Translate

गुरुवार, ६ मे, २०२१

मातीशी जोडल्याच सुख

 हे मुळ लिहिलंय २०१२/२०१३ मध्ये, मागच्या दिल्ली पोस्टिंग वर असताना. त्याला जरा प्रस्तावना जोडतेयं. आवश्यक वाटतेय म्हणून. 

 ——————

प्रस्तावना


आता पुन्हा इथे आल्यावर, उन्हाळा सुरु झाल्यावर माठात पाणी भरायला सुरुवात केली आहे. त्याच २०१२/१३ मध्ये घेतलेल्या माठातच ! 


दिल्लीहून ढाक्याला गेल्यावर पॅकेर्सच्या कृपेने तो माठही सहीसलामत पोहचला तिथे . ढाक्याला गेल्यावर तिथल्या पिण्याच्या पाण्याच्या आणि आजाराच्या कथा ऐकून आम्ही RO च पाणीही उकळून प्यायला लागलो. मग ते पाणी थंड करा वैगेरे उद्योगच झाला असता. त्यामुळे हा माठ पाण्यासाठी वापरात नव्हता. 


मग त्यावर हे पेंट आणि ब्रशच्या साहाय्याने प्रयोग केले आणि चक्क लिविंग रूम मध्ये त्याला सुसंगत जागा आणि आजूबाजूची थिम पाहून डेकोरेशनचा भाग म्हणून ठेवले होतं. 


जवळपास तीन वर्ष तिथं काढून तो पुढे सिंगापूरलाही सहीसलामत पोहोचला. पुन्हा पॅकेर्सची कृपा ! 


तिकडे मात्र तो बिचारा सामानातून बाहेरच नाही काढला . त्या किचन मध्ये सगळ्या हाय-टेक अपलाइन्सस च्या गर्दीतत जागाच नाही सापडली त्याला. सिंगापूरच्या चकचकीतपणाला दचकून बिचारा आतच विश्रांती घेत होता म्हणा ना ! 


आता मायभूमीला परत आल्यावर काय आनंद झाला मला, त्याला सामानातून बाहेर काढताना ! वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं ! 


त्यात काही रोप लावेन म्हणून बाल्कनीत ठेवला होता इथे आल्यापासून. पण नाही जमलं ह्या करोनाच्या नादात ! बरं झालं एका अर्थी 🙂 


आता उन्हाळा म्हणून आणलं त्याला किचनमध्ये पुनः वापरात. करोनाच्या भीतीने, नवऱ्याचं आणि मुलांचं फ्रीजचं पाणी पिण्याची आवडती सवय मी बंद करून टाकलेय. माझ्या हेल्थ फ़ंडा च्या पथ्यावरच.  परत बरं झालं एका अर्थी 🙂  फ्रीजमध्ये ठेवायच्या सगळ्या पाण्याच्या बाटल्या त्यांना सापडणार नाही अशा ठेवल्यात. बिचाऱ्या (?) मुलांना पर्याय नाही. तहान तर लागते, थंड पाणी प्यावेसे वाटतं. करतात काय? 


सुरुवातीला खळखळ केली. पण त्याशिवाय काय करतील ते ? करोनाची भीतीच पुरतेय सवय बदलायला. 

परत, बरं झालं एका अर्थी 🙂  


आता इतकं आवडीने अगदी “माइंडफूली” माठातलं पाणी पितात मुलं, की मी खूष होते. भारताबाहेर वाढलेल्या मुलांना सुरुवातीला आश्चर्य वाटलं की फ्रीझशिवाय थंड पाणी होतं याचं. यात वाळ्याचा सुगंध म्हणजे, सोने पे सुहागा ! 


फ्रीझ मधली बाटली काढायची म्हणजे भस्सकन दार उघडायचं. तिथे संवेदना, शांत होणं, कशाही तरी, (खरं तर स्वतःशी )जोडलं जाणं वैगेरे मला जाणवतच नाही. याउलट, माठातून हलक्या हाताने काळजीपूर्वक पाणी काढावं लागतं. शांत व्हावं लागतं. ते पाणी पिताना एक प्रकारचा कृतज्ञपणा वाटतो मला. तो वाळ्याचा गंध, ती चव तना-मनाची तृषा भागवते. आणि आता एक आई म्हणून जेव्हा मुलांनाही तो आनंद घेताना पाहते तेव्हा एक वेगळाच समाधान, कृतकृत्यता वाटते. ममता. 


हे भारतात असतानाचे माझे छोटे छोटे आनंद. खूप मोठ्ठ सुख देतात . मातीशी जोडल्याच सुख. 


——————

खाली आठेक वर्षांपूर्वीची अभिव्यक्ती. 


“काही वेडं करणारे क्षण ओल्या मातीबरोबर.”.


थंडगार पाणी पिण्यासाठी म्हणून काल पाण्याचा माठ घेऊन आलेय. घरी आल्यावर ३-४ वेळा माठ खंगाळून धुतल्यानंतर आलेला तो ओल्या मातीचा गंध….


अहाहा ! पिऊन टाकावासा वाटणारा ! 


त्या ओल्या माठात डोकावून,

पुन्हा तो गंध पकडण्याचा प्रयत्न 🙂


त्या थंड, ताज्या माठात डोकावता,

पुन्हा तनामनांत शिरणारा तो,

त्या ओल्या काळोखातील ,


तो मृत्तिकेचा गंध …


ती थंडगार स्पर्शाची झुळूक …


काही वेडं करणारे क्षण मातीबरोबर.…


आकार दिलेल्या ओल्या मातीबरोबर....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: