ही गोष्ट आहे चीनच्या इतिहासपूर्व काळातील. चीनच्या शैशवातील, बाल्यावस्थेतील.
आपल्यासारखीच चीनमध्ये सुद्धा पितृसत्ताक समाजव्यवस्था होती. ह्या व्यवस्थेतील आदिम जमातींचे हे प्रमुख, म्होरक्या, म्हणजेच सम्राट. चीनच्या इतिहासपूर्व काळात पाच सम्राट विशेष प्रसिद्ध होते. या पाच सम्राटाशिवाय अनेक छोट्यामोठ्या टोळ्या सुद्धा चीनभर होत्या. ते पाच सम्राट म्हणजे चुआन त्सुई, दिखू, याव, श्वन आणि कथानायक, हुआंग दी.
चीनी भाषेत हुआंग म्हणजे पीत किंवा पिवळा. (चीनी लोकांना पीतवर्णी म्हणून ओळखले जाते ! आणि चीनची प्रमुख नदी सुद्धा "हुआंग ह " म्हणजेच "पीत नदी" ! ) आणि दी म्हणजे देव किंवा सम्राट. जन्मजात बुद्धिवान असलेला हुआंग दी मोठा झाल्यावर त्याच्या जमातीचा प्रमुख म्हणून निवडला गेला. आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना कायम मदतीस तत्पर असा त्याचा स्वभाव होता म्हणे. शूर हुआंग दी ने यांदी नावाच्या जमातीचा पराभव केला आणि हि यांदीची जमात त्याच्या अधिपत्याखाली आली. हि नवीन जमात आता "यान-हुआंग" जमात म्हणून ओळखली जाऊ लागली. हुआंग दी त्याचा प्रमुख झाला. त्याने यांदीला आपला सहाय्यक म्हणून नेमले. असं म्हणतात, आज अस्तित्वात असणाऱ्या चीन राष्ट्राच बीजारोपण ह्याच "यान-हुआंग" संकरात झाले. चीनी लोक स्वतःला " हुआंग दी आणि यान दी चे वंशज म्हणवतात !
ह्या हुआंग आणि यान जमाती एकत्र झाल्या पण त्यांची संकट काही संपली नाहीत. त्यांच्या ताब्यातील भूप्रदेशाच्या दक्षिणेकडून एका जमातीने त्यांच्या वर हल्ला करण्याची योजना आखली. ह्या जमातीचा प्रमुख म्हणे फार उद्धाम होता. पूर्वी एकट्या असणाऱ्या यांदीचा त्याने पराभव केला होता. त्यामुळे त्याला वाटले की ह्या यान-हुआंग टोळ्या माझ्यापुढे "कीस झाड कि पत्ती !"
अस म्हणतात की, हा टोळीप्रमुख (छौ)अत्यंत अक्राळ-विक्राळ, सामर्थ्यवान होता. त्याला ८१ भाऊ होते. त्यांना मानवी डोकी आणि प्राण्यांची शरीरे होती. प्रत्येकजण अष्टभूज होता. लोहासम कठीण असं त्यांचा भालप्रदेश होता. रंगीबेरंगी मुखवटे धरण करणारे हे बंधू माती आणि दगड सुद्धा खाऊन फस्त करत ! असली महाभयंकर टोळी चालून येणार ही बातमी कळताच या हुआंग आणि यान टोळ्यानी जय्यत तयारी सुरु केली. दगड कोरून त्यापासून धारदार कुर्हाडी, चाकू अशी शस्त्रास्त्रे मोठय प्रमाणावर तयार केली. आणि त्याला तोडीस तोड असं सैन्य आणि सैन्याला प्रशिक्षणही. इतकच नव्हे तर अत्यंत शास्त्रीय, सूक्ष्म अशी व्यूहरचनाही तयार केली.
ह्या दोन जमातीत एक घनघोर लढाई झाली. त्याला तोंड फुटले ते "हुआंग ह- पीत नदीच्या उत्तरेला. (आजच्या चीनच्या उत्तर-पूर्व दिशेला) "सर्व नद्यांना बांध घाला, त्या अडवा." अशी सूचना हुआंग दी ने आपल्या सेनापतीस दिली. जेणेकरून चालून आलेले सैन्य प्रचंड हुआंग ह च्या पात्रातच बुडून अखेरचा श्वास घेईल.
प्रत्यक्षात मात्र तसं होऊ शकल नाही. कारण म्हणे पवन देव आणि पर्जन्य देवतेची खास मर्जी ह्या चालून येणाऱ्या टोळी प्रमुखावर होती. त्यांनीच भयंकर वादळ आणि पाऊस पाडून यान-हुआंग दी च्या सैन्याची दाणादाण उडवली. यान-हुआंग दी ने हान बाव नदीला साकड घातले. प्रत्युत्तरादाखल तिने रणरणत्या उन्हाच अस्त्र वापरले. आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
पहिल्याच टप्प्यात नामुष्की झालेल्या आक्रमणकारी टोळीला त्याची सर्व अस्त्र, शक्ती वापरायला भाग पडल. जादूटोण्याचा वापर करून त्याने गडद धुके निर्माण केले. जे म्हणे तीन दिवस, तीन रात्र होते. परिणामी, यान-हुआंग च सैन्य आपल्या दिशा धुक्यात हरवून बसले. शत्रूसैन्या दृष्टीपथात येणे अशक्य वाटल्यावर हुआंग दी ने सैन्याला आपापसात एकत्र राहण्याची सूचना दिली. त्याने सेनापतीस आदेश दिला कि, एक दिशादर्शक रथ तयार करण्यात यावा. जेणेकरून धुक्यातही दिशा ज्ञान होईल. सेनापतीने रथ तयार केला. ह्या रथाच्या मदतीने शत्रूच्या मुख्यालयावरच हल्लाबोल झाले.
त्यावेळी हे शत्रूसैन्या आपल्या मुख्यालयात आनंदोत्सवात मग्न होते. यान-हुआंग च सैन्य धुक्यातच हरवले आणि मी विजयी झालो अशा भ्रमात ते होते. या अनपेक्षित आक्रमणामुळे ते पुरते गोंधळून गेले. यान-हुआंग ने त्यांच्या प्रमुखास बंदी बनविले. ह्या अभूतपूर्व लढाई नंतर यान-हुआंग आणि हा छौ ह्या तिन्ही जमाती एकत्र झाल्या. जणू हळूहळू विस्तारत जाणाऱ्या चीनची ही नांदीच होती.
तृप्ती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा