Translate

रविवार, १ डिसेंबर, २०२४

A man, a boy and a .... fox !

माथ्यू स्विनी या आयरिश कवी, लेखकाने लिहिलेले हे, “A man, a boy and a fox” या नावाचं पुस्तक नुकतंच वाचलंय. 

आता नेमक हेच पुस्तक हातात कस काय आलं बुवा, तर त्याला एक पार्श्वभूमी आहे. आमच्या ९ वर्षाच्या लेकीला प्राण्यांची भयंकर आवड आहे. आताशा निरीक्षणातून असं स्पष्ट झालय की, ही मुलगी शाळेच्या लायब्ररीतून जी पुस्तकं वाचायला घरी आणते ती पुस्तकंसुद्धा प्राण्यांच्याच सोबत गुंफलेल्या कथा असतात. असंच या तिच्या भूतदयेतून, प्राणीप्रेमातून आमच्या घरी हे अजून एक प्राणी केंद्रित कथा असलेलं पुस्तक आलं आणि रात्री झोपताना तिच्या सोबत ते वाचता वाचता मी त्या पुस्तकात कशी गुंतत गेले हे माझ मलाच कळलं नाही. 

ते वाचून संपलंय परवाच !  पण मनात रुंजी घालतंय अजूनही… म्हणून त्या पुस्तकाविषयी, त्याच्या जन्माविषयी अजून थोडी माहिती काढली. 

२००२ मध्ये लंडन मध्ये प्रकाशित झालेलं हे साधारण १७० पानी पुस्तक. याची मूळ संकल्पना ॲन फारेल या बाईंची. यांनी आयर्लंडमध्ये बेघर, रस्त्यावर राहणाऱ्या लोकांसाठी सामाजिक काम केलय. त्यामुळे साहजिकच बेघर लोकांचे आयुष्य त्यांनी जवळून पाहिलं होतं. प्रौढांचा दुर्लक्ष करण्याचा विषय असलेली ही बेघर माणसं, लहानग्यांच्या मात्र उत्सुकतेचं केंद्र असतं, हेही फारेल बाईंच्या निरीक्षणात आलेलं आणि मग त्यातूनच या लहानग्यांसाठी म्हणून त्यांनी हा पुस्तकाचा घाट घातला. वॉशिंग्टन मधील लोयोला फौंडेशनने त्यांना आर्थिक हातभार लावला. बाईंचं स्वप्न, माथ्यू स्विनी यांच्या समर्थ लेखणीतून साकार झालयं. 

वयोगट पाहता, १० वर्षाच्यावरील सर्वांसाठी हे पुस्तक आहे.  इंग्लंड मधील काही प्राथमिक शाळांमध्ये तर या पुस्तकाचा समावेश शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलाय. आणि ह्या पुस्तकविक्रीतून मिळणारा काही भाग हा आयर्लंडमध्ये बेघर लोकांच्यासाठी १९६९ पासून काम करणाऱ्या सायमन कम्युनिटीज या संस्थेला जातोय. म्हणजे समाजप्रबोधनासोबतच, बेघर लोकांसाठी आर्थिक हातभारही अस दुहेरी काम हे A Man, a boy and a … fox करतय. 

अत्यंत pleasant pista रंगाचे प्राबल्य असणारे पुस्तकाचे गूढ मुखपृष्ठ. त्यावर डाव्या कोपऱ्यात एक छोटा कोल्हा. त्याच्या शेजारी फक्त गुडघ्यापासून खाली दिसणारे पॅन्ट घातलेले २ पाय आणि विसर्जन झालेली, शिशिरातली, रस्ताभर पसरलेली पिवळी पानगळ ! पाहता क्षणी कुतूहल जागं करणारं, हातात घ्यावंसं वाटणारं हे पुस्तक. सध्या इथे जिनिव्हा मध्येही आजूबाजूला निसर्गाचं हेच रूप अनुभवायला मिळतंय. त्यामुळे अधिक जवळचं वाटतंय हे मुखपृष्ठ 

पुस्तकाची मांडणी सुद्धा अत्यंत साधी, सुटसुटीत. फॉन्टचा आकार नेहमीच्या १२ पेक्षा थोडा मोठा, १० वर्षाच्या मुलांना मानवेल असाच. तेच २ शब्दातल्या अंतराचं, स्पेसचं. प्रत्येक प्रकरण जास्तीत जास्त ३-४ पानांचं. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी एक चित्र. लहान मुलाने काढलेलं असावं असचं.

पुस्तकाला अनुक्रमणिका नाही. प्रकरणांना क्रमांक सुद्धा नाही. त्यामुळे एकूण प्रकरणं किती, हे सहज सांगता येत नाही. आणि त्यामुळेच कथाप्रवाह कसा जातोय हेसुद्धा सहज पाहिल्या-पाहिल्या वाचकाला समजत नाही.

(पुस्तक वाचायला घेतल्यावर लक्षात येतं, की हे चित्र काढणं हे या कथेतल्या मुलाच्या आवडीचा भाग, व्यक्त होण्याचा मार्ग आहे.) असं एकुण मुलांच्या वाचनाच्या मानसिकतेचा विचार करून आखलेले हे, "एक माणूस, एक मुलगा आणि एक… कोल्हा" हे पुस्तक.

आता इतकं बाहेरून म्हणा, वरवर म्हणा पुस्तक चाळून झालंय आपलं, तेव्हा नमन पुरेसं झालयं ! आता मजल मुळ कथेकडे.:-) 

कथानक घडतंय अर्थात आयर्लंडमध्ये ! साधारण १० वर्षांचा हा मुलगा, आपल्या दैनदिनी, डायरी च्या माध्यमातून स्वतःशी बोलतोय. तो नुकताच त्या नवीन शहरात रहायला आलायं. या नव्या शहरात, त्याच्या घराच्या आजूबाजूच्या परिसराची ओळख, तो त्याच्या सायकलवरून फिरून करून घेतोयं. तो त्याची निरीक्षणं, अनुभव डायरीला सांगतोय.

कथानक सुरु होतं या वाक्याने, "ज्या दिवशी मी या शहरात आलो, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी कोल्हा पाहिला. आणि त्या कोल्ह्यानेही माझ्याकडे पाहिलं." " तो कोल्हा एका माणसाच्या खांद्यावर होता. त्या माणसाच्या गळ्याभोवतीचा जणू जिवंत स्कार्फचं तो ! त्याची नारिंगी रंगाची शेपटी एका खांद्यावरून खाली आलेली आणि दुसऱ्या खांद्यावरून त्याच्या चेहऱ्यावरील उत्सुक नजर मला न्याहाळत होती". पुढे त्याच्या प्रथम दर्शनाचं वर्णन तो सविस्तर आपल्या दैनंदिनीत लिहून काढतोय या पहिल्या प्रकरणात. आणि हो प्रकरणाच्या शेवटी त्या कोल्ह्याचे चित्र. 

हीच प्रकरणाला साजेशी सोप्पी चित्रं आपल्याला प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दर्शन देऊन नुकत्याच वाचलेल्या वृत्तांताची उजळणी करून देतात. मनाला काही काळ, तिथे त्या चित्रावर रेंगाळू देतात. जणू मधल्यासुट्टी मध्ये खाल्लेल्या शाळेच्या डब्यातल्या, एखाद्या गोड गोळीची चव, मधली सुट्टी संपून वर्ग सुरू झाले तरी काही काळ जिभेवर रेंगाळत रहावी तसं. 

एकूण त्याच्या सुरुवातीच्या लिहिण्यातून हे दिसतंय की या मुलाला, जेराल्डला, बहीण-भाऊ नाही. त्याचे आई-वडील दोघेही नोकरी करणारे. वडील बहुतांश वेळा रागावलेले, त्याला वेळ, प्रेम न देणारे. आईसुद्धा तिच्या व्यापात व्यग्र. त्यामुळे त्याला हवा तसा वेळ, लक्ष द्यायला त्यांच्याकडून होत नसावं. त्यामुळे घराच्या आजूबाजूच्या परिसरात सायकलहून फेऱ्या मारणे, तो परिसर पाहणे, कोल्हा व त्या माणसाबद्धलचं कुतूहल शमवणे आणि हे सगळं घरी येऊन डायरीत लिहिणे, चित्र काढणे असा हा नवीन शहरात आल्यानंतरचे काही दिवस त्याचा दिनक्रम, रुटीन.

नवीन शाळा, नवीन मित्र आणि ह्या नवीन कुतूहलाचं वर्णन करत राहतो तो पुढील काही प्रकरणात. मुलाचं नवीन बदलांना सामोरं जाणं-स्वीकारणं हे सुद्धा वाचकांना कळत जातं हळूहळू. आमच्या सारख्या दर काही वर्षांनी देशच बदलणाऱ्यांना तर ते चांगलंच समजू शकतं. आजच्या भाषेत, सहज relate करू शकतो आम्ही.

शाळेत होणाऱ्या bullying, दमदाटी, प्रकाराला बळी जाणं. त्यातून झालेली मारामारी, मग शाळेतून काही दिवस घरी बसवलं जाणं. त्यातून पालकांचा त्रागा, शिक्षकांचा रोष, हे सगळं एक १० वर्षांच्या मुलाच्या भूमिकेतून आपल्यापर्यंत पोहोचतंय. त्यात कुठेही भडकपणा, प्रचारकी तत्वज्ञान, आव न आणता हे सगळं सहज, तरल पद्धतीने माथ्यू स्वीनी यांनी मांडलंय. त्यांच्या ह्या कौशल्याला दाद द्यावीच लागेल.

बऱ्याच वेळेला मुलांच्या भावभावनांचा, विचारांचा विचार आपल्याकडून, मोठ्यांकडून होत नाही. मुलांनाही समजत असतं, त्यांच्या अनुभवावर, निरीक्षणावर आधारित त्यांची पण काही मतं असतात. हे आपल्याला जगण्याच्या (?), कशामागे तरी धावत राहण्याच्या वेगात, दुसऱ्या कुणासारखं तरी होण्याच्या हव्यासात हरवायला, विसरायला होतंय  का? असा प्रश्न अंतर्मुख करून गेला. केवळ अन्न, वस्त्र, निवारा, अभ्यास- शाळा याशिवाय सुद्धा मुलांच्या भावनिक म्हणून काही ठराविक गरजा आहेत, त्याबद्धल जागरूकता व्हायला या पुस्तकाने मदत होऊ शकते असं वाटून गेल. 

कथानक जसजसं पुढे जातं, तसतशी, त्या कोल्हा पाळीव प्राणी असणाऱ्या माणसाची आणि मुलाची ओळखवजा दोस्ती होते. तो माणूस, ज्याचं नाव पुस्तकाच्या अगदी शेवटच्या पानावर वाचकांच्या समोर येतं. ते म्हणजे जेम्स ब्लॅक ! या जेम्स काकाशी झालेलं मुलाचं बोलणं, जेम्सचं पूर्वायुष्य, खलाशी म्हणून उदरनिर्वाह करणारा हा जेम्स, त्या कोल्ह्याच्या नवजात पिल्लाशी त्याची गाठ पडण्याचा प्रसंग, जेम्सने त्या पिल्लाला, ज्याचं नाव आहे रस, त्या रसला, कसं वाचवलं, वाढवलं, जेम्सची बायको, तिच्याशी झालेलं त्याचं भांडण, त्यानंतर त्याने सोडलेलं घर, हे सगळं वाचकांना समजत जातं. अत्यंत ओघवत्या शैलीत, मुलगा जेराल्ड, एक-एक करून हे कथानक,  आणि कोल्हा पाळीव प्राणी कसा झाला हे कोडं उलगडत नेतो.

