Translate

गुरुवार, १८ एप्रिल, २०१३

रामनवमी !

शांघाय मध्ये असताना रामनवमीच्या दिवशी पडलेला हा प्रश्न.  त्याचे उत्तर डायरी लिहून सोडवले. इथे प्रसिद्ध करताना थोडेफार संस्कार केलेत त्यावर.

रामनवमी. माझा आवडता दिवस, आतापर्यंत उण्यापुऱ्या तीसएक रामनवम्या अनुभवल्या. अनुभव एकच. आनंद, प्रसन्नता, चैतन्य देणारा दिवस ! सहज डोक्यात विचार आला, का बरं या दिवशी नेहमीच इतके उत्साही, आनंदी वाटते ? आणि, शोधता-शोधता, निसर्ग त्यावर आधारित मानवनिर्मित संस्कृती, त्यातून होणारे संस्कार अशा एक एक परस्परवलंबी साखळ्या उलगडत गेल्या.  विचार करता-करता रामनवमीशी जुळलेली नाळ, असलेले नातं उलगडत गेलं, सापडलं. मन फ्लशबक मध्ये गेलं.

ठसा उमटवून गेलेली पहिली रामनवमी असावी ही. लहान असताना, (बहुधा ४ -५ वर्षांची असताना) रामनवमीला आम्ही गावाला जायचो. गावाला घराच्या अगदी समोरच रामाचं मंदिर आहे. त्यामुळे सगळा सोहळा अगदी बारकाईने अनुभवायला मिळायचा. रामनवमीच्या आदल्या रात्री, आमचं घर आणि मंदिरासामोरील रस्त्यावर पताका लावल्या जायच्या. त्या पताका तयार होत असताना पाहायला मिळायच्या. कागदापासून तयार केल्या जाणाऱ्या, त्रिकोणी आकाराच्या, विविधरंगी पताका ! सगळे रंग शिस्तीत एकापाठोपाठ उभे जणू. ते रंगीत त्रिकोणी तुकडे खळीने सुतळीला एकमेकाशेजारी डकवले जायचे. एक एक पताका येवून सुंदर तोरण बनायचे. आत्ताआत्तापर्यंत जमिनीवर असणारे ते छोटे त्रिकोणी तुकडे. बघताबघता त्यांची माळ व्हायची आणि ते एकदम उंच, दूर जायचं. आज ती पताका मला, लग्नानंतर परदेशात वास्तव्य करणाऱ्या एखाद्या मुलीसारखी वाटते. मुलगी दूर, उंच गेल्याचं कौतुक आणि मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी हळहळही !

http://mellanoandcompany.files.wordpress.com/2012/10/making-marigold-lei.jpg

रामनवमीच्या दिवशी मंदिरात आणि घरातही विशेष लगबग असायची.  मंदिर सजलं जायचं. मंदिराच्या दारावर  झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं एकाआड एक ओवून तोरण बांधलं जायचं. उत्सवमूर्तीला नवीन कपडे, दागिने, फुलांच्या माळा चढवल्या  जात. गाभाऱ्याबाहेरील मोठ्या मंडपात रामाचा पाळणा अडकवला जायचा.  कीर्तनाचा कार्यक्रम असायचा. मग कीर्तनकारांना बसण्यासाठी किंवा उभं राहण्यासाठी विशेष जागा निवडली जायची. गाभाऱ्यात मूर्ती, मुख्य मंडपात रामाचा पाळणा आणि त्याच्या दोन्ही बाजूला भक्तगण. एकीकडे स्त्रिया, दुसरीकडे पुरुष आणि मध्यभागी रामाच्या मूर्तीकडे तोंड करून उभ्या ‘बंग’ बाई अशी बैठक व्यवस्था असे. तेव्हा मंदिरात रामनवमीला बंग नावाच्या बाई कीर्तन सांगायला येत. कीर्तन संपल्यावर त्यांना सगळेच नमस्कार करायचे. मला त्या फार आवडायच्या. का ते आता नेमके माहिती नाही. कदाचित त्यांची कीर्तन सांगण्याची शैली, त्या म्हणत असलेली गाणी, भजनं आवडत असतील. त्या वयात या सगळ्यातून काय कळत होत, ते तो रामच जाणे ! असो, ते काहीही असो. पण अजूनही सगळ चित्रासारखं डोळ्यापुढे उभं राहतं.

आठवणींचा दुसरा 'रेशीम' धागा दुसरीत असतानाचा.  आमच्या देशपांडे बाइंनी वार्षिक स्नेहसंमेलनासाठी म्हणून गीतरामायणातील "आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे" या गाण्यावर, आमचा नाच बसवला होता. त्याची हमखास आठवण या दिवशी होते. आणि nostalgic व्हायला होत. आजही ते ऐकले तरी आपसूक अंगात लय येते, हात -पाय ठेका धरतात. पुढे नंतर कळत्या वयात, पुणे आकाशवाणीवरून रामनवमीच्या दिवशी गीत रामायणाचे सूर कानी पडायला लागले. शब्दांमागील अर्थ उमगू लागले. ते शब्द, ते संगीत, बाबुजींचा आवाज सगळेच मोहिनी घालू लागले. मग गीतरामायण हा एक हळवा कोपरा, weak -point होऊन बसला. अगदी आजही आता भारताबाहेर असले तरी रामनवमी म्हटले कि गीत-रामायण ऐकणे हा एक दिवसाचा ठरलेला, अविभाज्य कार्यक्रम. पुन्हा-पुन्हा ऐकत रहावं वाटणारं ! गदिमा आणि बाबुजीं च्या निर्मिती मागचं कोड, गूढ अजून न उलगडलेले !

सुखद स्मृतींचा हा तिसरा धागा माध्यमिक शाळेत असतानाचाच.  मराठीतला चैत्र शुद्ध नवमीचा दिवस, इंग्रजी महिन्याप्रमाणे पाहिले तर साधारण मार्च-एप्रिल. हा शाळांचा परीक्षांचा मौसम. परीक्षा आणि नंतर सुट्ट्या! सहीच ! रामनवमीच्या दिवशी, खरं तर, मे महिन्याच्या सुट्ट्यांची चाहूल लागायची. दुपारच्या वेळेला कैऱ्या, बोर, चिंचा, आवळे, पेरू असा मेवा घेऊन शाळेबाहेर बसलेल्या मावशी, काका दिसायचे. उन्हाळ्यातल्या या मेव्याची, त्यांच्या चवींची, त्यांच्याशी निगडीत बाल-आनंदाची, येऊ घातलेल्या आंब्यांच्या आगमनाची कुठेतरी नोंद होत असावी. आनंदाची चाहूल देणारा तो दिवस, ते क्षण !

अजून एक म्हणजे शाळेत जायच्या रस्त्यावर एक राम मंदिर लागायचे. तिथे रामनवमीला भरपूर वर्दळ असायची. दुपारी १२ चा सुमार म्हणजे रामाला पाळण्यात घालणे इत्यादी सोहळा अगदी भरात असण्याची वेळ.मग जाताजाता कानावर भजनं, गाणी पडायची. जरा थांबून मंदिरात डोकावले तर सजवलेले मंदिर, नटून-थटून आलेल्या बायका, त्यांच्या बरोबरच्या लहान-सहान मुली, रंगात आलेले कीर्तनकार आणि राम-सीता आणि लक्ष्मणाच्या नटवलेल्या मूर्ती असं काय-काय दिसायचे. सगळे तल्लीन झालेले. फार सुरेख दृश्य, अनुभव.

चौथा धागा म्हणजे त्या दिवशी घरी केला जाणारा विशेष स्वयंपाक. तो फक्त रामनवमीचाच बेत असतो, इतर कोणत्याच दिवशी नाही. झुणका (चोकोनी सुबक वड्या पाडलेला, त्यावर कोथिंबीर, खोबरे, खसखस भुरभुरलेला ) टरबूजाचं शिकरण, कैरीच पन्हं, आणि घडीच्या मऊ सुत पोळ्या ! आता, लग्न होऊन भारताबाहेर राहत असल्यामुळे, आईच्या हातचा ऐता असा हा मेनू खायला मिळत नाही. त्यामुळे तो पण रामनवमीशी निगडीत अनुभवांच्या मालिकेतील एक सुखद कप्पा ! काही खाद्य पदार्थांच्या अनुभवलेल्या चवीपण कशा जागा, प्रसंग, वेळ, सोबतची माणसे यांच्याशी समीकरणे जमा करत जातात. ती चव, तो प्रसंग, ती वेळ, बरोबरचे सोबती अस क्वचितच पुन्हा जमून येते. आणि नुसती ती आठवण आली तरी सगळे एखद्या फोटो प्रमाणे सगळच स्मृतीपटलावर जिवंत होत. 

आता वाटतंय की, निसर्गात होणारे बदल, जसे कि चैत्र -पालवी, त्यामुळे एकूणच वातावरणातला उत्साह, त्याला अनुरूप अशी संस्कृती (विविध सामाजिक संस्था, खाद्य संस्कृती, प्रथा- परंपरा , सण-वार, संगीत इत्यादी), ह्या संस्कृतीच्या माध्यमातून मनावर होत जाणारे संस्कार याचा काही संबध असेल का? कदाचित, नव्हे नक्कीच, या सगळ्याचाच हा एकत्र परिणाम असू शकतो. रामनवमीच्या दिवशी ह्या सगळ्याच आठवणींचे धागे मनाच्या अंगणात फेर धरतात. समृद्ध अनुभूती देतात.

माझा मुलगा आता तीन वर्षांचा आहे. जमेल तसं रामायण-महाभारतातल्या गोष्टी त्याला सांगायचा प्रयत्न करत असते. त्याला थोडफार समजतही असाव. कारण सध्या त्याच्या रुपात आमच्या घरात कधी शंकर, कधी हनुमान, कधी कृष्ण, तर कधी राम वावरत असतात. म्हणजे त्या गोष्टी ऐकून, पुस्तकातील चित्र पाहून तोहि त्या-त्या कथानायका प्रमाणे स्वतःला नटवायला सांगतो आणि अभिनयही करतो. मग धनुष्य नसले तर कपडे अडकवायचा hanger पण धनुष्य म्हणून चालतो. त्या काही क्षणासाठी तो त्या भूमिकेत असतो. थोडक्यात काय, आता त्याला रामाची थोडी ओळख आहे. आज रामनवमी म्हणून त्याला सकाळी उठल्यावर सांगितले, " आज रामाचा वाढदिवस !", सांगण्याचा हेतू हाच कि आपलं  निसर्गाशी असणार नाते, परस्परावलंबन तुला ओळखता येवो. मानवनिर्मित संस्कृतीमागे हा जो निसर्ग बदल स्वीकारण्याचा, साजरा करण्याचा विचार आहे तो समजण्याची ताकद तुला मिळो. हा रामनवमीचा दिवस मला खूप खूप आनंद देऊन जातो. तसाच आनंद तुलाहि मिळो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: