Tuesday, August 20, 2013

मेहंदी रंग लायी.. मुलाच्या मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस, त्यांना गिफ्ट्स द्या, return गिफ्ट्स घ्या हे आता नित्याचं झालंय. असाच २-३ दिवसांपूर्वी एका छोट्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिला गिफ्ट आणायला म्हणून गेले होते. दुकानात गेल्यावर समोरच बऱ्याच बाहुल्या दिसल्या.छोट्या मैत्रिणीचा हातात एकदा बाहुली पाहिलयाच आठवल. एक  बाहुला-बाहुलीची जोडी घेतली. भारतीय विवाहपोशाख घातलेली. बाहुला-बाहुलीच्या लग्नात असते तशी !

पण अजून काहीतरी घ्यावसं वाटत होतं. मग एक chocolate bar घेतली.

तरीही अजून काहीतरी कमी आहे असं वाटत होतं. चित्र मनासारखं, पूर्ण होत नव्हतं. " काय आवडेल त्या छोटीला ?, काय वाटेल तिला हे gift उघडल्यावर ? " तात्पुरतं त्या मुलीच्या भूमिकेत जाण्याचा प्रयत्न करत होते स्वानुभवाच गाठोडं बरोबर घेउन. माझ्या कल्पनाविश्वातील चित्रात, तिला पूर्ण खुललेलं पाहण्यासाठी अजून काहीतरी कमी आहे असं वाटत होतं.

तेवढ्यात समोर मेंदीचा कोन दिसला. पटकन उचलला आणि दुकानदाराला green signal दिला. म्हटलं, " अब यह गिफ्ट wrap कर देना ". सुंदर वेष्टनात ते गिफ्ट बंद झालं.

स्वतःसाठी सुद्धा एक मेंदीचा कोन घ्यावासा वाटला, घेतला. राखीपौर्णिमेसाठी म्हणून बाजारात मेंदीचे कोन आले असावेत ही नोंद नजरेनं करून दिली.

मेंदी काढायचं लक्षात राहावं म्हणून घरी आल्यावर कॅलेंडरवर लिहूनही ठेवलं. :-) 

काल सकाळीच आठवणीने तो मेंदीचा कोन फ्रीझमधून बाहेर काढून ठेवला. तरीही इतर कामांच्या विचारात, मेंदी काढायचं काम अगदी विसरूनच गेले होते. टेबलावर पडलेला मेंदीचा कोन पाहिल्यावर, लेकानं आठवण करून दिली. कारण, बहुदा त्याला स्वतःला आवडतं माझ्या हातावर मेंदी पाहायला, मी ती काढत असताना पाहायला. 

त्याला "thanks " म्हणून घेतला तो कोन  हातात,  झोपण्यापूर्वी.  मस्तपैकी मांडी घालून, उशीला पाठ ठेकून बसले. साशंकपणे. जवळपास दोन वर्षानंतर मेंदीचा कोन हातात घेतला होता. 

माझ्या मेंदी सफरीला सुरुवात झाली. कोनावरील टाचणी काढली. कोन हलकेच दाबला. अगदी हवा तसा flow होता मेंदीला. Hmm… आता design काय काढावं बरं, प्रश्नार्थक नजरेनं काही क्षण कोऱ्या हाताकडे पाहत विचार केला. अगदी साधसं काहीतरी काढावस वाटलं. मग एका वर्तुळापासून सुरुवात केली. पुढील ३०-४० सफर सुरूच होती.  छान design काढून त्यात रंग भरणे, पुढे ती design पूर्ण तळवा, बोटे भरेपर्यंत वाढवत नेणे, असं वाढवत असताना design मधील रिकाम्या जागा आणि भरीवपणा यांचा तोल सांभाळणे. असं करत-करत नक्षी पूर्ण काढून झाली. काळ्या रंगातील ती नक्षी आवडली.  आनंद share करावा म्हणून बाजूला पाहिलं तर मी एकटीच जागी !

 


झोपण्यापूर्वी तो हात बेडच्या बाहेर राहील असं काळजीपूर्वक पाहिलं. सकाळी जाग आल्यावर पाहिलं तर बेडशीट, उशी सुरक्षित होती. मेंदी हातालाच चिकटलेली होती. हात सुंदर दिसत होता. 

मेंदीला रंग चढलाय का, ही उत्सुकता होती. काढलेल्या नक्षी मधील एक टिंब हलकेच नखाने खरवडले. त्या खाली विटकरी रंग दिसला. रंग चढला होता. मग हातावरील सुकलेली मेंदी हलकेच काढली. अहाहा ! सुंदर गडद विटकरी रंगातील नक्षी ! तबियत खूष . हात पाण्यात घातला. वेगळीच चमक दिसली मेंदीला. सतेज, तुकतुकीत त्वचेसारखी. अधिक सुंदर. मेहंदी रंग लायी थी.

खर तर मेंदी काढण्यापूर्वी बऱ्यापैकी दमले होते. पण तो कोन हातात आल्यावर त्याने माझा ताबा घेतला. मेंदी काढण्याच्या  ह्या जवळपास अर्धा-पाऊण तासाने आणि त्या अनुभवाने, दिवसभराचा थकवा  कुठल्याकुठे विरघळून गेला. निर्भेळ आनंद मिळाला. निर्मितीचा, कलेचा, सौदर्याचा ! जोडले गेल्याचा……खूप दिवसानंतरची ही भेट.  अचानक आलेल्या पावसाच्या  सरीसारखी.

श्रावणभेट ?

पुन्हा आठवले. " भाकरी आणि मेथीची भाजी". संस्कृतीशी  निगडीत छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारे मोठे मोठे आनंद !

लागलीच त्या छोट्या मैत्रिणीच्या आईला फोन केला. विचारलं, " गिफ्ट उघडलंस ना ?  मी मेंदीचा कोन वापरून पाहिलाय. खूप छान आहे. म्हणून म्हटलं, तुला विचारावं.  तू, तुझ्या मुलीनं तो वापरला की नाही ?" 

छोट्या मैत्रिणीनं तो वापरला होता. तिने रंग भरले होते स्वतःच्या हातावर आणि तिच्या आईच्याही हातावर ! 

मी गुणगुणत राहिले,  " मेंदीच्या पानावर..... मन अजून …. "


No comments:

Winter special Bajra Ladoos

Ingredients:- 3 cups bajra flour, 1.5 cup grated jaggery, approx. 1 cup ghee, 1 tbsp cardamon powder, 2 tbsp dry ginger (soonth...