या क्षणी तरी असं वाटतंय की, हा त्यांच्या माझ्या नात्याला दिलेला न्याय आहे.
श्रद्धांजली ? हा शब्द वापरतानाही थांबायला होतंय. कारण मन अजून मानतच नाही त्यांचं असं अचानक, मला चाहूल लागू न देता, न भेटता, न सांगता जाणं. Permanently unreachable होणं.
जीवाभावाच्या माणसाचा मृत्यू हा आपल्या प्रत्येकालाच कधी ना कधीतरी अनुभवावा आणि नंतर स्वीकारावा लागतोच. अवघड प्रक्रिया असते सगळी. समोरचे माणूस असं एका क्षणात आपल्यातून निघून जातं. कुठल्यातरी निराळ्या विश्वात. आपण परत कधीच त्यांना भेटू शकत नाही. बोलू शकत नाही. काहीतरी अर्धवट राहिल्यासारखें वाटतं. त्यांच्या सोबत अजून खूप काही share करायचं, अनुभवायचं राहिलंय हि जाणीव होऊन मन सैरभैर होतं. वर्तमानाचा धागा निसटून ते सोबत गेलेल्या भूतकाळाच्या ठेव्यांना शोधायला लागतं. न घडलेल्या भविष्यकाळाच्या कल्पनेतही जातं आणि समोर आलेल्या उणीव, मोठ्या पोकळीची जाणीव करून देतं.
पण या प्रक्रियेतून वास्तव स्वीकारायला मदत होते. माझा हा शब्दप्रपंच अशासाठी सुद्धा आहेच. शिवाय शब्दांमध्ये बांधून, निसटून गेलेल्याला कायम जतन करायचा प्रयत्नही. एकमेकांसोबत "गेलेल्या" क्षणांप्रती उपकृतता सुद्धा.
एक जानेवारीला सरत्या दुपारी त्यांच्या मिस्टरांचा whatsapp message आला. Sad to inform you I lost my dear ..... yesterday. बसूनच राहिले नुसती ते वाचून. अविश्वसनीय धक्का आसवांचा बांध सुटला त्या संघ्याकाळी. त्या नंतरही ३/४ दिवस कित्येक हुंदके आणि आठवणींचा पाढा. मन सैरभैर झालं . रडून झालं. डोके दुखून झालें. डोळे सुजून झालें. बसलेय आता स्वतःला गोळा करत. आधार तुटणे, पोकळी जाणवणे हे शब्दप्रयोग अनुभवले.
काही दिवसांपूर्वी आमचा message झाला होता. तब्येत ठीक नसल्याचं कळवलं होत त्यांनी पण इतकं गंभीर असेल असं ध्यानीमनीही आलं नाही. दोन महिन्यांपूर्वी लांब फोन झाला होता. She sounded perfect. नेहमीप्रमाणेच आश्वासक आवाज, सकारात्मक बोलणं, दिलासा देणारे शब्द. मग हे असं अचानक ? गतकाळाची, बावीसेक वर्षांच्या सहवासाची रीळ सैल झाली.
मी एम ए च्या पहिल्या वर्षाला असताना त्यांची माझी प्रथम भेट झाली. पुण्यात. टिमवि मध्ये. आम्हाला बेसिक मेडिकल इन्फॉरमेशन देणं आवश्यक होतं. तेव्हा आयुर्वेदिक विभागात गेले असताना त्या तिथे होत्या. वैद्य “आरती देव” ! सडपातळ बांधा, साडेपाच फुटांच्या आसपास उंची, गोरा वर्ण, शांत नजरेत आत्मविश्वास, बोद्धिक चमक आणि वागण्याबोलण्यात मृदुता असं अत्यंत आकर्षक अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व. माझ्यापेक्षा आठेक वर्षांनी मोठ्या असाव्यात. अजून आठवतात तेव्हाचे त्यांचे मेहंदी लावलेले हात ! अविस्मरणीय पहिली भेट!
तेव्हाच बहुधा मी सुद्धा योग आयुर्वेद डिप्लोमा करत होते. त्यामुळे माझं पण आरोग्याविषयीचं कुतूहल, awareness जागा होत होता. तेव्हाच्या माझ्या तब्येतीच्या किरकोळ तक्रारी त्यांनी अशा चुटकीसरशी बऱ्या करून दिल्या. त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास वाढला होता. इतकं मोहक, आपलंसं करणार व्यक्तिमत्त्व आणि हाताला गुण, त्यामुळे टीमवि सुटलं तरी बाजीराव रोडवर महाराणा प्रताप उद्यान उद्यानाजवळील त्यांच्या क्लीनिक मध्ये जात राहिले. आजारामागची कारणमीमांसा त्या समजावून सांगायच्या. आणि बहुतांशी उपाय म्हणजे दैनंदिन आहारविहारातील बदल असाच असायचा. मला आवडायचं त्यांच्याशी गप्पा मारायला आणि त्यातून माझी आरोग्य ज्ञानाची भूक भागवायला. इतके साधे सोपे, शास्त्राला धरून बोलणं प्रेमात पाडून गेलं त्यांच्या. आमची मैत्र बहरत गेलं.
पुढे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्या सोबत होत्या. डॉक्टर म्हणून, मैत्रीण म्हणून. friend, philosopher , guide अशा विविध रूपात, प्रसंगाच्या गरजेनुसार. प्रत्येक भेट आठवायचा प्रयत्न करतेय. त्यांचं निखळ हास्य अविस्मरणीय होतंय. व्यक्तिमत्वातील समतोल आठवत राहतोय.
लग्न केल्यावर प्रथम निनादबरोबर, भेटलेले आठवतंय. नंतर क्ल्आम्ही पुणे सोडून दिल्ली आणि भारताबाहेरच रहात आलोय. आमच्या दोन्ही मुलांचे जन्म, ती बाळंतपणं, मुलांचे संगोपन, वाढणं, माझं ब्लॉग लिहिणं, मॅरेथॉनमध्ये भाग घेणं, नुकतच योगात पारितोषिक मिळवणं अशा आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर त्या कधी माझ्या गुरु म्हणून, कधी मैत्रीण म्हणून तर कधी मनावर मळभ आल्यावर philosopher म्हणूनही त्या होत्या. अजून आठवतंय, भारताबाहेर असले तरी मुलांचं धडपडणं, छोटे अपघात अशा मेडिकल emergency च्या वेळी माझं हक्काचं ठिकाण होतं ते. एका कॉल च्या अंतरावर. पुण्यात आले कि ज्या भेटी घेतल्याशिवाय पुणे ट्रिप पूर्ण होत नाही अशापैकी त्यांची एक भेट होती. आता पुण्याला गेल्यावर ती भेट नसणार हा विचार कातर करतोय. खिन्न करतोय.
गेले काही वर्ष त्याना कॅन्सर होता. आम्ही दोनतीन वर्षातून एकदा भेटायचो. त्यामुळे अशा वेळी कधीच कॅन्सर चा विषय आम्ही काढलाच नाही. मागच्या पुणे भेटीत ऐन वेळी ताप आल्यामुळे त्यांची ठरलेली भेट हुकली होती. त्या पूर्वी पुण्याला आले तेव्हा गणराज मध्ये भेटलो होतो. तेव्हा ट्रीटमेंट मुळे आहाराची पथ्य म्हणून तिथे त्यांनी फक्त कॉफी घेतल्याची आठवतंय. केमोथेरेपि सुरु होती. पण त्या कायम आमच्या पहिल्या भेटीसारखाच प्रसन्न, हसतमुख असायच्या.
कळत नाही कि मलाच संकेत कळले नाहीत कि आजाराचं गांभीर्य कळलं नाही कि she will come out of this ह्या वेड्या आशेत होते ? खूप बोलायचं राहून गेलं. भेटायचे राहून गेलं.
२०२० हे एकूणच विचित्र वर्ष होतं. आणि त्या वर्षाअखेर ३१ डिसेंबरला झालेल्या या permanent loss, वियोगामुळे त्याचं टोक गाठल्यासारखं झालंय.
नेमकी कुठे जातात माणसं मृत्यूनंतर ? किती fragile आहे सगळं जगणं, आजूबाजूच्या माणसांच्या असण्याला गृहीत धरणं असले प्रश्न, विचार येऊन गेले.
I will miss you my dear friend ! एक सच्चा माणूस मी आणि, खरं तर समाजाने सुद्धा, गमावल्याचं दुःख आहेच. पण भाग्यवान हि समजते स्वतःला कि अशा मैत्रीचं देणं मला मिळालं. तुम्ही दिलेले आरोग्याचे मंत्र, जगण्याचे मंत्र तुमच्या रूपाने असतील सोबत कायम. You are always in my heart and thoughts. अगर सच में वो कोई जगह है तो, पक्का, फिर मिलेंगे मेरे दोस्त, उसपार ! RIP 🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा