Translate

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

I Am Malala वाचल्यानंतर ...

केव्हापासून हे पुस्तक वाचायचं होतं. मुहूर्त पण असा मिळाला की, त्या दिवशी सकाळी आवरायला उशीर झाला आणि मुलांची शाळेची बस चुकली. भल्या सकाळी इतक्या दूर टॅक्सीने जाणं भाग पडलं. आता इतक्या लांब आलेच आहे, routine disturb झालंच आहे, तर लायब्ररीत तरी जाऊया असा विचार करून गेले लायब्ररीत. आणि ह्या "मलाला" बाई तिथे कॉउंटरवरच पुस्तकरूपात जणू माझीच वाट पाहत होत्या. भेटली बाई एकदाची, तर अशी  !

"I Am Malala " म्हणत तिने  तिची गोष्ट ह्या पुस्तकात प्रांजळपणे सांगितली आहे. तिचं लढा देणारी मुलगी असणं, इतकचं पुरेसं होतं मला ते पुस्तक वाचायला.



मलाला तिची गोष्ट तिच्या लहानपणापासुनच सुरु करते. ती तुम्ही वाचली नसेल तर वाचाच. मी मला जे भावलं, आवडलं  ते share करायचा प्रयत्न करणार आहे.

एकूणच तिच्यावर, तिच्या शिक्षक आणि तत्वनिष्ठ असलेल्या वडिलांचा प्रभाव आणि मुलीवरचा विश्वास आणि  प्रेम  जागोजागी दिसतं. मला तर ह्या  संपूर्ण कहाणीत, मुलगी आणि वडील ही महत्त्ववाची पात्र वाटली.

लहान असताना ( साधारण ७-८ वर्षांची) एकदा ती मैत्रिणीची एक वस्तू उचलून आणते. थोडक्यात, चोरी करते.  तिच्या आईच्या ते लक्षात आल्यावर ती तिची कानउघडणी करतेच. शरमेनं, मलाला स्वतःच्या खोलीत जाऊन बसते. वडील घरी परत आल्यावर त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पहात ! वडील परत आल्यावर जेव्हा पाहतात, ही मुलगी ओशाळली आहे, तिला तिची चूक कळली आहे. तेव्हा ते तिला अजून अपराधी नाही वाटू देत. उलट महान लोकांनी सुद्धा लहान असताना चुका केल्या होत्या याचे दाखले  देतात आणि त्यातुन धडा घेणे महत्त्वाचे हे पटवून देतात.

इतर मुस्लिम मुलींप्रमाणे चेहरा पडद्यामागे ठेवायला ही मुलगी जेव्हा नापसंती दाखवते तेव्हाही तिचे वडील तिचे समर्थन करून म्हणतात, " Malala will live as free as a bird. " मनसोक्तपणे हवेत  उडणाऱ्या पतंगाला जसं अचानक कुणीतरी जमिनीवर आदळत, तसंच आपल्यालाही आपण मुलगी असल्यामुळे ठराविक सामाजिक बंधन, ठराविक भूमिका पार पाडाव्या लागणार ही जाणीव ह्या मुलीला तेव्हा होते. पण पुन्हा खंबीर वडील पाठीशी असल्यामुळे ही मुलगी " I am Malala" हे अभिमानाने म्हणू शकते ह्याचे अनेक दाखले इथे मिळतात. एका अर्थी प्रत्येक मुलीच्या बापानं अन आईनेही हे वाचायलाच हवं असं मी म्हणेन.

पाकिस्तानी मुस्लिम स्त्रिया आणि वेशभूषा, केशभूषा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबद्धलही मलाला तिची निरीक्षणे नोंदविते. आणि  ह्याच पडद्यातील स्त्रिया जेव्हा जनानखान्यात स्वतःला व्यक्त करतात. मोकळ्या होतात. तेव्हा एक नवीन जगच पाहिल्यासारखं वाटलं असं म्हणते. ह्यातून पाकिस्तानी मुस्लिम स्त्रियांच्या अंतःपुरात कसं वातावरण असतं याची झलक मिळते.

मलाला जेव्हा स्वात (मूळ संस्कृत 'सुवास्तू' नावापासून स्वात ) खोऱ्याबद्धल, तिच्या घराच्या आजूबाजूच्या परिसराबद्धल लिहिते ते वाचून मन हळवं होतं. इतका नैसर्गिक सौंदयाने नटलेला, बौद्ध विचाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला सुंदर प्रदेश एकेकाळी भारताचाच  एक भाग होता हे वास्तव स्वीकारायला लागतं. ते जड जातं. त्याची आजची दुर्दशा अस्वस्थ करते. आणि भारत-पाकिस्तान फाळणी बद्धल डोक्यात प्रश्न आल्याशिवाय राहत नाही. असो ! जुन्या वेदना !

संवेदनशील मन,  सारासार विचार, सामाजिक जबाबदारीचं भान, परिवर्तन करण्याची इच्छा आणि शक्य त्या प्रयत्नांची जोड हे भांडवल घेऊन ही मुलगी जगत आली आहे. हे सुद्धा तिच्या लहानपणाच्या प्रसंगातून दिसतं. तसे बहुतांशी आपण सगळेच असेच असतो लहानपणी असंही वाटलं. नंतरच गाड्या वेगवेगळी वळणं घेतात. मलालाच्या गाडीला turning point मिळाला तो स्वात खोऱ्यात तालिबान च्या येण्याने !

तालिबानने मुलींच्या शिक्षणाला बंदी करूनही, धमक्या देऊनही मलालाचे वडील त्यांची शाळा आणि मुलींचे वर्ग, शिक्षण सुरूच ठेवतात. यावरून ह्या मुलीचे ध्येयनिष्ठ वडील तिचे हिरो, आदर्श आहेत हे दिसतंच. पुस्तकात वर्णन केलेला तालिबानचा दहशतवाद बातम्या मधून पाहिलेला, वाचलेला  होताच.  तो व्यक्तिगत मलालाच्या चष्म्यातून वाचायला मिळतो.

रात्रीच्या वेळी होणारे बॉम्ब हल्ले अनुभवताना, त्यांना सामोरं जाताना  भेदरलेल्या मलाला ला तिचे बाबा सांगतात, " At night our fear is strong. But in the morning, in the light, we find our courage again." हे अगदीच भिडलं, आवडलं.  हे म्हणजे बापानी आपल्या अनुभवाची शिदोरी लेकीला वाटणं, देणं. जाणीवपूर्वक पालकत्व, संगोपन ते हेच की !

मलालाच्या नेतृत्व गुणाला वाव, सुरुवात शाळेतून झाली. तालिबान च्या दडपशाहीच्या विरोधात,  मुलींच्या शिक्षणाची गरज यावर शाळेत या मुली भाषणे देऊ लागल्या. आणि बघता बघता प्रसारमाध्यमातून बोलू लागल्या. आरशासमोर उभे राहून भाषणाची प्रॅक्टिस करणारी मलाला हळूहळू सर्रास भाषणे देऊ लागते.

साधारण ७-८ वर्षाच्या मुला-मुलींना सुद्धा स्वतःत ही मलाला भेटेल. त्यांनी तर नक्कीच वाचावी ही मुलगी.

परिस्थितीने ह्या मुलीला खूप लवकर mature बनवलं, व्हायला भाग पाडलं असंही वाटून जातं.  पाकिस्तान, मुस्लीम, मुस्लीम स्त्रिया या बद्धल ज्यांची मतं एकांगी, टोकाची आहेत त्यांनी सुद्धा जरूर वाचाव हे. तुमच्या माहितीत असं कोणी असेल तर त्यांनाही जरूर वाचायला सांगावं हे .

इंग्लिश सुधारण्यासाठी Ugly Betty पाहणारी मलाला एक नवीन विश्वच पाहते.  अमेरिकन स्त्रियांच्या समान हक्कांबद्धल जे मत मांडते ते विचार करण्याजोगेच. इतक्या मुक्त समाजातील ह्या स्त्रिया पण त्यांचाही showpiece सारखा वस्तू विकण्यासाठी वापर होतोय म्हणजे अजून त्यानाही समान हक्क मिळालेला नाही. पुढे त्यांच्या आखूड कपड्यांवरही तिला प्रश्न पडतो की अमेरिकेत कापड टंचाई आहे की काय :-) स्वातंत्र्याच्या, समानतेच्या व्याख्या देश-काळ-समाज परत्वे बदलत राहतात.  हे अजून ह्या पोरीला कळायचं वय नाहीच हेही जाणवतं.

एकूण घटना अशा घडत जातात आणि पाहता पाहता प्रसारमाध्यमांच्या प्रसारातून ही मुलगी पाकिस्तान मधील स्टार होत जाते.  ती तिला असणारी राजकीय नेतृत्व करण्याची आवड मोकळेपणाने व्यक्त करते आणि आपण पाकिस्तानच्या भावी पंतप्रधानाचे आत्मचरित्र वाचत आहोत असं वाटायला लागतं. ह्या child celebrity चा पुढचा प्रवास कसा होतोय त्याबद्धल कुतूहल निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.

नंतर तिच्यावरचा जीवघेणा हल्ला आणि मृत्यूच्या कचाट्यातून तिची सुटका हे कादंबरी वाचण्यासारखं रोमांचकारी. तिच्यावर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे तिला जीवदान देणारे मानवी रूपातील देवचं !

जेव्हा युनाइटेड नेशन्स मध्ये मलाला बोलते तेव्हा, I don't want to be thought of as "the girl who was shot by the Taliban" but as "the girl who fought for education" हे मांडते तेव्हा तिला सॅल्यूट ठोकावा वाटतं. Its nothing but denying to play victim.

तिच्यावर झालेल्या हल्ल्यातून ती वाचली. ती सध्या सुरक्षिततेच्या कारणांनी इंग्लंड मध्ये राहते आहे. तिचे वडील पाकिस्तानचे  education attache म्हणून एम्बसीत काम करत आहेत. ह्यावर आता जे लोक आरोप, टीका करतात की मलालाच्या वडिलांनी परदेशात राहायला मिळावं म्हणून मुद्धाम हा हल्ला घडवून आणला.  ते वाचून खंत वाटते की कुणीतरी आपल्यापैकीच इतका पुढे निघून गेलेला स्वीकारायला संकुचित मनं तयार होतंच नाहीत. असो !

एकूण काय तर तुम्ही अजून हे वाचलं नसेल तर नक्की वेळ काढून वाचा हे पुस्तक. तुम्हाला कदाचित अजून वेगळंच काहीतरी सापडेल, क्लिक होईल. :-)

तृप्ती
सिंगापुर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: