काल English Vinglish सिनेमा पाहिला. एक अत्यंत तरल चित्रपट. तो पाहिल्यावर प्रकर्षाने डोक्यात विचार आला तो म्हणजे दोन व्यक्तींमधील नातेसंबंधातील "राजकारणाबद्धल ". समोरच्याला समजून न घेणं, गृहीत धरण, समोरच्याला मोठ्ठ होऊ न देणं.
शशी म्हणजे लाडू करण्यासाठीच जन्माला आली आहे. तिला English बोलताच येणार नाही असं वारंवार तिचा नवरा, सतीश तिला म्हणून तिच्यात न्यूनगंडच निर्माण करत राहतो. तिची टिंगल करतो. अगदी मुलांसमोर. मग मुलही आईची टिंगल करतात. नातेसंबंध कसे घडत-बिघडत जातात याचे हे उत्तम उदाहरण वाटलं.
मला तर वाटतं दोन व्यक्ती मग ते कुणीही असोत आई-मुल, वडील-मुल, नवरा-बायको, दोन मित्र, दोन मैत्रिणी, नणंद-भावजय, सासू-सून, सासरा-सून, ऑफिसमधील दोन सहकारी इत्यादी इत्यादी. यांच्या परस्पर संबंधात, नात्यात जेव्हा कुरबुरी असतात किंवा एकमेकांबद्धल असमाधान, तक्रारी असतात तेव्हा बऱ्याचदा miscommunication असतं. किंवा कुणीतरी एक जण "राजकारण" करत असतो. समोरच्याला dominate करत असतो. समोरच्याच खच्चीकरण करत असतो. त्याला सारखं बोलून बोलून, टिंगल करून त्यात न्यूनगंड निर्माण करतो. कारण त्याला स्वतःच्या स्थानाबद्दल, ते जाईल कि काय, किंवा समोरचा माझ्यापेक्षा मोठा / वरचढ झाला तर ? अशी भीती, शंका असते. किंबहुना त्याला स्वतः बद्धल आत्मविश्वास, खात्री नसते.
बायकांना तर ह्या नातेसंबंधाना आयुष्यभर हाताळाव लागतं. माहेर-सासर या दोऱ्यांवर कसरत करत.
दुर्दैवाने, बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला मिळणारी वागणूक ही तुम्ही व्यक्ती म्हणून कशा आहात यापेक्षा इतर "घटकच" ठरवतात. या घटकांमुळेच प्रसंगी तुमच्या आजूबाजूला अचानक लोकांची गर्दी होते तर प्रसंगी लोक सोयीस्करपणे बाजूला सरकतात. हे घटक म्हणजे तुमची "लेबल्स". ज्याला समाजशास्त्रात ascribed status असंही म्हणतो. तुम्ही स्त्री आहात की पुरुष, तुमचं आडनाव काय, मग त्यावरून तुमची जात कोणती, मग तुमच्या पालकांचे सामाजिक स्थान काय, त्यांची आर्थिक ताकद किती (बहुतेक वेळा, डिग्री आणि संवेदनशीलता, Emotional intelligence जो दोन व्यक्तीच्या नातेसंबंधात महत्वाची भूमिका बजावतो, यांचा काडीचा संबंध नसतो ) इत्यादी, इत्यादी. म्हणजे दोन व्यक्तींचे संबंध, त्यांच्यात असणारी जवळीक याच गोष्टीमुळे असते.
पण जो खरा सुज्ञ असतो तो या लेबल्स च्या पलीकडे जाऊन "माणूस" पाहतो. स्वच्छ, कोऱ्या पाटीसारखं मन ठेऊन. मग हाच 'खरा' माणूस त्याच्या स्वतःच्या मनातील, त्याच्या संबंधात येणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या कोऱ्या पाट्यांवर नक्षी रेखाटतो, त्याला त्या समोरच्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या प्रतिसादातून, वागणुकीतून. इथे जर " I am Okay, You are Okay " असं असेल तर सुंदर रेखीव रांगोळी जमते. पण "राजकारण" असलं तर नुसते रेषांचे वार, नक्षी बिघडवणारे.
का बरं दुसऱ्याच मोठ्ठ होणं खपत नाही काही जणांना ? कदाचित ते स्वतःलाच घाबरत असतील. स्वतःलाच ओळखत नसतील.
तुम्ही नशीबवान असाल तरचं अशी "खरी" माणस तुम्हाला मिळतात का ? काय सुंदर वीण असते या अशा समान, I am Okay, You are Okay नात्यात ! अशी नाती, अशी माणस सर्वांना मिळोत. आमच्या मनाच्या पाट्या "लेबल्स" ने न ठरोत. एवढच त्याच्याकडे मनापासूनच मागण !
ॐ सह नाववतु ।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै ।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा