटले कि गीत-रामायण ऐकणे हा एक दिवसाचा ठरलेला, अविभाज्य कार्यक्रम. पुन्हा-पुन्हा ऐकत रहावं वाटणारं ! गदिमा आणि बाबुजीं च्या निर्मिती मागचं कोड, गूढ अजून न उलगडलेले !

सुखद स्मृतींचा हा तिसरा धागा माध्यमिक शाळेत असतानाचाच.  मराठीतला चैत्र शुद्ध नवमीचा दिवस, इंग्रजी महिन्याप्रमाणे पाहिले तर साधारण मार्च-एप्रिल. हा शाळांचा परीक्षांचा मौसम. परीक्षा आणि नंतर सुट्ट्या! सहीच ! रामनवमीच्या दिवशी, खरं तर, मे महिन्याच्या सुट्ट्यांची चाहूल लागायची. दुपारच्या वेळेला कैऱ्या, बोर, चिंचा, आवळे, पेरू असा मेवा घेऊन शाळेबाहेर बसलेल्या मावशी, काका दिसायचे. उन्हाळ्यातल्या या मेव्याची, त्यांच्या चवींची, त्यांच्याशी निगडीत बाल-आनंदाची, येऊ घातलेल्या आंब्यांच्या आगमनाची कुठेतरी नोंद होत असावी. आनंदाची चाहूल देणारा तो दिवस, ते क्षण !

अजून एक म्हणजे शाळेत जायच्या रस्त्यावर एक राम मंदिर लागायचे. तिथे रामनवमीला भरपूर वर्दळ असायची. दुपारी १२ चा सुमार म्हणजे रामाला पाळण्यात घालणे इत्यादी सोहळा अगदी भरात असण्याची वेळ.मग जाताजाता कानावर भजनं, गाणी पडायची. जरा थांबून मंदिरात डोकावले तर सजवलेले मंदिर, नटून-थटून आलेल्या बायका, त्यांच्या बरोबरच्या लहान-सहान मुली, रंगात आलेले कीर्तनकार आणि राम-सीता आणि लक्ष्मणाच्या नटवलेल्या मूर्ती असं काय-काय दिसायचे. सगळे तल्लीन झालेले. फार सुरेख दृश्य, अनुभव.

चौथा धागा म्हणजे त्या दिवशी घरी केला जाणारा विशेष स्वयंपाक. तो फक्त रामनवमीचाच बेत असतो, इतर कोणत्याच दिवशी नाही. झुणका (चोकोनी सुबक वड्या पाडलेला, त्यावर कोथिंबीर, खोबरे, खसखस भुरभुरलेला ) टरबूजाचं शिकरण, कैरीच पन्हं, आणि घडीच्या मऊ सुत पोळ्या ! आता, लग्न होऊन भारताबाहेर राहत असल्यामुळे, आईच्या हातचा ऐता असा हा मेनू खायला मिळत नाही. त्यामुळे तो पण रामनवमीशी निगडीत अनुभवांच्या मालिकेतील एक सुखद कप्पा ! काही खाद्य पदार्थांच्या अनुभवलेल्या चवीपण कशा जागा, प्रसंग, वेळ, सोबतची माणसे यांच्याशी समीकरणे जमा करत जातात. ती चव, तो प्रसंग, ती वेळ, बरोबरचे सोबती अस क्वचितच पुन्हा जमून येते. आणि नुसती ती आठवण आली तरी सगळे एखद्या फोटो प्रमाणे सगळच स्मृतीपटलावर जिवंत होत. 

आता वाटतंय की, निसर्गात होणारे बदल, जसे कि चैत्र -पालवी, त्यामुळे एकूणच वातावरणातला उत्साह, त्याला अनुरूप अशी संस्कृती (विविध सामाजिक संस्था, खाद्य संस्कृती, प्रथा- परंपरा , सण-वार, संगीत इत्यादी), ह्या संस्कृतीच्या माध्यमातून मनावर होत जाणारे संस्कार याचा काही संबध असेल का? कदाचित, नव्हे नक्कीच, या सगळ्याचाच हा एकत्र परिणाम असू शकतो. रामनवमीच्या दिवशी ह्या सगळ्याच आठवणींचे धागे मनाच्या अंगणात फेर धरतात. समृद्ध अनुभूती देतात.

माझा मुलगा आता तीन वर्षांचा आहे. जमेल तसं रामायण-महाभारतातल्या गोष्टी त्याला सांगायचा प्रयत्न करत असते. त्याला थोडफार समजतही असाव. कारण सध्या त्याच्या रुपात आमच्या घरात कधी शंकर, कधी हनुमान, कधी कृष्ण, तर कधी राम वावरत असतात. म्हणजे त्या गोष्टी ऐकून, पुस्तकातील चित्र पाहून तोहि त्या-त्या कथानायका प्रमाणे स्वतःला नटवायला सांगतो आणि अभिनयही करतो. मग धनुष्य नसले तर कपडे अडकवायचा hanger पण धनुष्य म्हणून चालतो. त्या काही क्षणासाठी तो त्या भूमिकेत असतो. थोडक्यात काय, आता त्याला रामाची थोडी ओळख आहे. आज रामनवमी म्हणून त्याला सकाळी उठल्यावर सांगितले, " आज रामाचा वाढदिवस !", सांगण्याचा हेतू हाच कि आपलं  निसर्गाशी असणार नाते, परस्परावलंबन तुला ओळखता येवो. मानवनिर्मित संस्कृतीमागे हा जो निसर्ग बदल स्वीकारण्याचा, साजरा करण्याचा विचार आहे तो समजण्याची ताकद तुला मिळो. हा रामनवमीचा दिवस मला खूप खूप आनंद देऊन जातो. तसाच आनंद तुलाहि मिळो. 

Saturday, April 13, 2013

चैत्र


आज चैत्र शुद्ध द्वितीया.

आतापर्यंत कधीच भारतीय, मराठी महिन्यांकडे इतके लक्ष देण्याची गरज फारशी पडलीच नाही . इंग्रजी महिन्याशीच जास्त संबंध. शाळा, कॉलेज सुरु होणं, परीक्षा, सुट्ट्या पासून ते कुणाकुणाचे वाढदिवस इ. सगळं इंग्रजी महिन्यांवरच अवलंबून. अपवाद फक्त सण. असो.…. 

तर हे अगदी  चैत्र शुद्ध द्वितीया वैगेरे लिहिण्याचं कारण म्हणजे काल आणि आज जे मयूर दर्शन झालय त्यानी थक्क झालेय. याला योगायोग म्हणाव का निसर्गनियम ?

चैत्र महिना - वसंत ऋतू - पालवी - निर्मिती, सृजनाचा काळ - सृष्टीतील चैतन्य - मनाची प्रसन्नता - आनंदी वृत्ती ह्या सगळ्या साखळ्या ठाऊक आहेत. पण हा मोरही असा काही "सुटलाय" की माझी बोलती बंद. विचारचक्र सुरु .व्यक्तिगत अनुभवानुसार, ह्या ठराविक महिन्यात मी "वेगळीच" असते. माझा ताबा कुणीतरी घेतल्यासारख वाटतं. आनंदाचा झरा आतूनच पाझरू लागतो. निसर्गात निर्मितीचे डोहाळे सुरु असतात.  आता खात्री पटली आहे की निसर्ग बदलाशी याचा प्रत्यक्ष संबंध आहे. 

बाई निसर्गाशी फार बांधली गेली आहे. नाळ जोडल्यासारखी. त्यातूनच निर्माण झाल्यासारखी. कित्ती साम्य आहे स्त्रीत आणि निसर्गात ! 

दोन्ही निर्मितीक्षम, अत्यंत संवेदनशील,  अखंड बदल झेलणाऱ्या, परिवर्तनशील. बायकांच्या शरीरात हार्मोन्सचा जो काही खेळ सुरु असतो. त्याचा निसर्गातील निर्मितीक्षमता, बदलाशी सारखेपणा वाटतो. 

सध्या या निसर्ग निरीक्षणाच्या वेडाने चांगलेच  झपाटून टाकलंय. आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम असावा हा. 

आपली संस्कृती, सण-वार हे सुद्धा ह्या निसर्गचक्राशी बांधलेले. सणवार म्हटले की स्त्रिया त्याचा अविभाज्य भाग. सणांच्या निमित्ताने, त्या प्रथा-परंपरा पाळण्याच्या निमित्ताने निसर्गाच्या जवळ जाणं, निसर्गातील बदलांमुळे, आपल्या आतूनच जी एक नैसर्गिक साद येत असते, तिला न्याय देणं, तिचा निचरा करणं हे या सणवारातून होत होतं असं वाटतंय. 

या निसर्गाशी असणाऱ्या नाळेपासून आम्ही दूर झालोय. तोडले गेलोय. औध्योगीकीकरणाने. शेतीशी घटस्फोट घेतल्याने . 

आपली संस्कृती, जीवनशैली हे सगळं कित्ती विचार करून आखलेलं होतं. आपण का असे दुसऱ्यांच्या, पाश्चात्यांच्या चष्म्यातून स्वतःकडे, जगाकडे बघतोय ? 

बारमाही वाहणाऱ्या नद्या ज्याचं पाणी आपल्या आजोबा - पणजोबांनी प्यायलय. शेती, जी आपल्या आजोबा - पणजोबांनी केली आहे. छोटी गावं, जे आपलं मूळ गाव म्हणून आपण सांगतो. पण तिकडे जायची कितीही इच्छा असली तरी नाही जमत आपल्याला. 

सगळं हरवलंय. शांत-आरोग्यपूर्ण जगणं. आपल्याबरोबर.  आपल्या जगण्याच्या चक्रव्युहात. तुट्लोय आपण निसर्गापासून, स्वतःपासून. आटलेत का  आपल्यातील नैसर्गिक आनंदाचे, सारासार विचारांचे झरे ? अडकलोय एका चक्रव्युहात. 

 यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
  
त्याच्या येण्याची वाट बघत. 

 

Friday, April 5, 2013

स्वस्थ- अ" स्वस्थ

प्रत्येकजण जर " स्व " स्थ  व्हायला शिकला तर ? 
 "अ" स्वस्थतेला जागाच राहणार नाही.

निळी गुलमोहोर Aka Jacaranda mimosifolia

सोफ्यावर बसून हातातील मोबाईल फोनवर फेसबुक friends  updates पाहत होते. तेवढच, पुढील काम करायला घेण्यापूर्वी break, change  म्हणून असेल  किंवा ती लागलेली खोड असेल. फोनची स्क्रीन वर सरकवत असताना  दिसला सचिनने टाकलेला फुलांनी बहरलेल्या झाडाचा फोटो. jacaranda mimosifolia ह्या अवघड नावाच्या बहरलेल्या झाडाचा फोटो आवडला. मग like करून टाकलं.  

नुकतच वाचून खाली ठेवलेलं 'ऋतुचक्र' पुस्तक अजून शेजारीच होतं. त्यातील निसर्गातील बदलांचा मांडलेला तपशील, ती निरीक्षण, ते शब्दबध्द करण्यासाठीची ताकद, एकूणच दुर्गाबाई असं काय-काय डोक्यात  घोळत होतं.  पुस्तकातील  "रूपधर फाल्गुन" हा शेवटचा लेख डोक्यात अजून ताजा होता.  त्यात दुर्गाबाईंनी ताम्हीनीच्या  फुलाबद्धल लिहिलंय. " ते ताम्हीनीचे निळ्या रंगाच्या फुलांचे बहारदार घोस तर काय वर्णावे ? फुलाफुलांची नाजूक मुरडलेली कडा, पाकळीपाकळीचा तो डौलदार नखरा नजर बंदिस्त करून टाकतो. फाल्गुनाची राणीच आहे ही ताम्हण."

लागलीच CLICK झालं, आठवलं ते काल नजरेस पडलेलं,  पण अजून मला ओळखीचं नसलेलं, लक्ष वेधून घेणारे आमच्या campus मधील एक lavender रंगाच्या फुलांनी बहरत असणारं एक झाड. ते campus मधील झाड, सचिनने टाकलेला फोटो यात काही साम्य असेल का ? एक प्रश्न.  आणि पुस्तकातील ताम्हण सापडली तर ? ह्या  उत्सुकता वाढवणाऱ्या प्रश्नाने लागलीच खाली उतरले आणि त्या lavender रंगाच्या फुलांनी बहरत असलेल्या झालाजवळ गेले.   ते होते  jacaranda mimosifolia aka blue jacaranda ! कोरापुटमधल्या  एका jacaranda mimosifolia ने दिल्लीतील एका jacaranda mimosifolia जवळ नेले मला.

सहीच ! तंत्रज्ञान केवळ माणसांनाच एकमेकांच्या जवळ नाही तर आपल्याला निसर्गाच्या जवळही नेऊ शकत. कारण केवळ तो फोटो एवढच निम्मित होतं. Timimg जुळून आल्यासारखं, योगायोग वैगेरे असं वाटलं.अजून एका नव्या सौदर्याची ओळख झाल्याचा, नवीन गवसल्याचा आनंद झाला. हे काही फोटो त्या ज्याकरांडा चे.

घंटेच्या आकाराची ही फिकट जांभळ्या रंगाची फुले आजूबाजूला येणाऱ्या -जाणाऱ्याला खुणावत राहतात. माहीतीजालावरील उपलब्ध माहितीनुसार ही मुळची दक्षिण अमेरिकेतील.   ह्या विदेशी फुलझाडाला ला मराठीत निळी गुलमोहोर असं नाव दिलंय कुणीतरी. एकूण काय ही विदेशी निळी ज्याकरांडा भारतातही भेटते.  दुर्गा बाईंची फाल्गुनाची राणी ताम्हण कधी  भेटेल आता  ? का तिच्या शोधात ताम्हणी घाटाला भेट द्यायला हवी  ? :-) As its state flower of Maharashtra. ज्याला जरुल असही म्हणतात.  

असो. प्रश्न पडत राहोत. निसर्गाची ओळख, गट्टी होत राहो.