याच भेटींदरम्यान, मैत्रीपूर्ण गप्पांच्या ओघात जेम्स जेराल्डला, अभ्यासाचं, शाळेत जाण्याचं महत्त्व, गरज सांगतो. ते पटल्यावर जेराल्ड शाळा-अभ्यास enjoy करायला लागतो. परिणाम व्हायचा तोच होतो. शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यात झालेला हा बदल पाहून सुखावतात. जेराल्डचे पालकही, अगदी वडिलही जरा मऊ होतात. हे सगळे बदल जेराल्ड त्याच्या निरीक्षणातून, घडलेल्या घटनांच्या वर्णनातून एखाद्या मित्राशी बोलावं अस सांगत राहतो. आपलं कुतूहल वाढत रहातं.

मुलगा हळूहळू शाळेत रुळतो. शाळेतल्या एका नाटकात मुख्य भूमिकेसाठी त्याची निवड होते. परंतु त्यानंतर तो नेमका फ्लूने आजारी पडतो. मग आता माझा रोल दुसऱ्या कुणाकडे जाईल का अशी जेराल्डची भीती. यातून लेखकाच्या बालमनाच्या विविध कंगोऱ्यांना स्पर्श करण्याच्या, त्या भूमिकेत स्वतःला घालण्याच्या क्षमतेचं दर्शन होतं. मुलाचा रोल कुणाकडे जात नाही. तो बरा होतो आणि त्याची भूमिका उत्तम वठवतो. वाहवा मिळवतो.

मधल्या काळात जेराल्डची रसशी छान मैत्री होते. तो रस ला सोबत घेऊन एक चक्कर सुद्धा मारून येतो.

या सगळ्या भेटीगाठी, मैत्री यांची जेराल्डच्या व्यस्त आईबाबांना कल्पना नसते. आणि बाहेरून कुठून कळायचं कारणही नव्हतं, कारण हे कुटुंब परिसरात नव्याने राहायला आलंय. त्यामुळे त्यांना कोणी ओळखत नाही. या विचाराने जेराल्ड मात्र खूष असतो.

एक दिवस अचानक नेहमीच्या ठिकाणाहून जेम्स आणि रस गायब होतात. काही दिवस जातात. पण ते तिथे परत दिसतचं नाहीत. मुलाच्या डोक्यात विचारांचं काहूर उठतं. जेराल्ड त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो. एव्हाना ऋतू बदललाय. कडाक्याची थंडी सुरु झालेयं. काही नेहमीच्या दिसणाऱ्या चेहऱ्यांना तो जेम्सकाकाबद्दल विचारतो. त्यातून माग काढत राहतो. शोधता शोधता त्याला वस्तीच्या कोपऱ्यात असणाऱ्या भंगार, अडगळीतल्या चारचाकी गाड्यांच्या जागेचा शोध लागतो. शहरातील बेघर लोक थंडीच्या दिवसात रस्त्यावर जगू शकत नाहीत. तेव्हा ते या भंगार गाड्यांमध्ये जाऊन राहतात. तिथे मोडक्या गाड्यांच्या छताखाली निवारा शोधतात. तिथेच ही जोडगोळी जेराल्डला सापडते. त्याच्या जीवात जीव येतो. रक्त गोठवणाऱ्या थंडीतही जेराल्ड आणि जेम्सला उबदार वाटत. 

एकदा असाच नेहमीच्या सवयीप्रमाणे तो त्यांच्याकडे गेला तर रस एकटाच गल्लीच्या तोंडाशी उभा. पण तो माणूस तिथे नव्हता. असं कधी झालं नाही, हे आपला हा दहा वर्षांचा दोस्त आपल्या डायरीत लिहितोय. पुढे तो सांगतोय की, मी कारपर्यंत गेलो तरी जेम्सकाका दिसेना. शेवटी तिथे पोहोचल्यावर सायकलवरून मी उतरलो आणि कारमध्ये डोकावून पाहिलं, तर तिथे हे जेम्सकाका दिसले. स्वतःला पांघरुणात गुरफटून घेतलेले आणि थरथरत असलेले. मुलाला पाहिल्यावर त्याच्याकडे पाहून हसायचा प्रयत्न केलेले. काहीशा अनिच्छेने पांघरूणातून आपला हात बाहेर काढून जेराल्डशी हात मिळवण्याचा प्रयत्न केलेले. त्यांच्या हाताचा स्पर्श गरम होता. "जेराल्ड, मला श्वास घ्यायला त्रास होतोय रे !" जेम्स काका म्हणाले. मुलाला त्याचे आजारपण, नुकताच झालेला फ्लू आठवला. पण हे त्याहून गंभीर दिसत होतं. "मी जातो. काहीतरी मदत मिळते का पाहतो." म्हणून आपला छोटा दोस्त घराकडे धाव घेतो. त्याला खात्री आहे की, नर्स असलेली आपली आई नक्कीच काहीतरी मदत करेल. आणि तसंच होतं. त्यांची अवस्था पाहून आई तातडीने अँब्युलन्स बोलावते आणि काका हॉस्पिटल मध्ये दाखल होतात.

पुढे मुलगा आपल्या आईला, आपली आणि जेम्स काकाची भेट, मैत्री कशी झाली हे सांगतो. काका हॉस्पिटल मध्ये म्हटल्यावर त्या कोल्ह्याची काळजी कोण घेणार ह्या मुलाच्या काळजीची काळजी आई घेते. कोल्ह्याला त्यांच्या घरात ठेवायला परवानगी देते. जरी वडिलांना ते फारसं आवडत नसलं तरी!

त्या रस्त्यावर राहणाऱ्या कोल्ह्याला तर अशी घरात राहायची सवय नाही. मग त्याचं जेराल्डच्या घरी अड्जस्ट होणं, जेम्सला न्यूमोनिया झालाय हे कळणं, त्यातून तो न बचावणं, जेम्स काकाच्या अशा अचानक जाण्याचा धक्का सहन करणं, तो पचवायचा प्रयत्न करणं हे सगळं क्रमवार अलगत येत राहतं. नंतर जेम्सचं मृत्युपत्र मिळतं. त्यात रसला जेराल्डकडे द्यावे असं लिहिलेलं असतं. जणू आपल्याच डोळ्यापुढे या सगळ्या घटना घडल्यात असं वाचकाला वाटावं, इतकी ताकद त्या वर्णनात, त्या शब्दात आहे.

हे असलं मृत्युपत्र, इच्छापत्र वाचल्यावर, रतन टाटा आणि त्यांच्या श्वानांची, शंतनू नायडू वर असलेल्या त्यांच्या विश्वासाची बातमी आठवली. माणसाचे प्राण्यांसोबतचे बंध आणि आपल्या पश्चात त्यांची काळजी घेणारं कोणीतरी शोधून ठेवणं, नेमून ठेवणं या सगळ्या गोष्टी, संवेदना माणुसकीच्या अतिशय उच्च कोटीला पोहोचणाऱ्यांच्या आहेत हे नि:संशय.

कथेच्या शेवटी रस जेराल्डच्या घरात, आयुष्यात येतो. त्याच्या आई-वडिलांना जेराल्डची नव्याने ओळख होते. ते तिघेही कुटुंब म्हणून एकमेकांच्या अधिक जवळ येतात. अगदी, जेराल्डच स्वप्न असणाऱ्या एका फॅमिली हॉलिडेला सुद्धा जातात. रसला काही दिवसांसाठी पाळीव प्राण्यांची काळजी घेणाऱ्या एका संस्थेत ठेवून ! हे सगळं मुलगा डायरीत लिहीत राहतो आपल्यासाठी.

तर अशी ही नवीन शहरात आलेल्या, जेराल्डच्या नव्या आयुष्यात मिळालेल्या भेटींची कहाणी. एका वेगळ्या विश्वात आणि वेगळ्या भावविश्वातही घेऊन जाणारी. आम्हाला स्पर्शून गेली. म्हणून हा शब्दात बांधण्याचा प्रयत्न. पुस्तक मिळाल्यास नक्की वाचा आणि हा प्रयत्न आवडला असला तर ते ही कळवा. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: