Translate

Singapore Diary लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Singapore Diary लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २८ जुलै, २०२०

संवाद स्वतःशी सकाळी-सकाळी

शब्द सुद्धा आधारच आहेत. 
भावना, विचार व्यक्त करण्याचे . 
त्यातही अनावश्यक अडकायला, गुंतायला होत अधूनमधून. 
आताशा तेही आधार काढून टाकावेत का असा विचार येतो कधीतरी. बाह्य गोष्टींमुळे होणाऱ्या अंतर संवेदना या आतच ठेवाव्यात का असाही प्रश्न पडतो.... 
काही अंशी हरकतही नाही तसं करायला.

बाकी वेळी मेख आहे ती वेगळीच.
 ह्या समाज माध्यमांच्या काळात, नंबर ऑफ followers च्या गणितात ह्या वचनाची आवर्तने करायला हवीत. 
अंगी भिनवायला हवंय. जमेल का  तेही सरावानें ?

।। कर्मणयेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।।
।। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ।।

तृप्ती
२ मे २०२०

गुरुवार, २३ जुलै, २०२०

“लक्ष्मीची पावलं निघताना”



सामानाचं जवळपास सगळं पॅकिंग झालयं. अगदी शेवटचा टप्पा म्हणजे स्वयंपाकघर. इथे असेपर्यंत काही दिवसांसाठी लागणारं डाळ-तांदूळ, मसाले इत्यादी जुजबी सामान पॅकेर्स च्या हाताला लागणार नाही असं वेगळं ठेवलंय. 

भुक लागलेय म्हणून नाश्ता करायला बसले होतें. तेवढ्यात मदतनीस बाई आली आणि विचारलं, “ मॅडम, यह झाडू नहीं लेके जाओगे क्या ?”  तिच्या बोलण्याचा रोख काय आहे याचा नेमका अंदाज घेत होतें. तितक्यात ती म्हणाली, “ झाडु छोडके नहीं जाओ मॅडम, साथ लेके जाओ. हमारे संस्कार में तो ये लक्ष्मी हैं." 
ही बाई आहे दार्जिलिंगची हिंदू. 

मी तिला म्हणाले, “ संस्कार में तो हैं, लेकिन कितना और क्या-क्या सोचेंगे ?” तर म्हणे, “ मैं ने तो धोके रखा हैं. आप ले जाओ." 
तिला विचारलं, इथे उरलेले काही दिवस कसं झाडणार ? तर म्हणे, “ वो प्लास्टिक के झाडु सें करेंगे." आता असा इमोशनल बॉल तिने टाकला, ज्यानं मी चीत झालेय. ते झाडूही येतील आता माझ्या पुढच्या प्रवासातही बरोबर !

माझा, तो तिनें जीव लावलेला झाडु म्हणजे पक्का भारतीय आहे. घर झाडल्याचं समाधान देणारा. बाकी परदेशात आपल्याला हवा तसा झाडु मिळणंही दिव्य असतें. असा माझा आज पर्यंतचा अनुभव. 

झाडूला पाय लागला तरी त्यालाही नमस्कार करण्याच्या संस्कारात वाढलेलो आपण. झाडू म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक. झाडूची पुजा करतो आपण. हे सगळं तर आहेच. 

पण या संवादाच्या अनुषंघाने, आपली प्रतीकं, समजुती आणि त्या मागचा स्वास्थ्याचा विचार, हा माझा ट्रिगर ओढला गेलाय.

 म्हणजे कसं ना, झाडू स्वच्छता करण्याच्या कामात मदत करतो. आपण जिथे राहतो ती वास्तू, तो परिसर हा स्वच्छ असला तर मानसिक-शारीरिक स्वास्थ्य राहणार. म्हणजे हा विचार देण्यासाठी, “स्वच्छता आणि स्वास्थ्य”, यांचं नातं सांगणारा हा दुवा म्हणजे झाडु, लक्ष्मी. ?जेव्हा ” आरोग्यम धनसंपदा” म्हणतो तेव्हा स्वास्थ्य हे धन/लक्ष्मीचंच रूप आहे की ! 

जगभरातील ही विविध प्रतीकं, समजुती, त्याला जोडून येणाऱ्या सवयी यामागचा मूळ विचार शोधायला आवडतं मला. आणि तो सापडला की, मी माझी मलाच, भेटल्यासारखी वाटते. 

वाटत रहातं हे सगळं जपलं पाहिजे, पुढच्या पिढ्यांपर्यंत मूळ विचारासह गेलं पाहिजे. प्रतीकं-समजुती- संस्कार- त्या मागचा संवर्धनाचा, संरक्षणाचा मूळ विचार ह्या साखळीसह, पुन्हा पाश्चात्त्यांकडून ते शिकायची वेळ येऊ नये म्हणुन ! 

-तृप्ती 
https://truptiindia.blogspot.com/?m=1

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

My life my yoga !

Happy moment for me.. Got 1st Prize in MLMY vblogging competition in Adult female category from Singapore. 

It was a pleasure to share my yoga story via this video blogging Competition. I hope my story will lead others too, towards the great path of yoga. Praying, let this journey take us towards Health, happiness and peace within and around.😇🥇  



मंगळवार, २४ मार्च, २०२०

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा


सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ! विषाणूच्या विळख्यातून सर्वांची सुटका होवो. हीच गुढी चरणी प्रार्थना !
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥🙏 


गुरुवार, १२ मार्च, २०२०

“द बॉय ऍट द टॉप ऑफ द माउंटन”

“द बॉय ऍट द टॉप ऑफ द माउंटन” हे जॉन बॉयन या आयरिश लेखकाचं पुस्तक आत्ताच वाचून झालंय. आवडलं मला. त्याच्या आधी ” वाचलेल्या “द बॉय इन स्ट्राईप्ड पजामाज” (pajamas) पुस्तकाइतकंच. 

पुस्तकाचा केंद्रबिंदू एक ७ वर्षाचा मुलगा आहे. त्याचीच गोष्ट आहे. त्याच्या भरडल्या गेलेल्या बाल्याची. सुरुवातीला त्या लहानग्याच्या वेदना, हालअपेष्ठा वाचून डोळ्यातून पाणी आलं,  विशेषतः  जेव्हा तो अनाथ होतो तेव्हा. वेदना वाचायला नको वाटल्या,  पण मन घट्ट करून वाचलं पुढे.

पुस्तकांची ताकद असते वाचणाऱ्याला वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याची. तसं हे पुस्तक घेऊन गेलं मला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया एकूण युरोपात. हिटलरच्या आजूबाजूला. संपूर्ण कथानक जगले ते वाचताना.

लेखकाची ताकद दाद आणि धन्यवाद देण्यासारखीच. ऐतिहासिक कादंबरी या सदरात मोडणारं हे पुस्तक. वाचनाची आणि त्यातही इतिहासाची आवड असणाऱ्यांनी वाचावं असं. युद्ध का  नकोत या प्रश्नाचं उत्तरही ही कादंबरी देते. 



मला गेले ३/४ दिवस वेगळ्या जगात जायची संधी मिळाली. चार नवीन गोष्टी कळल्या, भांडार अजून समृद्ध झालं. अजून काय पाहिजे ’ आनंदी आणि अर्थपूर्ण’ जगायला ? आणि हो, माझ्या १२ वर्षाच्या मुलाशी ‘connect’ होता आलं, कारण त्याला खूप आवडलं हे पुस्तक म्हणून त्यानं मला वाचायला suggest केलं. आम्हाला बोलायला एक नवीन विषय! 

पुस्तकाचं कथानक मुद्धाम सांगत नाही. जमेल त्याने वाचावं असं आहे हे नक्की ! 

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

बोलक्या भिंती

भिंती सुद्धा खूप बोलक्या असतात
 मग त्या शाळेच्या असोत, 
सरकारी असोत, घराच्या 
किंवा कोणत्याही वास्तूच्या!

त्या वास्तूत वावरणाऱ्या, 
त्या भिंती सजवणाऱ्या व्यक्तींचं त्या प्रतिबिंब असतात. 
उभ्या असतात ताठ  मानेनं 
त्यात वावरणाऱ्या व्यक्तींच्या 
श्रद्धा, मूल्य, विचारसरणी, जीवनशैली इत्यादी अंगाखांद्यावर बाळगून वर्षानुवर्षे 
किंवा बदलतही राहतात साजशृंगार. 
ते  अवलंबून असतं त्यात वावरणाऱ्या व्यक्तिंवर, त्यांच्या भावविश्वावर. 
त्या वास्तूत येणारा तिथे किती रमतो, 
हे ठरवायची ताकद असते त्यांच्यात.
भिंती सुद्धा खूप बोलक्या असतात.
पाहणाऱ्याचे  डॊळे आणि मनाची कवाडं  उघडी असली तर ! -

तृप्ती

Clearing Clouds!



मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

Monster- in-law




काल नेटफ्लिक्स वर एक मस्त हलका फुलका सिनेमा पाहिला. Monster-in-Law! 

सिनेमा पाहण्यापूर्वी इंटरनेट वर त्याचं रेटिंग चेक केलं होतं.  सुमारच होतं. पण केवळ comedy या सदराखाली असल्याने  आणि नावाजलेल्या अभिनेत्रींमुळे पाहायचे ठरवले. सासूच्या भूमिकेत जेन फोंडा आहे तर सुनेच्या भूमिकेत जेनिफर लोपेझ.

चार्ली (जेनिफर लोपेझ ) हि एकाच वेळी व्यावसायिक, identity (?) च्या बऱ्याच टोप्या घातलेली तरुणी. ती फॅशन designer, योगा इंस्ट्रूक्टर, temporary वर्कर असे बरेच उद्योग करणारी प्रांजळ, साधी -सरळ मुलगी. 

एकदा समुद्र किनारी "पेहली नजर में पहला प्यार हो गया" होतं आणि एका सर्जनच्या प्रेमात पडते. वॊ भी,  यथावकाश "उसकी आखोंमें डूब जाता हैं " अस हे सगळे टीपिकल प्रास्ताविक.

मुलगा त्याच्या प्रेयसीला घेऊन आपल्या आईला भेटायला घेऊन जातो. तिथून खऱ्या अर्थी धम्माल सुरु होते. कारण त्याच्या आईला हि साधी मुलगी पसंत पडत नाही. प्रेमात पडलेला मुलगा हातातून निसटून जाणार ह्या भीतीतून मग ती 'कबाब में हड्डी ' होऊन भरपूर खोड्या काढते. 

कुटुंब, नाती यापेक्षा स्वतःचे करिअर अधिक आवडणारी व्हायोला अका सासू  न्यूजरिडर पदावर काम करत असते.  आता तिच्या वयानुसार, एका तरुण मुलीला भरती करून, व्यायोलाची पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली असते. त्यामुळे आधीच दुखावलेली, पायाखालची जमीन सरकलेल्या अवस्थेतली हि असुरक्षित सासू एका नंतर एक खोड्या काढून चार्ली ला आपल्या मुलाशी लग्न करण्यापासून परावृत्त करायचे जमतील तेवढे सगळे प्रयत्न करते. हे सगळे प्रयत्न आणि हे लक्षात आल्यानंतर तिची जिरवण्यासाठी सुनेने काढलेल्या खोडया हे सगळं मजेशीर आहे. सिनेमाच्या शेवटी ह्या मॉन्स्टर इन लॉ ला मॉन्स्टर पद सोडून मदर इन लॉ व्हावे लागतें. 

 २००५ मधला हा सिनेमा रोमँटिक कॉमेडी सदरापेक्षा अगदी आपल्याकडच्या सासू सुनांच्या (तू तू मैं मैं ) चीच इंग्लिश आवृत्ती वाटली.दीड तासाचा हि जुगलबंदी पाहताना मजा आली. मानवी स्वभाव, नातेसंबंध ह्याच खुसखुशीत चित्र मला तरी आवडलं. एकदा तरी नक्की बघण्यासारखा आहे हा सिनेमा. 


सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

उंच झाडं, उंच माणसांसारखी ?

काही झाडं उंच वाढली की,
त्याची पानं ‘अनरिचेबल’ होतात.

काही माणसांसारखी ?

- तृप्ती
७ फेब्रुवारी 2020 

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९

ती,

"ती".

त्या वाड्यातल्या छोट्याशा खोलीत, फरशीवर बसलेली. भिंतीला टेकून. गुडघे दुमडून, छातीशी कवटाळून. शून्य नजर समोरील भिंतीवर खिळवलेली. कुठेतरी हरवल्यासारखी. वेगळ्याच विश्वात.

ओळखूच आली नाही ती. हीच ती ? विश्वासच बसेना.

मन मागे गेलं. तिला शोधत. पाणी बरंच डोक्यावरून गेलं होतं. ६-७ पावसाळे लोटले होते तिला पाहून. तो शोधू लागला. त्या हरवलेल्या तिला..

त्याच्या वर्गात होती ती. तिला पहिल्यांदा पाहिलं ते अकरावीत असताना. कॉलेजचे सुरुवातीचे दिवस होते ते.

व्हरांड्यात उभ्या असणाऱ्या मुलींच्या घोळक्यात ती सुद्धा होती, वेगळीच. उठून दिसणारी.  "ती".  काळी-सावळी, जेमतेम ५ फूट उंची असलेली, बारीक अंगकाठी.  चक्क परकर पोलकं घातलेली, तेल लावून केस घट्ट बांधलेली, जणू वेगळ्या जगातून आलेली. पण, त्या सगळ्या दिसण्यात नीटनेटकेपणा होता. लक्ष वेधून घेतलेली ती. तो पहातच राहिला तिला.  दिसलं त्याला, तिच्या देहबोलीत, नजरेत बरंच काही!  कुतूहल , उत्सुकता, प्रांजळपणा आणि शहरी मुलींच्या नजरेत न आढळणारंही अजून काहीतरी. जसजशी तिच्याशी ओळख होत गेली तसतशी ती अधिकाधिक उमगू लागली.

मराठी वाङ्मयाच्या तासाला ती असायची त्याच्या वर्गात.  नेहमीप्रमाणे ती पुढल्या बाकावर आणि तो मागल्या. हरवायची जणू ती त्या तासाला स्वतःत. आणि तो  हरवायचा स्वतःला, तिच्या हरवलेपणात. मराठी वाङ्मय शिकवणाऱ्या प्राध्यापिकेच्या प्रेमात होती जणू ती. भक्त त्यांची. एकदा तास संपल्यावर कानावर पडलेलं हे, ती तिच्या English Literarture घेतलेल्या मैत्रिणीला सांगत होती, " आमच्या देव मॅडम कित्ती सुंदर दिसतात. कसलं भारी बोलतात. मला तर बाई लई आवडतात." कोपऱ्यात उभं राहून तो ऐकत होता.   पहात होता. ते "लई " तिच्या चेहऱ्यावरून किती ओसंडून जात होतं ते.

एकदा तिच्याकडून वही मागितली होती तिची notes घेण्यासाठी. तो त्या तासाला हजर नव्हतो तेव्हा. मोघम बोलणं झालेलं तिच्याशी. ग्रामीण भागातलं कुटुंब तिचे. शेतकरी, गवळी असलेलं. गावचे पाटील. पोटापाण्यासाठी,  मुलांच्या उच्य शिक्षणासाठी शहरात आलेलं. तिची आई गावाकडेच असायची. शहरात तिचे ३ भाऊ आणि वडील राहायचे. एका भाड्याने घेतलेल्या खोलीत.

कॉलेजच्या सुरुवातीचे काही दिवस ती ‘तशीच’ दिसायची. तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात निराळी. काही महिने असेच गेले. वेळेवर येणारी, वेळेत जाणारी, पहिल्या बाकावर बसणारी ती. समूहाचा भाग होऊ पाहणारी. काहीशी गंभीर ती. एकूणच तिचं अस्तित्व कायमच तिच्याकडे खेचत राहिलं त्याला. कुतूहल निर्माण होत होतं तिच्याविषयी. पाहत होता तिला तो मैत्रीच्या नात्यातून. नंतर एकदोनदा कॅन्टीन मध्ये भेटला होता. smile देण्यापलीकडे फारसं ना ती बोलली, ना तो

अजून आठवतंय ते, जेव्हा तिला पाहिल्यावर  तो जागेवरच उभा राहिला, काही क्षण. हीच ती ? सलवार -कमीज, ओढणी घातलेली, धुतलेले अर्धवट बांधलेले केस आणि नजरेत नवा आत्मविश्वास. "I am part of the group" हि भावना. तिचा शहरातलें हवामान चांगलंच मानवले होते तिला. रंगही उजळला होता थोडा. बदलत होतं जग तिचं.

तिच्या बाह्य पेहरावाबरोबर तिची भाषाही हळूहळू बदलत चालली होती. तिच्या देवाचं ती अनुकरण करत होती. सुरवंटाचं फुलपाखरू होत होतं जणू. सोनेरी स्वप्नांचा काळ तो. दोन वर्ष अशीच पाखरासारखी उडून गेली. तिला पंख देऊन. आणि एक दिवस अचानक......

"बस्स झालं तुझं कालेज-फिलेज. निघा गावाला परत." मोठा भाऊ म्हणत होता. ती सांगत होती तिची व्यथा.

कदाचित, तिचं लग्नाचं पहात असतील. कदाचित, त्या उडू पाहणाऱ्या फुलपाखराची, त्या मानसिकतेला भीती वाटत असेल ? त्याला वाटून गेल अस काहीबाही.

ती बदलत होतीच. आव्हान तिच्या नजरेत, वाणीत, देहबोलीत उतरलं होतं. स्वतःची मतं बनली होती तिची. तिला नव्हतंच जायचं परत गावाकडं  !

जेव्हा ती आजूबाजूच्या मुलांच्या शिकवण्या घेऊ लागली तेव्हा मात्र ठिणगीच पडली जणू. गावाकडं जायला नाही म्हणते, शहरातल्याच मुलाशी लग्न करेन म्हणते आणि आता शिकवण्या ?

हे सगळं आपल्या हातातून निसटतंय म्हटल्यावर, ती शब्दांनी ऐकेना म्हंटल्यावर तिला मारहाण सुरु झाली. पाहता-पाहता, हे मारहाण सत्र दैनंदिन होऊ लागलं. हाती लागेल ते घेऊन ती मानसिकता तिच्यावर शारीरिक बळाचा प्रयोग करत होती.

काही काळ असं सोसून अखेर ती लग्नाच्या बंधनात बांधली गेली. नंतर परत कधी दिसायचं कारणच नव्हतं. त्यांच्या एका कॉमन मैत्रिणीकडून तिच्या बातम्या मिळायच्या. ती गावाकडं शेती करते म्हणून. तिला मुलगा झाला म्हणून.

आज समोर अशा अवस्थेत बसलेली ती. शून्य, कोरडी नजर.

मानसिक आजारावर उपाय म्हणून शहरात आणलं होतं तिला. तिच्या छोट्याला तिच्या सासरी ठेवून. काहीतरी बडबडत होती ती स्वतःशीच. बहुधा तिच्या मुलाविषयी. त्याच्यापासून तोडलं होतं त्यांनी तिला आणि दिलेलं पाठवून तिला माहेरी. ती वेडी म्हणून. 'वेड्याच्या' डॉक्टरला दाखवायला.

मी पहातच राहिलो. तिच्याकडे. भूतकाळात मागे वळून पुन्हा-पुन्हा .

वाडे पडले. इमारती झाल्या. पसरले भाडेकरू. इतरत्र. त्यात तिचं कुटुंबही.

पुढे तिचं काय झालं कुणालाच ठाऊक नाही. पण ती आठवत राहते अधून-मधून. एक पंख कापलेल्या फुलपाखरासारखी. एक अस्ताव्यस्त भिरकावलेल्या फुलासारखी.

ती !




सुमनांच्या मैत्रात

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

I Am Malala वाचल्यानंतर ...

केव्हापासून हे पुस्तक वाचायचं होतं. मुहूर्त पण असा मिळाला की, त्या दिवशी सकाळी आवरायला उशीर झाला आणि मुलांची शाळेची बस चुकली. भल्या सकाळी इतक्या दूर टॅक्सीने जाणं भाग पडलं. आता इतक्या लांब आलेच आहे, routine disturb झालंच आहे, तर लायब्ररीत तरी जाऊया असा विचार करून गेले लायब्ररीत. आणि ह्या "मलाला" बाई तिथे कॉउंटरवरच पुस्तकरूपात जणू माझीच वाट पाहत होत्या. भेटली बाई एकदाची, तर अशी  !

"I Am Malala " म्हणत तिने  तिची गोष्ट ह्या पुस्तकात प्रांजळपणे सांगितली आहे. तिचं लढा देणारी मुलगी असणं, इतकचं पुरेसं होतं मला ते पुस्तक वाचायला.



मलाला तिची गोष्ट तिच्या लहानपणापासुनच सुरु करते. ती तुम्ही वाचली नसेल तर वाचाच. मी मला जे भावलं, आवडलं  ते share करायचा प्रयत्न करणार आहे.

एकूणच तिच्यावर, तिच्या शिक्षक आणि तत्वनिष्ठ असलेल्या वडिलांचा प्रभाव आणि मुलीवरचा विश्वास आणि  प्रेम  जागोजागी दिसतं. मला तर ह्या  संपूर्ण कहाणीत, मुलगी आणि वडील ही महत्त्ववाची पात्र वाटली.

लहान असताना ( साधारण ७-८ वर्षांची) एकदा ती मैत्रिणीची एक वस्तू उचलून आणते. थोडक्यात, चोरी करते.  तिच्या आईच्या ते लक्षात आल्यावर ती तिची कानउघडणी करतेच. शरमेनं, मलाला स्वतःच्या खोलीत जाऊन बसते. वडील घरी परत आल्यावर त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पहात ! वडील परत आल्यावर जेव्हा पाहतात, ही मुलगी ओशाळली आहे, तिला तिची चूक कळली आहे. तेव्हा ते तिला अजून अपराधी नाही वाटू देत. उलट महान लोकांनी सुद्धा लहान असताना चुका केल्या होत्या याचे दाखले  देतात आणि त्यातुन धडा घेणे महत्त्वाचे हे पटवून देतात.

इतर मुस्लिम मुलींप्रमाणे चेहरा पडद्यामागे ठेवायला ही मुलगी जेव्हा नापसंती दाखवते तेव्हाही तिचे वडील तिचे समर्थन करून म्हणतात, " Malala will live as free as a bird. " मनसोक्तपणे हवेत  उडणाऱ्या पतंगाला जसं अचानक कुणीतरी जमिनीवर आदळत, तसंच आपल्यालाही आपण मुलगी असल्यामुळे ठराविक सामाजिक बंधन, ठराविक भूमिका पार पाडाव्या लागणार ही जाणीव ह्या मुलीला तेव्हा होते. पण पुन्हा खंबीर वडील पाठीशी असल्यामुळे ही मुलगी " I am Malala" हे अभिमानाने म्हणू शकते ह्याचे अनेक दाखले इथे मिळतात. एका अर्थी प्रत्येक मुलीच्या बापानं अन आईनेही हे वाचायलाच हवं असं मी म्हणेन.

पाकिस्तानी मुस्लिम स्त्रिया आणि वेशभूषा, केशभूषा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबद्धलही मलाला तिची निरीक्षणे नोंदविते. आणि  ह्याच पडद्यातील स्त्रिया जेव्हा जनानखान्यात स्वतःला व्यक्त करतात. मोकळ्या होतात. तेव्हा एक नवीन जगच पाहिल्यासारखं वाटलं असं म्हणते. ह्यातून पाकिस्तानी मुस्लिम स्त्रियांच्या अंतःपुरात कसं वातावरण असतं याची झलक मिळते.

मलाला जेव्हा स्वात (मूळ संस्कृत 'सुवास्तू' नावापासून स्वात ) खोऱ्याबद्धल, तिच्या घराच्या आजूबाजूच्या परिसराबद्धल लिहिते ते वाचून मन हळवं होतं. इतका नैसर्गिक सौंदयाने नटलेला, बौद्ध विचाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला सुंदर प्रदेश एकेकाळी भारताचाच  एक भाग होता हे वास्तव स्वीकारायला लागतं. ते जड जातं. त्याची आजची दुर्दशा अस्वस्थ करते. आणि भारत-पाकिस्तान फाळणी बद्धल डोक्यात प्रश्न आल्याशिवाय राहत नाही. असो ! जुन्या वेदना !

संवेदनशील मन,  सारासार विचार, सामाजिक जबाबदारीचं भान, परिवर्तन करण्याची इच्छा आणि शक्य त्या प्रयत्नांची जोड हे भांडवल घेऊन ही मुलगी जगत आली आहे. हे सुद्धा तिच्या लहानपणाच्या प्रसंगातून दिसतं. तसे बहुतांशी आपण सगळेच असेच असतो लहानपणी असंही वाटलं. नंतरच गाड्या वेगवेगळी वळणं घेतात. मलालाच्या गाडीला turning point मिळाला तो स्वात खोऱ्यात तालिबान च्या येण्याने !

तालिबानने मुलींच्या शिक्षणाला बंदी करूनही, धमक्या देऊनही मलालाचे वडील त्यांची शाळा आणि मुलींचे वर्ग, शिक्षण सुरूच ठेवतात. यावरून ह्या मुलीचे ध्येयनिष्ठ वडील तिचे हिरो, आदर्श आहेत हे दिसतंच. पुस्तकात वर्णन केलेला तालिबानचा दहशतवाद बातम्या मधून पाहिलेला, वाचलेला  होताच.  तो व्यक्तिगत मलालाच्या चष्म्यातून वाचायला मिळतो.

रात्रीच्या वेळी होणारे बॉम्ब हल्ले अनुभवताना, त्यांना सामोरं जाताना  भेदरलेल्या मलाला ला तिचे बाबा सांगतात, " At night our fear is strong. But in the morning, in the light, we find our courage again." हे अगदीच भिडलं, आवडलं.  हे म्हणजे बापानी आपल्या अनुभवाची शिदोरी लेकीला वाटणं, देणं. जाणीवपूर्वक पालकत्व, संगोपन ते हेच की !

मलालाच्या नेतृत्व गुणाला वाव, सुरुवात शाळेतून झाली. तालिबान च्या दडपशाहीच्या विरोधात,  मुलींच्या शिक्षणाची गरज यावर शाळेत या मुली भाषणे देऊ लागल्या. आणि बघता बघता प्रसारमाध्यमातून बोलू लागल्या. आरशासमोर उभे राहून भाषणाची प्रॅक्टिस करणारी मलाला हळूहळू सर्रास भाषणे देऊ लागते.

साधारण ७-८ वर्षाच्या मुला-मुलींना सुद्धा स्वतःत ही मलाला भेटेल. त्यांनी तर नक्कीच वाचावी ही मुलगी.

परिस्थितीने ह्या मुलीला खूप लवकर mature बनवलं, व्हायला भाग पाडलं असंही वाटून जातं.  पाकिस्तान, मुस्लीम, मुस्लीम स्त्रिया या बद्धल ज्यांची मतं एकांगी, टोकाची आहेत त्यांनी सुद्धा जरूर वाचाव हे. तुमच्या माहितीत असं कोणी असेल तर त्यांनाही जरूर वाचायला सांगावं हे .

इंग्लिश सुधारण्यासाठी Ugly Betty पाहणारी मलाला एक नवीन विश्वच पाहते.  अमेरिकन स्त्रियांच्या समान हक्कांबद्धल जे मत मांडते ते विचार करण्याजोगेच. इतक्या मुक्त समाजातील ह्या स्त्रिया पण त्यांचाही showpiece सारखा वस्तू विकण्यासाठी वापर होतोय म्हणजे अजून त्यानाही समान हक्क मिळालेला नाही. पुढे त्यांच्या आखूड कपड्यांवरही तिला प्रश्न पडतो की अमेरिकेत कापड टंचाई आहे की काय :-) स्वातंत्र्याच्या, समानतेच्या व्याख्या देश-काळ-समाज परत्वे बदलत राहतात.  हे अजून ह्या पोरीला कळायचं वय नाहीच हेही जाणवतं.

एकूण घटना अशा घडत जातात आणि पाहता पाहता प्रसारमाध्यमांच्या प्रसारातून ही मुलगी पाकिस्तान मधील स्टार होत जाते.  ती तिला असणारी राजकीय नेतृत्व करण्याची आवड मोकळेपणाने व्यक्त करते आणि आपण पाकिस्तानच्या भावी पंतप्रधानाचे आत्मचरित्र वाचत आहोत असं वाटायला लागतं. ह्या child celebrity चा पुढचा प्रवास कसा होतोय त्याबद्धल कुतूहल निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.

नंतर तिच्यावरचा जीवघेणा हल्ला आणि मृत्यूच्या कचाट्यातून तिची सुटका हे कादंबरी वाचण्यासारखं रोमांचकारी. तिच्यावर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे तिला जीवदान देणारे मानवी रूपातील देवचं !

जेव्हा युनाइटेड नेशन्स मध्ये मलाला बोलते तेव्हा, I don't want to be thought of as "the girl who was shot by the Taliban" but as "the girl who fought for education" हे मांडते तेव्हा तिला सॅल्यूट ठोकावा वाटतं. Its nothing but denying to play victim.

तिच्यावर झालेल्या हल्ल्यातून ती वाचली. ती सध्या सुरक्षिततेच्या कारणांनी इंग्लंड मध्ये राहते आहे. तिचे वडील पाकिस्तानचे  education attache म्हणून एम्बसीत काम करत आहेत. ह्यावर आता जे लोक आरोप, टीका करतात की मलालाच्या वडिलांनी परदेशात राहायला मिळावं म्हणून मुद्धाम हा हल्ला घडवून आणला.  ते वाचून खंत वाटते की कुणीतरी आपल्यापैकीच इतका पुढे निघून गेलेला स्वीकारायला संकुचित मनं तयार होतंच नाहीत. असो !

एकूण काय तर तुम्ही अजून हे वाचलं नसेल तर नक्की वेळ काढून वाचा हे पुस्तक. तुम्हाला कदाचित अजून वेगळंच काहीतरी सापडेल, क्लिक होईल. :-)

तृप्ती
सिंगापुर 

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

एक ड्राइवर, सिंगापूर मधला !



परवा रविवारी सहकुटुंब एका restaurant मध्ये जेवायला गेलो होतो. टॅक्सिने परत आलो. चिनी वंशाचा टॅक्सी ड्रायव्हर.  त्याचे payment करून उतरायला लागलो होतो.

तेवढ्यात,  तो टॅक्सी ड्राइवर म्हणाला, " भगवान आपको और आपके परिवार को खुश रखें "!

ते अस्स्खलित हिंदी ऐकून आम्ही चाटच !!! 

"विकेट पडणं, दांडी गूल " असले जे जे काही शब्दप्रयोग  असतील त्याची प्रचितीच म्हणा ना ! 

अशा प्रसंगी त्या कर्त्यांची जी आश्चर्याच्या धक्क्याच्या मानसिक अवस्था असते तशीच आमची झाली. 
Y
Where did you learn hindi? माझा  स्वाभाविक प्रश्न. 

"From Indian passengers" त्याचे नम्र उत्तर. 

मजाच वाटली त्या ड्रायव्हरची. आणि कौतुकही.  

मग एकूण आमचा प्रतिसाद पाहता, त्यालाही त्याच्या हिंदीचा सराव करावासा वाटला बहुतेक. 

कारण त्या नंतर त्याने , " भगवन आपको लम्बी उम्र दे" असा हिंदीत आशीर्वाद देऊन आमचे मन जिंकून घेतलं. 

"आप इंडिया में कहाँसे है ?, 

"मै बिहार गया था"

"मैं शाकाहारी हूँ "

असली एका पाठोपाठ प्रश्न, वाक्य हिंदीत सहजपणे  जणू फेकत होता नुसती आमच्या अंगावर . 

आता नुसतं हिंदी बोलून थांबावं ना बाबानी ! पण नाही !!

त्याने त्याच्या जवळचा फोटोचा अल्बम माझ्या हातात टेकवला. मग मी पण गाडीतुन उतरायला निघालेली थांबले. घेतला तो अल्बम हातात उत्सुकतेने. वरवर चाळला. फोटोत स्तूप दिसले. आणि तो ड्राइवर बुद्धिस्ट भिक्षुकाच्या वेशात ! (बिहार म्हटल्यावर बोधगया असणार) त्याचा अल्बम त्याला साभार परतवला. पण थांबा ! अजून एक गंमत त्याच्या पोतडीत होती. 

"में आपको मंत्र में blessings देता हूँ " म्हणाला.  आणि चक्क पाली भाषेत, मंत्राच्या विशिष्ट सुरावटीसह, जवळपास १ मिनिटे,  न थांबता त्याने मंत्रोच्चरण करत आमची उरली सुरली विकेट, दांडी पण उडवून टाकली. आता त्याच्यापुढे हात जोडायचेच बाकी होतं. 

त्याला धन्यवाद दिले. आणि मी पण त्याच्याशी चिनी भाषेत बोलून त्याला धक्का दिला. 

सगळा  प्रसंग ४ एक मिनिटांचा.  पण खूप काही देऊन गेला. भरपेट खाऊन आलेल्या मनावरची सुस्ती उडवून गेला.  

बीजिंग मध्ये असताना समर पॅलेस मधल्या अनुभवाची आठवण देऊन गेला. तिथेही असच अचानक कानावर , "आवारा हूँ ", गाणं कानावर पडलं होतं. त्या शब्दांच्या, त्या तल्लीनतेने गाणाऱ्याच्या आवाजाच्या ओढीने त्या गाणाऱ्या जवळ गेलो होतो. 

आता हे लिहितानाही ते सगळं आठवून त्या अनुभवांची पुनरावृत्ती होतेय. छान वाटतयं.  

रोजचं रहाटगाडगं विसरायला लावणारी अशी माणसं आयुष्यातले काही क्षण उजळवून टाकतात. बरंच काही सांगून जातात. "भेटगाठ" घडवून आणतात. भर दुपारच्या उन्हात चालताना कुठूनतरी अचानक भेटणारा मोगऱ्याचा गंध, अचानक आलेल्या पावसाने आसमंत भरून टाकणारा तो मृदगंध, हे असलं काहीतरी मानवी रूपात साकारल्या सारखं !

अशी माणसं भेटत राहोत कायम. अजून काय मागणार ? 

मंगळवार, ५ जून, २०१८

पावसा... बरस रे !!

पावसाची रिमझिम सुरु आहे .... .फुलांचा दरवळ डोक्यातले तंतू सैल करतोय, भानावर आणतोय.

तळ्यातल्या पाण्यावर पावसाचे थेंब..... थेंबातुन निर्माण होणारी वर्तुळं.... . पाण्यावर पसरत जाणारी वर्तुळं......  थेंब.....  वर्तुळ.....  त्याचं पसरत जाणं......  विलीन होणं.... . असे अनेक थेंब.... अशी अनेक वर्तुळे.... .. एकमेकांत विलीन होणारी ! सुंदरच !!! वर्तुळं एकमेकांत मिसळून पाण्यावर रेखली जाणारी ती भौमितिक नक्षी..... . पहातच राहावी अशी......

पाण्यावर अधूनमधून डोकावणारे मासे..... . त्यांच्या निःश्वासातून पाण्यावर उमटलेले बुडबुडे......

अंगाला जाणवणारा, भिडणारा सुखद गारवा......  अंगावर पडणारे पावसाचे तुषार.......

अरे ! ही  कोणाची किर्र....... किर्र ....... आवाजातली साद ?

ज्या झाडाखाली उभं राहून हे सगळं अनुभवतेय, त्या झाडावर नजर गेली. चपळ खारुताई.. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सरसर सरकणाऱ्या....... फांदीवरील पानांमधून काहीतरी खात -खात (?) तुरुतुरु जाणाऱ्या ......

झाडं बोलतात...... . बोलावतात..... . असा भास ?

हे सगळं तना-मनाला भिडतंय........ .
आत खोल भिनतंय .....

हलकं झालेलं, स्वच्छ झालेलं मन !!!

तृषार्त  धरतीवर पावसाची पसरण......
धरतीचा निःश्वास, आनंद, तृप्ती...मृदगंध !

ती मृदगंधाची अनुभूती......
ती धरतीच्या सुखावल्याची जाणीव........
शांत झाल्याची जाणीव !

आजूबाजूला सुखावते......
गंधित करते.....

पावसा.......  बरस रे.........

तना-'' मनांवर " !!!

धरती सुकलेय रे !
धरती सुकता कामा नये .......

बरस !!!!

गंधित होऊ दे, मला ... त्याला... तिला... चराचराला !!!!

पावसा... बरस रे !!

तना- " मनांवर " !!!



शुक्रवार, ४ मे, २०१८

चांदोबा, पिझ्झा-नान आणि स्पगेटी नूडल्स

आज सकाळी शाळेत जात असताना "आम्हाला" आकाशात ‘चांदोबा’ दिसला. (कधी कधी सकाळी सुद्धा चांदोबा दिसतो बरं का, आकाशात !) आम्ही तो मम्माला दाखवला. तिने पाहिला तो आणि "ह्म्म, चांदोबा !!!" अशी आमच्या dialogue ची पुनरावृत्ती केली. 

तसंच अजून पुढे चालत असताना, रस्त्याशेजारील इमारतीतील खिडकीतून, मोठ्ठा गोलाकार पिवळ्या दिव्याचा प्रकाश दिसला. आम्ही मम्माला म्हणालो, “अजून एक चांदोबा”! :-) ती हसायला लागली.

असंच होतं आजकाल सारखं !!!! 

आम्हाला कळतंच नाही हे मोठे का हसतात आमच्या बोलण्याला ते !!!

परवा एका नवीन खाद्यपदार्थाची आमची ओळख झाली. त्रिकोणी आकाराचा तो पदार्थ पाहून आम्हांला पिझ्झा आठवला. आम्ही त्याला पिझ्झा म्हणालो. आम्हाला सांगण्यात आलं की, याला “नान” म्हणतात. आम्ही त्याचं नामकरण केलं,  पिझ्झा-नान !

सगळे हसले आमच्या त्या नावाला !!!

मग आम्ही पण हसलो आणि खाता खाता परत परत म्हणत राहिलो, “पिझ्झा-नान”!!!

मग परत आम्हांला सांगण्यात आलं , की, याला नुसतच “नान ” म्हणतात. 

🤔

काल परत तो ‘नान’  बाबा दिसला. मागच्या वेळेला तो खाऊन पाहिला होता. त्या अनुभवावरून, आम्हांला  त्याला ‘ चपाती- नान' म्हणावंसं वाटलं. मग म्हणालो आम्ही तसं.  मग सगळे परत हसले आमच्या त्या "चपाती-नान" नावाला !!!

??????

असंच काही दिवसांपूर्वी प्रथमच Noodles सारखाच दिसणारा पदार्थ खात होतो, तेव्हा झालं !

Noodles सारखाच दिसणारा तो पदार्थ, म्हणून आम्ही त्याला Noodles म्हणालो. तर आमच्या दादाने आमच्याकडून   त्याला हव्या तशा उच्चारासह "स्पगेटी" असं वदवून घेण्याचा प्रयत्न केला.

आम्हाला त्याला ‘ स्पगेट्टी नूडल्स’ म्हणावसं वाटलं. आम्ही त्याला ‘ स्पगेट्टी नूडल्स’ च म्हणत राहिलो. दादाला ते सहन होईना. मग दादा आणि आमची, स्पगेट्टी ❌स्पगेटी नूडल्स अशी जुगलबंदी काही वेळ सुरु होती. शेवटी बहुदा वैतागुन दादाने आमचा brain  aka word aka pronunciation washing चा नाद सोडला.

आमची सुटका झाली !!!

आमची स्पगेट्टी नूडल्स जिंकली !! :-)

आम्ही आपलं आमच्या अनुभवावरून “नामकरण” करतो. हे मोट्ठे त्याला हसतात, निराळीच ‘नावं’ सांगतात.

आमच्या छोट्याशा विश्वात असं काय-काय सुरु असतं सारखं....

पण आम्ही नाही घाबरणार नवीन शब्दप्रयोग करायला !!!

आम्ही करणारचं प्रयोग नवनवीन !!! 👶🕵️‍♀️

- Trupti