Translate

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

Golden Trumpet AKA चषकपुष्पी !


गेल्या काही दिवसांपासून हे झुपके लगडलेल पुष्पसौदर्य, वैभव  खुणावतय. मोहात पाडतय. 

स्वच्छ निळ आकाश, हिरवागार पर्णभार  अशा पार्श्वभूमीवर हे फुलांचे झुपके जाम खुलून दिसतात.  थंडीच्या दिवसात सकाळच्या कोवळ्या उन्हात अंगावर तेज, झळाळी लेवुन उगाचच भाव खात असतात आपले ! 

रोज सकाळी भेटतात, खुणावतात, छळतात.  म्हणून जरा त्यांचा माग काढावा म्हटलं. नाव, गाव, काम काय करतात  इत्यादी. म्हणून जरा आजूबाजूला चौकशी केली. महाजालावर शोधाशोध केली. आणि भेटली बुवा एकदाची ! मस्तच ! एक कुतूहल तूर्तास शमलय. 





तर ह्या झाडाच इंग्रजी नाव    Golden Trumpet आहे असं कळलंय.  त्याच्या सौंदर्याच तंतोतंत वर्णन करणारं. संस्कृत मध्ये ह्याला "चषकपुष्पी " म्हणतात. फुलाच्या आकारचं चषकाशी असणार साधर्म्य सांगणारं.  तर हिंदीमध्ये याला "सैतानी फुल " , "जहरी" किंवा  "जहरी सोनटक्का"  म्हणतात. त्याच्या गुणधर्माची ओळख करून देणारं ! "सौंदर्य विषारी असतं" असं कुठतरी वाचल्याचं एकदम आठवलं. 



ही चषकपुष्पी मुळची मध्य अमेरिका आणि ब्राझील मधली. भारतातही सापडते. भाल्याच्या आकाराची पान असणाऱ्या या चषकपुष्पीची फुलं सफेद, जांभळ्या, गुलाबी किंवा नारंगी रंगाची सुद्धा असतात. पुनरुत्पादन फुलांपासून  होत नाही. ते होते त्याच्या शेंगामधील दाणे किंवा बियांपासून. चषकपुष्पीच्या toxic गुणामुळे त्याच्या फुलं, पान आणि झाडाच्या सालीचा औषध म्हणून उपयोग केला जातो. पित्तदोष, डोकेदुखी  इत्यादीवर या वनस्पतीचा आयुर्वेदात वापर केला जातो म्हणे. 





सध्या राहते आहे तो परीसर निसर्ग समृद्ध आहे. रोज नवनवीन फुल, पान, झाडं, पक्षी भेटत असतात. असं लक्षपूर्वक आजूबाजूला पाहायला कधी वेळच मिळाला नव्हता.

बघुयात कुणाकुणाची भेट घालून देतंय हे नवीन लागलेले वेड !

(फोटो मोबाईल च्या कॅमेरातून काढलेत. त्याच्या मर्यादा संपूर्ण वापरून. तेवढे समजून घ्यालच. आणि या चषकपुष्पी विषयी तुम्हाला अजून माहिती असल्यास अवश्य सांगा.)    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: