गेले काही दिवस ह्या कवितेच्या / गाण्याच्या ओळी डोक्यात घोळतायत. मनातल्या मनात गुणगुणते आहे. ते शब्द , तो स्वर, ते संगीत..
हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समयीमधुनी........
बऱ्याच दिवसांनी आज जरा 'आत' डोकावायला वेळ मिळाला. जरा शांत, निवांत.
परत तीच गुणगुण.
पण सचित्र अनुभूती ! तो थरथरता हात त्या ओळींसोबत पाठीवरून फिरला !
आजीचा तो थरथरता हात ! तिला जाऊन आता २ महिने होऊन गेले. वय खूप झालं होतं तिचं. थकलेलीही होती.
ती गेली तेव्हा काही जाता नाही आले तिला शेवटचे पाहायला.
तिच्या माझ्या शेवटच्या भेटीत, मी परत येताना तिला नमस्कार केला. तेव्हा पाठीवरुन फिरलेला तिचा तो थरथरता हात, तो स्पर्श ! मला आवडतोय जपायला. ती आठवण, तो स्पर्श मनाच्या कोपऱ्यात त्या ओळींसोबत जोडली गेलेय.
तशी कडक स्वभावाची होती ती. पण शेवटी शेवटी खूप मऊ झाली होती. असा मऊपणा, माया, खोल ओढ तिच्या नजरेतून, स्पर्शातून तेव्हाच जाणवली होती. डोळे पाणावून गेली होती.
म्हणूनच कि काय ते मनात जपून ठेवलंय.
हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायाने फिरला
देवघरातील समयी मधुनी.... अजून जळती वाती
अशी पाखरे येती !
तो थरथरता हात, ती माया...
माझं मोरपीस !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा