Translate

बुधवार, १४ मार्च, २०१८

"बाल आइनस्टाइन", लिखना तो बनता है !

आज १४ मार्च.

काय योगायोग आहे. आताच अल्बर्ट आइनस्टाइन यांचे चरित्र वाचून हातावेगळे झाले. आणि आजच त्यांचा जन्मदिवस !


या निमित्ताने या प्रसिद्ध शास्त्रज्ञाबद्धल काहीतरी, "लिखना तो बनता है".  म्हणून हा शब्द प्रपंच. 

आइनस्टाइन म्हणजे, E =MC२, सापेक्षता सिद्धांत, नोबेल पारितोषिक मिळवणारा शास्त्रज्ञ इतकी जुजबी माहिती माझ्याकडे होती. नाही म्हणायला कुठेतरी slow learners मुलांविषयीच्या वाचनात आइनस्टाइनचा उल्लेख आठवतोय. आणि हो ! त्यांचा वाढलेले अस्ताव्यस्त केस, जीभ बाहेर काढून हसणारा फोटो सुद्धा ! 

कसे होते ह्या शास्त्रज्ञाचे बालपण, एकूण आयुष्य या उत्सुकते पोटी वाचायला घेतले हे छोटेखानी चरित्र.



मुलांसाठी असल्याने १००-१२५ पानांचेच छोटेखानी पुस्तक आहे हे . चित्रमय आणि तळटीपा असलेले. लेखिका, फ्रीडा विशिन्स्कीने वाचकांपुढे  अल्बर्ट च्या आयुष्याचा प्रवास अगदी सहज शैलीत मांडलाय. 

कशी होती त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी?

जर्मनी येथील दानूबे नदीकाठी अल्म या छोट्या शहरात राहणारे हे आइनस्टाइन कुटुंब.  विद्युत संबंधित उपकरणे निर्मिती व त्यासंबंधी व्यापार करणारे. हर्मन आणि पौलिन या आनंदी दाम्पत्याचे अल्बर्ट हे पहिले अपत्य. वडील हर्मन हे सुस्वभावी आणि सकारात्मक व्यक्तिमत्व असलेले इंजिनिअर म्हणून परिचित होते. परंतु व्यावसायिक म्हणून बहुतांशी अयशस्वी ठरलेले.  तर आई पौलीन साहित्य आणि संगीताची आवड असलेली, महान जर्मन संगीतकार बीथोवनची चाहती. धर्माने ज्यू असणारे हे कुटुंब उदारमतवादी होते. त्यामुळे ख्रिश्चन वातावरणही सामावून गेले. 

कसा इतरांपेक्षा वेगळाच होता हा मुलगा?

१४ मार्च १८७९ ला जन्मलेला अल्बर्ट अगदी झाल्या दिवसापासून "निराळा" च होता. जन्मतः विचित्र आकाराचे आणि भले मोठे डोके असणारा. कालांतराने ते सामान्य झाले पण त्याच्या आतील ठेवण ही असामान्यच राहिली असं  म्हणायला हरकत नाही. डोके बाहेरून ठीक झाले तरी एकूणच मुलाचे वागणं हा हर्मन आणि पौलिन साठी काळजीचाच भाग होता. 

डोके ठीक झालं आता हा अल्बर्ट बोलेनाही, त्यामुळे तो मानसिक विकलांग आहे का अशी भीती, शंका त्या आई-बाबाला वाटू लागली . अल्बर्ट बोलायलाही बराच उशिरा लागला. पुढे अनेक वर्षांनी तो स्वतः म्हणतो," जेव्हा मी २-३ वर्षांचा होतो तेव्हा ठरविले की आपण पूर्ण वाक्य बोलायचं. मग मी ते मनात म्हणून पाहायचो आणि जर बरोबर वाटलं तरच मोठ्याने ते बोलायचो " 

कालांतराने मुका अल्बर्ट बोलूही लागला. पण काही अचाट प्रश्न विचारायचा. तीन वर्षाच्या अल्बेर्टने आपल्या नवजात बहिणीला, माजा हीला प्रथम पाहिले तेव्हा काय म्हणावं ?, "हिची चाके कुठे आहेत?" :-) त्याला वाटले माजा हे खेळणंच आहे. त्याचे असले बोलणं, प्रश्न  हे आता त्या पालकांच्या पुढील आव्हान होते. तेही  त्यांनी लीलया पेलले. 

मुलं थोडी मोठी झाल्यावर, आई पौलीनने लेकीला पियानो आणि लेकाला व्हायोलिन च्या शिकवणी साठी दाखल केले. नियमात बसणे न मानणाऱ्या अल्बेर्टला तो सराव करत राहणे पसंत नव्हते. एकदा तर रागाच्या भरात याने त्या शिक्षकांच्या अंगावर खुर्ची फेकली ! पण पौलिन पण त्याचीच आई होती. तिने लेकाला अजून कडक शिक्षकाकडे सुपूर्द केले. तेव्हा मात्र अल्बर्ट ला काही पर्याय उरला नाही.

असंच एकदा बहीण माजा हिला सुद्धा भावाच्या रागाची शिकार व्हावं लागलं. खेळता खेळता ह्या मुलाने रागाच्या भरात बहिणीच्या डोक्यात बागेतील फावडे मारले. मोठी झाल्यावर  गमतीमध्ये माजा म्हणते, "विचारवंतांची बहीण होण्यासाठी मजबूत डोके (कवटी) आवश्यक असते". 


पुस्तकाची सुरुवातीची ही पाने  वाचताना पालक या भूमिकेतून या मुलाकडे पाहत होते मी. वाटलं, मोठं जिकिरीचंच काम अशा मुलाचे पालक होणं हे ! असाही एक विचार येऊन गेला, की,  आपल्या ' चौकटी मानणाऱ्या'  समाज व्यवस्थेत असं मूल असतं  तर कसा स्वीकार केला असता आपल्या समाजाने?.  असो. 

मन गुंतवण्यासाठी इतर गोष्टी सापडू लागल्यावर ह्याचा रागीटपणा कमी होऊ लागला. त्याचे आवडते खेळ काय ? तर, बादलीभर  पाण्यात बोट खेळणं, चाकं असलेली, हालचाल करणारी खेळणी, चित्रकोडी, ठोकळे, पट्ट्यांचे मनोरे बनवणे हे. एकलकोंडा अल्बर्ट बहीण माजा व्यतिरिक्त क्वचित कुणाशी खेळत असे. इतर मुलांप्रमाणे सैनिक-सैनिक किंवा कोणतेही शारीरिक श्रम असलेल्या खेळांची त्याला सक्त नावड होती.

अल्बर्ट पाच वर्षाचा असताना आजारी होता. तो बरा होईपर्यंत त्याला पडल्या पडल्या खेळायला म्हणून बाबा हर्मनने मुलाला दिशा दर्शक कंपास आणून दिला.  पडल्या पडल्या त्याच्याशी खेळण्यात तो रमून गेला. मोठा झाल्यावर अल्बर्ट एकेठिकाणी म्हणतो, " तो कंपास मी कधीच विसरणार नाही.  त्याचा खूप मोठा प्रभाव माझ्यावर पडला. माझ्यात विज्ञानाची आवड निर्माण होण्यात त्याचा मोठ्ठा वाटा आहे".

कसाही, कितीही हलवला तरी ह्याची सुई कायम उत्तरेकडेच कशी जाते ? हा प्रश्न बाल अल्बेर्टला पडला. त्याला तेव्हा कुठे माहिती होतं की, त्याचं सगळं आयुष्य अशाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यात रममाण होणार आहे म्हणून !


२ टिप्पण्या:

Gouri म्हणाले...

मस्त लिहिलं आहेस तृप्ती! पण किती दिवसांनी!
आई- वडिलांची परीक्षा आहे ना अशी मुलं मोठी करणं म्हणजे! :D

Trupti म्हणाले...

धन्यवाद गौरी !! हो ना अगं, खूप दिवसांनी लिहिले. परीक्षाच पालकांची १००% :-)