ती, तीन फुटांची,
सिरॅमिकची फुलदाणी,
काल, अपघाती फुटली.
छिन्नविछिन्न सहा–सात तुकडे,
अन् इतस्ततः अस्ताव्यस्त ढलपी,
काही इकडे, काही तिकडे.
जमविले लेकाने तुटलेले,
पुन्हा सांधण्यासाठी.
मी मात्र,
स्वीकारूनी ते अभद्र,
म्हटले त्यास,
रामराम मनोमनी.
हट्टाने उचलल्या,
लेकीने आता,
पुन्हा त्या काचास्थी.
आठवण करून देई मला ती,
वाबी–साबी
अन् किंतसुगी.
मुलांच्या इतक्या निश्चयापुढे ,
आईने कैसे जावे पुढे.
पुढल्या दिवशी,
स्वीकार अन् प्रेमाचा,
मुलामा घेऊनी हाती,
सांधल्या पुन्हा त्या सांधी,
केली पुन्हा ती उभी,
तीन फुटांची फुलदाणी.
सांधता सांधता तिजला
राहिले मीही उभी,
स्मरूनी मनोमनी,
वाबी–साबी अन् किंतसुगी.
समोर, सांधलेली,
उभी ठाकलेली,
सांगती सोनेरी सौंदर्यसत्त्व,
शोध, बांध, सांधण्याचे तत्त्व.
अस्तित्वाचा खेळ सारा,
नियतीचाही मेळ न्यारा,
अपूर्णत्व,
पूर्णत्त्वाचा किनारा !
-तृप्ती
२४ डिसेंबर, २०२५
जिनिवा, स्वित्झर्लंड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा