Translate

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

बुटक्यांच्या देशात सगळे उंच...उंच.

इथे सध्या उन्हाळा सुरु आहे. शाळांना सुट्ट्या आहेत. आणि चीनी पालक, मुलांना कुठे न कुठेतरी गुंतवून ठेवत आहेत. त्यापैकी एक activity म्हणजे मुलाची उंची वाढावी म्हणून करवून घेतलेले व्यायाम, मैदानी खेळ. आपले मुल आपल्यापेक्षा उंच असावं अशी चीनी पालकांची स्वाभाविक अपेक्षा. 

7 फूट 6 इंच उंची असलेला प्रसिद्ध चीनी बास्केटबॉल पटू याव मिंग हा एक त्यांचा आदर्श, role -model . बास्केटबॉल सारख्या खेळणे उंची वाढते. कारण बास्केट मध्ये बॉल टाकण्यासाठी हाताने (stretching) प्रयत्न करण्याबरोबर उड्याही माराव्या लागतात. आणि पायाच्या हाडांच्या उंचीवरच बहुतांशी उंची ठरत असते. व्यायामाने या हाडांवर ताण येतो त्यामुळे वाढीचे हार्मोन्स स्त्रवू लागतात, हाडातील कॅल्शिम च्या चयापचयाला वेग येतो. आणि ती वाढतात. म्हणूनच उंच उड्या मारणे, लटकण्याचे व्यायाम, चौड्यावर उभं राहून हात आकाशाच्या दिशेने ताणून चालणे असेही व्यायाम उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पालक मुलांकडून करून घेतायत. 

चीनी आणि त्यांचा physical appearance आणि एकूणच सगळ्या जगाला सगळ्या क्षेत्रात मागे टाकण्यासाठी त्याचे जे अथक प्रयत्न दिसतात ते पाहून थक्क व्हायला होतं . एकीकडे ऑलिम्पिक सारख्या जागतिक पातळीवर त्याचं यश दिसतच आहे. तर दुसरीकडे इथे त्याची ground level वर, सामान्य चीनी लोकांच्या दैनंदिन जीवनात सुद्धा झपाटलेपणाची झलक दिसते आहे. "चीनी म्हणजे बुटके" हा आता इतिहास झालाय हे काही नव्याने सांगायला नको. अगदी ताजे उदाहरण म्हणजे लंडन ऑलिम्पिक मध्ये चीनी खेळाडूंनी मिळवलेली पदके . 

व्यक्तीची शारीरिक उंची ठरवणारे घटक म्हणजे अनुवांशिकता, आहार, व्यायाम, भोवतालचं वातावरण आणि पुरेशी झोप. अनुवांशिकता हा मुख्य घटक. पण आहार-विहाराच्या जोडीने बहुतांश प्रमाणात यावर मात करता येऊ शकते हे चीनी लोकांनी सिद्ध करून दाखवलंय. आहाराचा विचार करता मुबलक प्रमाणात कॅल्शियम असलेले दुध, कबुतर, मउ पाठ असलेले कासव इत्यादीचा मुलांच्या आहारात जाणीवपूर्वक समावेश केला जातो. Traditional Chinese Medicine नुसार उन्हाळ्यात " यांग" म्हणजे उष्ण उर्जेचं वातावरणात वर्चस्व असतं , ती जोमात कार्यरत असते. ही यांग उर्जा वाढ, स्नायुंची ताकद यांच्याशी निगडीत असते. परिणामी हाडांची वाढ उन्हाळ्यात अधिक होते आणि उन्हाळ्यात उंची वाढते. TCM च्या मते, चांगल्या हाडांसाठी हाड खाल्ली पाहिजेत. चांगल्या यकृतासाठी चांगलं यकृत खाल्लं पाहिजे. हे TCM चं तर्कशास्त्र मला तरी जरा अचाट वाटलं एकूण काय तर मुलांची हाड चांगली होण्यासाठी चीनी आया बराच काल उकळवले हाडांचे सूप आपल्या मुलांना खायला घालतात.सगळे उपाय थकल्यावर वाढीच्या हार्मोन्स ची injections याच्याकडे एक पर्याय म्हणून पालक पाहू लागलेत. गाढ झोपेमध्ये वाढीचे हार्मोन्स स्त्रवू लागतात त्यामुळे व्यायामाच्या जोडीला पुरेशी झोप हि आवश्यक मानली जाते. 

उंच होण्यासाठी काही मजेशीर समजुती (?) पण चीनी लोकांमध्ये आहेत. जसं तांदुळापेक्षा पेक्षा गहू खाल्ला तर उंची वाढायला मदत होते. कशावरून तर, चीनच्या उत्तरेकडील प्रांतातील लोक दक्षिणेकडील लोकांपेक्षा अधिक उंच आहेत. आणि त्यांच्या आहारात गहू हा मुख्य घटक असतो म्हणून !:-) 

एकूणच आजूबाजूला हे पाहिल्यावर पटतं, चीन म्हणजे झपाटलेला देश आहे.... मर्यादा ओलांडण्याच वेड लागलेला.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: