Translate

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

महाभिंतीच्या पलीकडचे-अलीकडेचे!


 (पूर्वप्रसिद्धी "अर्थपूर्ण", दिवाळी २०१२ .)
एक भारतीय, गृहिणी, आई, सामाजिक कार्यकर्ती, भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याची पत्नी अशा विविध भूमिका बजावताना दिसलेल्या चीनचे अंतरंग लेखिकेने येथे प्रकट केले आहेत. भारत आणि चीन या दोन देशांच्या भिन्न राजकीय व्यवस्था आणि परिणामी भिन्न आर्थिक धोरणे, त्यांची अंमलबजावणी करण्याची वेगळी पद्धत ह्या मुख्य धाग्याच्या अवतीभवतीची ही सगळी गुंफण विणून घेतलेला हा आर्थिक-सांस्कृतिक परामर्श आहे.

गेली पाच वर्षे मी चीनमध्ये राहिले. कॉन्सुलर स्पौझेस ऑफ शांघाई या संघटनेची मी उपाध्यक्ष होते. संघटेनच्या माध्यमातून आम्ही समाजकार्य करत होतो. सातत्याने पाच वर्षे चीनमध्ये असताना बैजिंग (बेईजिंग) आणि शांग-हाय या दोन शहरांमध्ये प्रामुख्याने व त्याव्यतिरिक्त नानजिंग, निंगबो, शीआन, लुओयांग, पुथुओशान, हांगचौ, सुचौ, लीयानयुनगांग, इत्यादी छोट्या-मोठ्या शहरांमध्ये जाता आले. 

चीनी शहरांचे प्रथम दर्शन 

कोणत्याही शहराच प्रथम दर्शन होते ते त्याच्या विमानतळावर, रेल्वे किंवा बस स्थानकावरच. ऑगस्ट २००७ मध्ये आम्ही बैजिंग मध्ये प्रथम पोहोचलो ते हौंगकौंग मार्गे, अत्याधुनिक अशा हौंगकौंग-बेईजिंग रेल्वेने. त्यामुळे बेईजिंगचे प्रथम दर्शन झाले ते रेल्वे स्थानकावर. स्थानकाच्या बाहेर पडल्यावर प्रथम जरा बावरल्यासारखे झाले. वेगळा देश, अगम्य भाषा, निराळे दिसणारे अनोळखी लोक... पण एकूण चित्र काही प्रमाणात तरी भारतीय रेल्वे स्थानकासारखेच! तशीच गर्दी, दोन चार अपंग हातात भांडी घेऊन दानाच्या याचनेत, अस्ताव्यस्त सामान पसरून बसलेले लोक, बऱ्यापैकी गजबजाट, लगेच रस्त्याच्या पलीकडे रहदारीने भरलेले रस्ते असं सगळं दिसलं. आणि जरास ओळख असल्यासारखे, हायसं वाटलं. मुंबई, दिल्लीतील रेल्वे स्थानके आणि बाहेरची गर्दी, कोलाहल, घाण इ. अगदी अंगावर आल्यासारखी वाटतात पण इथे तुलनेने सगळ बेताचं होत. 

नंतर मात्र काही महिन्यातच चित्र झपाट्याने बदलताना दिसलं. जसजस ऑलिम्पिक जवळ येऊ लागलं तसं सापाने कात टाकावी तसं बैजिंग बदलले. आणि नंतर ही “ओळखीची” दृश्य लपल्यासारखी झाली ती मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या, ग्रेट वॉलची आठवण करून देणाऱ्या, उंच, सुशोभित अशा दगडी रंगाच्या भिंतीमागे! तिथे मात्र ह्या भारतीयांना परिचित चीनच्या खुणा अजून आहेत. अगदी आपल्या चाळी, झोपडपट्ट्या वाटाव्यात अशा घरातून लोक राहताना दिसले. सगळ तसच मात्र शहराच्या सुशोभीकरणात बाधा येऊ नये म्हणून उंच, आकर्षक भिंतीमागे झाकून टाकलेल... सगळ्या जगभरातून लोक येणार म्हटल्यावर छान दिसावं म्हणून, पसारा कोंबून ठेवल्या सारखं! शहरातील भिंतीमागे लपवलेली गरिबी, दारिद्र्य आणि भिंतीपुढे अलिशान परदेशी बनावटीच्या गाड्या सुसज्ज सहा पदरी रस्त्यांवरून धावत असलेल्या दिसल्या. मला तर सुरुवातीच्या काळात चीन सुद्धा भारतासारखाच विषमता असलेला देश वाटला खरतर तसाच आहे. शहरी-ग्रामीण दरी चीनमध्ये सुद्धा दिसली. जरा मुख्य शहरापासून लांब गेलं तरी लगेचच ‘वेगळा’ चीन दिसतो. आपल्यासारखीच खेडी, त्याच्या पुढील शेती, साध्या पारंपारिक वेशातील लोकं, वगैरे. 

पाच वर्षात काही ओळखीचं, काही अनोळखी सारखं भेटतच राहिलं. मात्र चीनी सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीचा वेग अधिक दिसला. कदाचित, सरकारचे नियंत्रण, पकड असल्यामुळे असेल. अगदी एका रात्रीत होत्याचं नव्हत आणि नव्हत्याचं होत चीनमध्येच होऊ शकतं. याची साक्ष म्हणजे २००८ मधले बेईजिंग ऑलिम्पिक आणि २०१० मधले शांग-हाय वर्ल्ड एक्सस्पो आणि त्याच्या निमित्ताने दोन्ही शहरात झालेला कायापालट हे आहे. 

रस्ते, वीज, पाणी, वाहतूक व्यवस्था अशा मुलभूत पायाभूत सुविधा शहरात तरी अत्यंत सुस्थितीत आहेत. एकूणच चीनमध्ये ज्या वेगाने अतिजलद ट्रेनच (high speed train) जाळं सगळीकडे पसरल आहे ते अवाक करणार आहे. म्याग्लेव (Maglev- Magnetic Levitation) ट्रेन तासाला ३५० किमी वेगाने शहरापासून विमानतळापर्यंत धावते. बेईजिंग, शांग-हाय शिवाय चीनमधील छोट्या शहरांमधील रेल्वे स्टेशन सुद्धा एखाद्या विमानतळाप्रमाणे अत्यंत आधुनिक, स्वच्छ, सुशोभित केली आहेत....पाश्चात्य शहरांच्या तोडीस तोड. 

शांग हाय मधील संध्याकाळी तर “ लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया ” या ओळींची आठवण व्हावी अशा असतात . कृत्रिम दिव्यांचा इतका प्रकाश, झगमगाट कि त्यांच्या माऱ्यापुढे आकाशातले तारे, चांदण्या असं कधी फारसं स्पष्ट दिसलच नाही. शांग-हायला श्रीमंतांचे शहर असं म्हणतात कारण महागड्या शहरांच्या यादीत ते वरच्या क्रमांकावर आहे. या श्रीमंतांच्या शहरात तर परदेशी बनावटीच्या महागड्या गाड्याच मुख्यत्त्वे पाहायला मिळतात. ज्या चालविताना अनेक स्त्रियाही दिसतात. 

चीनी स्त्री शक्ती 

चीनी स्त्री शक्तीचे प्रथम दर्शनाचा हा एक किस्सा सांगण्याचा मोह आवरत नाहीये. बेईजिंग मध्ये असतना मूलाला घेऊन प्रथमच हॉस्पिटल मध्ये गेलो होतो. पोहचलो तर काय हॉस्पिटलच्या पोर्चमध्ये बरीच गर्दी, जोरजोरात भांडणाचे आवाज. स्वाभाविकपणे नजर गेली आणि पाहते तर काय ! एक चाळीशीची बाई एका पंचविशीच्या मूलाला बेदम मारत होती ! चीनी शक्तीच्या या प्रथम दर्शनाने मला अचंभित केलं! 

बाजारात सर्वत्र दुकानदार म्हणून, हॉटेल्स मध्ये वेटर म्हणून किंवा अगदी टोल नाक्यावर चलन फाडणे अशीही कामे स्त्रिया करताना दिसल्या. स्त्रियांचे पोशाख सुद्धा अगदी पाश्चात्त्य पद्धतीचे असतात. असं असूनही, कुणीही “टीपीकल पुरुषी” नजरेने त्यांच्याकडे बघतंय किंवा त्यांची छेडछाड करतय, असं कुठंच आढळल नाही. शांग-हाय, बेई जिंग सारख्या शहरातूनच नव्हे तर इतर ठिकाणी देखील; अगदी रात्री-अपरात्री सुद्धा स्त्रिया निर्भीडपणे वावरताना दिसतात. 

भारताच्या तुलनेने, छोट्या-मोठ्या शहरात स्त्रियांचं स्थान स्त्री-पुरुष समानतेच्या जवळ जाणारे वाटलं. चीनी स्त्रिया अधिक आत्मविश्वासू, निर्भीड, सुरक्षित वाटल्या. त्यांच्याकडेही स्त्रीयांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागतेच. पण परिस्थिती आपल्या इतकी वाईट नाही आढळली. 

यामागे चेअरमन माओ ची स्त्रियांच्या प्रगतीस अनुकूल धोरणे, प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी असलीच पाहिजे या विचाराचा पगडा, किंवा कायद्याचा वचक, भिती असेल. पण या सगळ्यातून आलेली एकूणच आचार-विचारातील शिस्त शहरात पाहायला मिळाली. 

चीनी माणूस आणि शिस्त 

माणूस जडणघडणीत सुद्धा राजकीय व्यवस्था कसा हातभार लाऊ शकते ते भारतीय आणि चीनी माणसातील फरकामुळे अगदी सहज दिसते. 

चीनी माणूस (अगदी कामवाली बाईसुद्धा) दिलेल्या वेळेपेक्षा पाच मिनिटे सुद्धा उशिरा येत नाही. शांग-हाय वुमेन्स फेडरेशन, शांग-हाय चॅरीटी फाउंडेशन या संस्थांबरोबर काम करतानाही एकूण चीनी लोकांची काम करण्याची पद्धत अत्यंत प्रोफेशनल असल्याचं पाहण्यात आलं. आम्हा भारतीयांच्या वेळ पाळण्याबद्धल, दिलेला शब्द पाळण्याबद्धल काय बोलावे? शिस्त चीनी माणसाच्या रक्तात भिनली आहे असे वाटणारे अनेक अनुभव आले. 

शांघाई मध्ये सार्वजनिक बस मध्ये कंडक्टर फक्त लांब पल्ल्याच्या गाड्यांना असतात. बाकीच्या बसमध्ये पुढच्या दराने चढायचे आणि तुमचे कार्ड त्या इलेक्ट्रोनिक मशीनला टेकवायचे कि तुमचे तिकिटाचे नाममात्र पैसे तुमच्या कार्डमधून वजा होतात. कार्ड नसेल तर कॉईन बॉक्स मध्ये पैसे टाकायचे हा साधा नियम लोक प्रामाणिकपणे करतना आढळले. कुणी लक्ष ठेवायला नाही तरी प्रत्येक जण व्यक्तिगत जबाबदारी असल्याप्रमाणे वागताना दिसले. 

बेईजिंग मध्ये असताना, मुख्य रस्त्यवर मध्यभागी किंवा अगदी पादचारी मार्गाच्या शेजारी अनेक गुलाब फुललेले दिसले. पण कोणीही ती फुले तोडताना दिसले नाही. याउलट आपल्याकडे एका शहरात असा प्रयोग केला तर दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत कुंड्याही गायब झाल्या असे चीन भेटीवर आलेल्या एका केंद्रीय नेत्याकडून कळले. 

असं सगळं चीनी लोकांच्या शिस्तीच कौतुक आठवतानाच, समूह मानसिकता आणि कायदा यांचा संबध दाखवणार हा एक किस्सा आठवतोय. भारत औषधनिर्मिती क्षेत्रात चीनपेक्षा पुढे आहे. चीनमध्ये फुफुत्साच्या कर्करोगाचे प्रणाम प्रचंड आहे. प्रदूषण, सिगारेटच व्यसन इत्यादी कारणांमुळे असेल पण त्यावरील उपचारासाठीची औषधे मात्र चीनमध्ये प्रचंड महागडी आहेत. परिणामी हेच शिस्त पळणारे लोक आपल्या भारतीयता मित्रांना भारतातून येताना ही औषधे स्वस्त मिळतात म्हणून आणायला सांगतात. आमचे भारतीय मित्र चीनी मैत्रीसाठी हे करू पाहतात. आता कुणी म्हणेल, भारत आणि चीन युद्ध आणी सीमा ताण असूनही लोक मात्र एकमेकांशी प्रेमाने कसे वागतात? तर, युद्ध, सीमा ताण या गोष्टी सामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत संबंधात शक्यतो येत नाहीत. जसं पाकिस्तान, भारत एकमेकांना शत्रू राष्ट्र मानतात. पण जेव्हा दोन्ही देशातील सामान्य लोक एकमेकांना भेटतात, बोलतात तेव्हा काही मिनिटातच हे शत्रुत्व विरघळून जाते अस दोन देशातील लोकांचा अनुभव आहे. म्हणून तर “पीपल टू पीपल कॉनटॅक्ट” हे धोरण आपल्या सरकारने स्वीकारले आहे. जितके सामान्य नागरिक एकमेकांना भेटतील तितके गैरसमज दूर व्हायला मदत होते. आणि १९६२ युद्ध हे आपण म्हणतो. चीनमध्ये हे युद्ध फक्त बुद्धिमान वर्गाला माहिती आहे. सामान्य चीनी माणसाला नाही. ते १९६२ च्या घटनेला युद्ध मानीत नाहीत!!! 

तर ही फुफुत्साच्या कर्करोगावरील औषधे विमानातून आणायला कायद्याने बंदी आहे आणि त्यासाठी कडक सजाही होऊ शकते. शांग-हाय जवळ असणाऱ्या वूशी शहरात सध्या कैदेत असलेल्या भारतीयांना अशीच कॅन्सर संबंधित औषधांचा मोठा साठा चीन मध्ये विना परवाना आणला म्हणून अटक झालेली आहे. नियम, कायद्याची भीती ‘स्वतःला’ नसली कि हेच चीनी गैरव्यवहार करतातच! इतके प्रचंड लोकसंख्या असल्यावर समूह मानसिकता लक्षात घेता कायद्याच बडगा का आवश्यक आहे हे कळते. म्हणजे माणूस म्हणून आम्ही भारतीय, चीनी सगळे सारखेच की ! आजच्या जागतिकीकरणाच्या युगातही “हिंदी चीनी भाई-भाई” हे अगदी लागू पडते. 

जागतिकीकरण आणि हिंदी चीनी भाई-भाई 

एकूण आशिया व आफ्रिकी देशांच्या मानगुटीवर गोरेपणाचे भूत स्वार आहेच. जिथे जागतिकीकरण जास्त, प्रोडक्ट्सचा बाजार जास्त तिथे हा ‘ गोरेपणाचा आजार’ जास्त ! चीनी ही त्यातलेच. त्यांना अमेरिकेचं, किंवा पांढऱ्या, गोऱ्या कातडीचे आकर्षण. मग त्याच आकर्षणापायी, गोरे करतील तस आपण करायचं ! बाजारात गोरी बनवणारी क्रीम, लोशन, मास्क मोठ्या प्रमाणावर दिसली. जाहिरातींमध्येही पाश्चात्यांचा मॉडेल म्हणून वापर केलाजातो. 

इतकी लोकसंख्या असलेले हा देश असल्यानी परिणामी मोठा ग्रहक वर्ग आहे. नफेखोर कंपन्यांना ह्या लोकांची नाडी सापडली आहे. मग ते म्हणतील तसं, तीच मूल्य श्रेष्ठ! “गोरेपणा हा श्रेष्ठ, काळा रंग म्हणजे उणीव”. लोकांना भुरळ पडण्याच, त्यांची सारा-सार विचार करण्याची बुद्धी बंद करण्याचं सामर्थ्य आकर्षक जाहिरातीत असतं. अगदी मूल्य परिवर्तन करण्याचं. एकूण ह्या कंपन्यांनी आपल्याला मानसिकदृष्ट्या आजारी, निर्बुद्ध बनवलच आहे. ते जसे खेळवणार तसे आपण खेळायचे. 

जागतिकीकरण म्हणा किंवा अमेरिकीकरण त्याचा मोठा प्रभाव भारतासारखाच सर्वत्र दिसला. मोठ्या शहरात जागोजागी मॅकडोनाल्डस, के.एफ.सी., स्टार बक्स- ची दुकाने दिसतात. आपल्यासारखीच त्यांचीही तरुण पिढी तिथे गर्दी करून असते. आपल्यासारखाच या कंपन्यांनी चीनी चवीला साजेसे बदल त्यांच्या उत्पादनात केलेत. या कंपन्यांच्या अत्यंत आकर्षक जाहिरातीचा भडीमार सार्वजनिक ठिकाणी, प्रसारमाध्यमांमध्ये होत असतो. स्वाभाविकपणे त्या लहानग्यांना, युवा पिढीला भुरळ पाडतात. 

चीनी युवा पिढी 

साधारणपणे १९८० नंतर जन्मलेली मुले ही आजची चीनी युवा पिढी. त्यांच्यात आणि त्यांच्या पूर्वीच्या १-२ पिढ्यांत खूप फरक दिसतो, जो स्वाभाविकही आहे. नवीन पिढी स्वकेंद्रतीत दिसते आहे. इंटरनेट, ब्लॉग्सच्या माध्यमातून व्यक्त होते आहे. याच माहितीजालाने माहितीचे भयंकर शस्त्र आता सामान्य नागरिकांना घर बसल्या मिळाले आहे. सावध चीनी राज्यकर्त्यांना ह बदल दिसतोय. एकूण माहितीजालावर येणाऱ्या माहितीवर बारीक लक्ष चीनी सरकार ठेवून आहे. चीनमध्ये फेसबुक, यु ट्यूब, ट्वीटर इत्यादी संकेतस्थळांवर बंदी आहे. 

या माहितीजाळाच्या पसाऱ्याची एक चुणूक म्हणजे हे एक उदाहरण. काही महिन्यापूर्वी जपानमध्ये जेव्हा त्सुनामी आली आणि त्यातून आण्विक प्रदूषण झाले तेव्हाचे... या प्रदूषणामुळे समुद्राचे पाणी आणि परिणामी मीठही आरोग्यास हानिकारक झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा बाजारात नव्याने जे मीठ येणार ते प्रदूषित, आरोग्यास हानिकारक असणार. अशा बातम्या ब्लॉग्सच्या माध्यमातून इतक्या झपाट्याने पसरल्या कि घाबरून लोकांनी मोठ्या प्रमाणात मिठाचा साठा करून ठेवला. परिणामी काही तासातच शांग-हाय आणि इतर अनेक शहरांच्या च्या बाजारातून मीठ नाहीसे झाले होते. 

एकूणच तरुण पिढी माहितीजाल, आधुनिक उपकरणे यांच्याच सहवासात राहत असावी असं वाटणारी दृश्य आजूबाजूला दिसली. आत्ता आत्तापर्यंत जगाशी फारसा संबंध न आलेले चीनी आता इतर देश, त्यातील परिस्थिती याबद्धल जाणून घेण्यास उत्सुक असावेत. मोठ्या शहरतील सार्वजनिक वाहतुकीच्या मेट्रो, बस यात तर सर्रास सगळी तरुण मूलं-मुली हातातल्या आधुनिक अशा मोबाईल, आय-पॅड वर अखंड काहीतरी शोधत किंवा खेळत असतात. ही तरुण मूलं-मुली आजूबाजूला पाहतच नाही. 

सध्या चीनी मुलींच्या आत्मकेंद्रिपणावर टीका सुरु आहे. (जणू काही मुले तशी नाहीतच ) एका टीव्ही वरील टॉक-शो मध्ये एका मुलीने, “ मी जन्मभर मोटारसायकलवर मागे बसून हसण्यापेक्षा फेरारी मध्ये बसून रडणे पसंद करीन ” असं विधान केलं होतं. श्रीमंतीची, भौतिक साधनंची ओळख ह्या देशालाही, ह्या पिढीला खरोखर गेल्या ३०-३५ वर्षातच झाली आहे. त्यामुळे आजच्या १९८० नंतरच्या पिढीला कमी कष्टात, फटाफट नवश्रीमंत होण्यात जास्त रस आहे. ही युवा पिढी स्वकेंद्रित, बिनधास्त, पाश्चात्यीकरण झाल्यासारखी, काहीशी हरवलेली वाटली. माओच्या चीन मधील ‘सांस्कृतिक क्रांतीने’ जे स्वत्व धुवून टाकलं, जी नवीन मुल्ये प्रस्थपित केली त्याची ही फळ म्हणायला हरकत नाही! चीनी सरकारला आता कळून चुकलाय कि जर युवा पिढीला वाचवायचे असेल, हे नवसांस्कृतिक आक्रमण आवरतं घ्यायचे असेल तर उपाय करायला हवेत.पण नेमका कोणता उपाय हा सरकारपुढील मोठा प्रश्न आहे .


स्वसंकृती जतन : सरकारपुढील महत्त्वाचे धोरण 

१९६० च्या दशकातील कडवी माओवादी सांस्कृतिक क्रांती ही एक मोठी चूक होती असं उघडपणे बुद्धिवंत बोलू लागलेत. चेअरमन माओच्या व्यक्तिगत आयुष्यावर, त्याने घेतलेल्या निर्णयांवर लोक टीकात्मक बोलू लागलेत. ही चीनमध्ये होऊ घातलेल्या परिवर्तनाची, सत्ताबदलाची नांदी आहे असे म्हणयला हरकत नाही. नुकताच झालेला बो शिलाय या उभरत्या नेत्याचा पाडाव हे सध्याच्या राजकारणातील कडव्या माओवादाच्या पुनरुत्थानाचा पराभव मानला जातो. कारण बो शिलाय ने छोंगछीग आर्थिक मॉडेल आणि लाल क्रांतीगीतांच्या प्रसारातून पुन्हा एकदा ६० च्या सांस्कृतिक क्रांतीच्या स्मृती जाग्या केल्या होत्या. 

स्वकेंद्रितता, चंगळवाद, बोकळलेला भ्रष्टाचार, नैतिक मुल्यांची घसरण याला उपाय म्हणून आता माओला नव्हे तर गौतम बुद्धाला एकदा आवाहन केल जात आहे. सरकारकडून बुद्ध मंदिर, बुद्धाची विचारसरणी यांचा प्रचार सुरु आहे. क्न्फुशस चे पुनरुज्जीवनसुद्धा अगदी रिती-रीवाजांसह केले जात आहे. पारंपारिक सण साजरे करणे, त्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे असो किंवा “छीपावो” ने सजलेली दुकाने असो (छीपावो म्हणजे चीनी स्त्रियांचा अंगालगत बसणारा पारंपारिक पोषाख.)! एकूणच स्वसंकृती जतन किंवा स्वसंकृती उत्खनन म्हणा, हे एक सरकारपुढील महत्त्वाचे धोरण दिसते आहे. 

वृद्धांचा देश आणि दुसरे मुल 

क्न्फुशसने कुटुंब पद्धतीवर खूप भर दिला होता. आज जसजसा चीन वृद्धांचा देश होऊ लागलाय तसतस क्न्फुशसप्रणीत कुटुंब पद्धती, मुलांची माता-पित्यांबद्दलची कर्तव्ये यांना आता सरकारी महत्त्व आलाय. दररोज वर्तमान पत्रात त्या संबंधी प्रबोधनपर रकाने देखील असतात. 

वृद्धांना पेन्शन, आरोग्याच्या सवलती, सार्वजनिक बसमधून प्रवास मोफत अशा योजनांमुळे सरकारी तिजोरीवर त्याचा ताण पडतो आहे. परिणामी, एक अपत्य धोरणही आता सैल केले आहे. जे दाम्पत्य आपल्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य आहे अशा दाम्पत्याला दुसरे मुल होऊ देण्यास आता परवानगी आहे. इतक्या लोकसंख्येमुळे जीवनावश्यक गरजांच्या, संसाधनांच्या पुरवठ्यावर अधिक ताण येत असला तरी सरकारला ही कसरत करावी लागते आहे असं दिसतंय. त्यातून मग अन्नधान्य सुरक्षिततेसारख्या समस्या निर्माण होत आहेत. 

अन्नधान्य सुरक्षितता 

आकडेवारीच्या भाषेत बोलायचे झाले तर जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारण २२ % लोक चीनी भूभागावर राहतात. तर चीनमधील फक्त १० % जमीन लागवडीयोग्य आहे. या पार्श्वभूमीवर, देशाच्या एकूण गरजेच्या सुमारे ९५% शेती उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवण्याचा विडा चीनने उचलला आहे. स्वाभाविकपणे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते, जनुक तंत्रज्ञान वापरून फळ-भाज्याचे उत्पादन केले जाते. परिणामी उत्पादनाचा दर्जा घसरला आहे. 

याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे कलिंगड स्फोट प्रकरण. कलिंगड लागवड करताना वापरलेल्या रासायनिक खताचं प्रमाण अधिक झाल्यामुळे ढिगाने कलिंगड फटाफट फुटून गेली. या प्रकरणामुळे लोकांनी भीतीने कित्येक दिवस कलिंगड घेणेच थांबविले होते. परिणामी बाजारातली कलिंगड अक्षरश मातीमोल झाली होती. 

येनकेनप्रकारेण पैसा मिळवायच्या वृत्तीमुळे खाद्यापदार्थांत भेसळीच्या समस्येने विक्राळ रूप धारण केले आहे. २००८ मध्ये लहान मुलांच्या दुध पावडरचे प्रकरण खूप गाजले होते. दुध पावडर मध्ये मेलामाईन हे प्लास्टिक भेसळ केल्यामुळे अनेक लहानग्यांना जीवाला मुकावे लागले, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले. हे प्रकरण इतके भयंकर होते की कधीही दुध पावडर न चाखलेल्या आमच्या १ वर्षाच्या मुलालाही अनेक शारीरिक चाचण्या, इंजेक्शन्सला सामोरे जावे लागले. आपल्यापैकी काहींना चीनमध्ये प्रयोगशाळेत अंडी कशी बनवतात ही इमेल आली असेलही. एकूणच चीनमध्ये राहताना अन्नधान्य सुरक्षितता ही काळजीची गोष्ट होती. तिथे दररोज काहीना काही गंभीर अन्नधान्य भेसळ प्रकरणे मोठ्या प्रमाणावर बाहेर येत आहेत. 

आयात कमीत कमी करायची, आंतरराष्ट्रीय बाजारात स्वतःच्या चलनाला मानाचे स्थान मिळवून द्यायचे असं ठरवल्यावर हे सगळं अपरिहार्य असाव का असा प्रश्न पडतो. 

आंतरराष्ट्रीय बाजारात चीनी चलनाचे स्थान 

आर.एम.बी. (Renmin Bi – people’s currency ) हे चीनी चलन पारंपारिक भाषेत ‘युआन’ किंवा ‘ख्वाय’ म्हणूनही ओळखले जाते. आजच्या तारखेनुसार डॉलरच्या तुलनेत चीनी चलन भारतीय चलनापेक्षा ८ पट ताकदीचे आहे. एका डॉलरसाठी आपल्याला साधारण ५५ रुपये मोजावे लागतात तर चीनी माणसाला ६ आर.एम.बी. तर एक चीनी आर.एम.बी. साठी भारतीयांना साधरण ९ रुपये मोजावे लागतात. कारण चीनमध्ये आयाती पेक्षा निर्यात जास्त आहे. त्यांचा जी.डी.पी.चा आकडाही वाढीच्या मार्गाने जाणारा आहे. शिवाय वाढती परदेशी गुंतवणूक आहेच या आणि अशाच कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यपेक्षा चीनी चलनाची पत वरचढ आहे. 

फेब्रुवारी २०१२ दरम्यान भारतात झालेल्या ‘ब्रिक्स परिषदे’त सदस्य राष्ट्रांनी (ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साउथ आफ्रिका) परस्परांतर्गत व्यापारासाठी डॉलर ऐवजी स्वतःच चलन वापरण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. हे पाचही देश म्हणजे आजच्या घडीला जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. जाणकार असं म्हणतात की काही वर्षातच चीनी जी.डी.पी.चा आकडा हा अमेरिकन जी.डी.पी.चाच्या पुढे जाणार आणि अमेरिकन डॉलरची जागतिक बाजारातील जागा चीनी युआन घेणार. अगोदरच, जगभरातील बहुतांशी सगळ्या देशाच्या बाजाराचा ताबा “मेड इन चायना” च्या वस्तूंनी घेतला आहेच. पण या सगळ्याबरोबर “वापरा आणि फेका” सारखी मूल्य सुद्धा चीन निर्यात करतो आहे असं वाटतं. 

वापरा आणि फेका 

गेल्या ५ वर्षात, चीनमध्ये कधीही, कोणीही हातरुमाल वापरताना दिसले नाही. त्या ऐवजी ते लोकं (स्रिया आणि पुरुषही) टीश्यु पेपर वापरतात. एकूणच सर्वत्र “ वापरा आणि फेका” हा दृष्टीकोन पाहायला मिळाला (वस्तूच्या बाबतीत आणि काहीवेळा माणसांच्या बाबतीतही). स्वस्त मालाचा, हलक्या गुणवत्तेच्या वस्तूंचा इतका सुळसुळाट आहे कि लोक एकदा स्वस्त वस्तू घेतात वापरतात आणि ती फेकून देतात. दुरुस्ती, पुनर्वापर वैगेरे प्रकार नाहीच. हे अगदी दैनंदिन वापराच्या वस्तूपासून ते इलेक्ट्रोनिक उपकरणांच्यापर्यंत सरसकट आढळले. याउलट आपण सर्वसामान्य भारतीय एकदा वस्तू घेतली की ती जास्तीत जास्त काळ वापरत राहतो, परत परत दुरुस्त करून वापरतो. 

खर तर, आज चीनी वस्तुंनी बाजार भरले आहेत, आपल्याला कितीही जपावे वाटले तरीही ! हलक्या दर्जाच्या वस्तू घेताना केवळ पर्याय नाही म्हणून आपण घेतो असं जाणवलं. कारण मुळातच भारतात ते इतके स्वस्त मिळतात मग दर्जाचा फार विचार न करता घेतो आपण. विशेषतः शोभेच्या वस्तू किंवा प्लास्टिकच्या बरण्या-डबे अशा वस्तू, खेळणी याबाबत हे जास्त दिसते. मुलं बाजारात गेल्यावर खेळण्यासाठी हट्टच करतात, मग १५० रुपयांचं चांगले खेळण घेण्याऐवजी २० रुपयांचं चीनी बनावटीच खेळण आपण घेऊन देतो. तात्पुरती का होईना आपण खूष, मुल खूष. एकतर वेळ निभावून जाते आणि पैसे कमी लागतात. पण एकूण वापरा आणि फेका हे मूल्य आपल्यालाही स्वीकारावं लागलाय हे खरं आहे. 

या वरून “१२७ अवर्स” हया सत्य कथेवर आधारित सिनेमाची आठवण झाली. या सिनेमातील मुख्य कलाकार घळी मध्ये अडकून पडलेला असतो. सुटका करण्यासाठी स्वतःच्या जवळील सर्व हत्यारे तो वापरून बघतो. त्याच्याकडे एक चाकू असतो. त्या चाकूने तो दोरी कापण्याचा प्रयत्न करतो. पण फसतो. तेव्हा तो म्हणतो, “ डोन्ट बाय द चीप, मेड इन चायना मल्टी टूल. आय ट्राइड टू फाईंड माय स्वीस आर्मी नाईफ, बट...धिस थिंग केम फ्री विथ अ पलॅश लाईट. पलॅश लाईट वॉज अ पीस ऑफ शीट टू!!” एकूण काय तर, “वापरा आणि फेका” हे जगालाच स्वीकारावं लागलय आणि त्याला चीन आणि आपणही जबाबदार आहोतच. 

भारत आणि चीन या दोन्ही अतिप्राचीन सभ्यता, संस्कृती. सांस्कृतिक, आर्थिक, वैचारिक देवाणघेवाणीचा प्राचीन इतिहास असलेली ही दोन महान राष्ट्रे. दोन्हीच्या इतिहासात डोकावले तर अनेक साम्यस्थळे सापडतात. चीन आणि भारताच्या तथाकथित प्रगतीचा आढावा घेतला तर काय चित्र दिसते ? 

चीन, जागतिक महासत्ता होऊ पाहणारा किंबहुना झालेला देश. ज्याची स्पर्धा अमेरिकेशी आहे आणि ज्याच्याबद्धल जगभर उत्सुकता, कुतूहल आहे. भारत, ज्याला जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून संबोधले जाते. ज्याच्याबद्धल सुद्धा जगभर उत्सुकता, कुतूहल आहेच. 

चीन आणि आपल्यात फरक वाटला तो मानसिकतेचा. चीनी मानसिकता भावनांपेक्षा तर्काला महत्त्व देते. तसाच त्यांचा आचार-विचार आहे. व्यवहाराचा विचार येतो तेव्हा चीनी भावना बाजूला ठेवतात. नागरिकांच्या व्यक्तीगत हक्कांपेक्षा पार्टीने ठरवलीले राष्ट्रहित मोठे हे चीनचे धोरण आहे. चीनने जी काही तथाकथित प्रगती केली आहे त्यामागे कायद्याचा वचक, दहशद, शिस्त, प्रसंगी मानवी हक्कांची पायमल्ली आहे. 

भारताच्या प्रगतीला अधिक टिकाऊ मानणे हे आजकाल प्रचलित आहे. पण पक्षीय मतमतांतराच्या गलबल्यात आणि एकमेकांवर कुरघोडी करू पाहणाऱ्या दबावगतांच्या राजकारणात मुख्य प्रगतीची वाट बऱ्याचदा हरवल्यासारखी वाटते. 

चीनी आणि भारतीय जनतेने स्वतःच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या राजकीय, आर्थिक वाटा निवडल्या आहेत. त्यांचे आपापले गुण-दोष आहेत.प्रसंगी दोन्ही देशांना कुम्पणपलीकडचे गवत अधिक हिरवे वाटते. म्हणूनच या दोन खंडप्राय पौर्वात्य शेजारी देशातील घडामोडींचा, वाटचालीचा अभ्यास अत्यंत रंजक आहे. 


३ टिप्पण्या:

DP म्हणाले...

Atishay sundar ....vachatanna agadi dolyasamor aalya goshti...

Trupti म्हणाले...

धन्यवाद. dp.

Trupti म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.