Translate

मंगळवार, १२ मार्च, २०२४

पॅरिस to पारी

मन पण अजबच!


बहिणाबाईंनी म्हटल्यासारखं,

“आता व्हतं भुईवर.

गेलं, गेलं आभाळात!”


याची तंतोतंत प्रचितीच आली आत्ता.


इथे जिनिव्हात येऊन ६ महिने झाले. इथे राहण्यासाठी बेसिक फ्रेंच भाषा येणं आवश्यक वाटलं आणि मला आवडही आहे, म्हणून फ्रेंच भाषा शिकायला घेतली आहे. त्यांचे उच्चार महान आहेत. काही शब्द तर इतक्या वेळा ऐकले तरी देवनागरी भाषेतील कोणत्याच शब्दात बांधता येणं अशक्य. अगदी चिनी भाषेसारखं! accent! असो!


तर पॅरिसचा फ्रेंच उच्चार “पारी” या शब्दाच्या आसपास होतो. मी २-३ वेळा तो सराव करून पाहिला. आधी नुसता शब्द उच्चारण आणि नंतर तो ‘पारी’ वाक्यात घालूनही. ते करून झाल्यावर ‘पारी’ शब्दपाशी मन थांबलं. गेलं. 


पूर्वी जेव्हा हा शब्द उच्चारला होता तिथे. मन गेलं पुण्यात. २०२४ मधून १९९० च्या आसपास.


बहिणाबाई! माझी अक्षरओळख नसलेली माय. कित्ती मोलाचं, अनुभवाचं, अजरामर बोल बोलून गेली. “मन वढाय-वढाय…”त्याला कारणच तसं आहे. 


पारी! आठवली ती साधारण पाच-सव्वा पाच फूट उंचीची, छोट्या बांध्याची, एक हात कोपरातून मोडलेली. कायमच काटकोनातच तिचा एक हात. तिचा तो हात कधी पूर्ण सरळ झालेला पाहिलाच नाही. आणि एक पायही तसाच गुडघ्यात थोडा मोडलेला. तशीच चालायची ती. केसांचा बॉयकट असलेली, एक डोळ्यात दोष असलेली, २५-३० च्या आसपास वय असलेली. पारी!


आमच्या घराच्या बाल्कनीतून दिसणाऱ्या रस्त्यावरून ती येताना-जाताना दिसायची. येणारी-जाणारी मुलं तिला ‘ए पारे’ म्हणून चिडवायची, तिला टपला मारायची, तिची टिंगल करायची. मी असेन तेव्हा ६-७ वीत. तेव्हाच्या आठवणीतली ही पारी. ती माहिती झाल्यानंतर, ती दिसेल तेव्हा तिला बघत बसायचं मी. नकला करायच्या त्या वेड्या वयात तिच्या सारखं चालूनही बघायचो आम्ही. 


नंतर काही वर्षांनी कळलं की ती गेली.

का? कशी? माहिती नाही. पण आज आठवली.


काल किरण रावचा “लॉस्ट लेडीज़” सिनेमा पाहिला. ही एक lost पारी!


राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, कौटुंबिक अशा अनेक कारणांमुळे found पेक्षा या अशा lost ladiesच आपल्याकडे अधिक! 


त्रास होतो. वाईट वाटतं. पण सामाजिक बदल व्हायला पिढ्या जाव्या लागतात. आशा, आनंद आहे की हा बदल थोडा का होईना होतो आहे.


मी पाहिलेल्या अशा lost ladies, आज या पारीच्या निमित्ताने आठवून गेल्या. 


मला दिसल्या तेव्हा lost वाटल्या, आता सापडल्या असतील का स्वतःला? 


मी प्रार्थना करते. त्या त्यांना भेटाव्यात म्हणून. सापडाव्यात म्हणून.


पारी-पॅरिस.


पारी-एक गरीब, दुर्लक्षित स्त्री.


मनाचं हे असं. 


कुठे-कुठे अडकलेलं असं, कधीही, कुठेही भेटत रहात.

-तृप्ती,

जिनिव्हा,

१२ मार्च २०२४.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: