Translate

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

एक ड्राइवर, सिंगापूर मधला !



परवा रविवारी सहकुटुंब एका restaurant मध्ये जेवायला गेलो होतो. टॅक्सिने परत आलो. चिनी वंशाचा टॅक्सी ड्रायव्हर.  त्याचे payment करून उतरायला लागलो होतो.

तेवढ्यात,  तो टॅक्सी ड्राइवर म्हणाला, " भगवान आपको और आपके परिवार को खुश रखें "!

ते अस्स्खलित हिंदी ऐकून आम्ही चाटच !!! 

"विकेट पडणं, दांडी गूल " असले जे जे काही शब्दप्रयोग  असतील त्याची प्रचितीच म्हणा ना ! 

अशा प्रसंगी त्या कर्त्यांची जी आश्चर्याच्या धक्क्याच्या मानसिक अवस्था असते तशीच आमची झाली. 
Y
Where did you learn hindi? माझा  स्वाभाविक प्रश्न. 

"From Indian passengers" त्याचे नम्र उत्तर. 

मजाच वाटली त्या ड्रायव्हरची. आणि कौतुकही.  

मग एकूण आमचा प्रतिसाद पाहता, त्यालाही त्याच्या हिंदीचा सराव करावासा वाटला बहुतेक. 

कारण त्या नंतर त्याने , " भगवन आपको लम्बी उम्र दे" असा हिंदीत आशीर्वाद देऊन आमचे मन जिंकून घेतलं. 

"आप इंडिया में कहाँसे है ?, 

"मै बिहार गया था"

"मैं शाकाहारी हूँ "

असली एका पाठोपाठ प्रश्न, वाक्य हिंदीत सहजपणे  जणू फेकत होता नुसती आमच्या अंगावर . 

आता नुसतं हिंदी बोलून थांबावं ना बाबानी ! पण नाही !!

त्याने त्याच्या जवळचा फोटोचा अल्बम माझ्या हातात टेकवला. मग मी पण गाडीतुन उतरायला निघालेली थांबले. घेतला तो अल्बम हातात उत्सुकतेने. वरवर चाळला. फोटोत स्तूप दिसले. आणि तो ड्राइवर बुद्धिस्ट भिक्षुकाच्या वेशात ! (बिहार म्हटल्यावर बोधगया असणार) त्याचा अल्बम त्याला साभार परतवला. पण थांबा ! अजून एक गंमत त्याच्या पोतडीत होती. 

"में आपको मंत्र में blessings देता हूँ " म्हणाला.  आणि चक्क पाली भाषेत, मंत्राच्या विशिष्ट सुरावटीसह, जवळपास १ मिनिटे,  न थांबता त्याने मंत्रोच्चरण करत आमची उरली सुरली विकेट, दांडी पण उडवून टाकली. आता त्याच्यापुढे हात जोडायचेच बाकी होतं. 

त्याला धन्यवाद दिले. आणि मी पण त्याच्याशी चिनी भाषेत बोलून त्याला धक्का दिला. 

सगळा  प्रसंग ४ एक मिनिटांचा.  पण खूप काही देऊन गेला. भरपेट खाऊन आलेल्या मनावरची सुस्ती उडवून गेला.  

बीजिंग मध्ये असताना समर पॅलेस मधल्या अनुभवाची आठवण देऊन गेला. तिथेही असच अचानक कानावर , "आवारा हूँ ", गाणं कानावर पडलं होतं. त्या शब्दांच्या, त्या तल्लीनतेने गाणाऱ्याच्या आवाजाच्या ओढीने त्या गाणाऱ्या जवळ गेलो होतो. 

आता हे लिहितानाही ते सगळं आठवून त्या अनुभवांची पुनरावृत्ती होतेय. छान वाटतयं.  

रोजचं रहाटगाडगं विसरायला लावणारी अशी माणसं आयुष्यातले काही क्षण उजळवून टाकतात. बरंच काही सांगून जातात. "भेटगाठ" घडवून आणतात. भर दुपारच्या उन्हात चालताना कुठूनतरी अचानक भेटणारा मोगऱ्याचा गंध, अचानक आलेल्या पावसाने आसमंत भरून टाकणारा तो मृदगंध, हे असलं काहीतरी मानवी रूपात साकारल्या सारखं !

अशी माणसं भेटत राहोत कायम. अजून काय मागणार ? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: