Friday, October 11, 2013

प्रतिसादाची साखळी


स्थळ:- होंग-छ्याव रोडवरील एक बस-थांबा, शांग-हाय. 
वेळ:- दुपारी साधारण १२.३०
पात्रे:- आजी, आजोबा, २ छोटी  नातवंडे आणि मी . 
पार्श्वभूमी:- दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर विशेष वर्दळ नाही .
घटना :- 

थांब्याच्या डावीकडून एक बऱ्यापैकी वृद्ध जोडपे बस थांब्याच्या दिशेनं येतं.  
आजोबांच्या हातात  सामानाची थोरली पिशवी. 
आजीचा हात  धरून  २ नातवंड
मुलगी साधारण ५ वर्षांची, मुलगा साधारण ३ वर्षांचा.  
इतक्या लवाजम्या सकट पोहचे -पोहचे पर्यंत नजरेसमोरून त्यांची बस जाते
हात दाखवून  सुद्धा न थांबता !

आजोबा सामानाची पिशवी रस्त्यावर टेकवतात. 
पुढच्या बसची वाट पाहत रस्त्यावरच  उभे राहतात. 
आजी मात्र बस थांब्याच्या सावलीतील खुर्चीवर टेकतात. उसासा सोडून ! 

आजी-आजोबा दोघेही  "जरा श्वास"  घेत असतात .   

ती गोजिरवाणी नातवंड  आजीच्या आसपास तिथेच खेळू लागतात. 
बघतच बसावं असं त्याचं एकमेकांबरोबर  खेळण. 
कोणत्याही खेळण्याशिवाय ! 
निरागस, लोभस !

थोडा वेळ  ते तसंच खेळत राहतात. 


(काही मिनिटा नंतर )


खेळता खेळता अचानक  नात रस्त्यावरच धावते.  
बस थांब्याची सावली सोडून
उत्सुकतेने सामानाच्या पिशवी मध्ये डोकावते  ! 

आजी लगेच  मागून धावत जाते.  
नातीच्या पाठीवर एक जोरात फटका  बसतो. 

नातीच्या डोळ्यातील  उत्सुकतेची जागा अश्रू घेतात. 

खेळ मोडूनच जातो ;
आणि त्याबरोबर अजून  काय काय...

नातीला काही कळतंच नाही, 
असं का? काय चुकलं? 
...........................
मलाही नाही कळलं, 
कुणाचं चुकलं ???

खर तर कोणाचंच  नाही....

की कोणाचं तरी ?

" भलत्याच " कुणाचं ????
.........................................................................................
असंच एकदा शांग- हाय बस थांब्यावर बसची वाट पाहत होते. तेव्हा हे सगळं नजरेसमोर घडलं. ती छोटी मुलगी आणि तिचा भाऊ याचं खेळणं कधी थांबूच नये असं वाटत होत. पण अचानक रसभंग झाला. आणि खूप सारी अस्वस्थता, प्रश्न घेऊन घरी परतले. 

खर तर ह्या घटनेचं चीनच काय, भारत किंवा कोणत्याही विकसनशील देशात नाविन्य नाही. भारत, चीन  इ.  देशांतील  जे काही समान धागे आहेत त्यापैकी एक म्हणजे इथं जे अस्वस्थ करून गेलं  ते ! त्याची पाळमुळ  आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय  इ. इ. कुठे कुठे आहेत. त्याचबरोबर एक असाही विचार आला की, आपण जो समोरच्या माणसाला प्रतिसाद देतो, react होतो (सकारात्मक, नकारात्मक) ते कित्येक गोष्टींचा परिपाक, परिणाम  असतं. मग हे react  होणं, ही प्रतिसादाची साखळी कुठल्या तरी तशाच  भावनेतून कुठून तरी सुरु झाली असेल का?

ह्या अशा सगळ्या परस्परसंबंधित, परस्परावलंबी  सहज  न दिसणाऱ्या साखळ्या आहेत  का ?

गुंताच आहे सगळा........

आनंददायी,  सकारात्मक, जाणीवपूर्वक जगणं असेल तर सुंदर वीण नाहीतर, नुसताच  गुंता वाढत जाणारा !

वाईट अशासाठी वाटतं की, बऱ्याचदा असे कोरी पाटी असलेले लहानगे, विशेषतः मुली, त्याची शिकार होतात. त्यांच्या पाटीवर न पुसले जाणारे ओरखडे उमटतात.

No comments:

Winter special Bajra Ladoos

Ingredients:- 3 cups bajra flour, 1.5 cup grated jaggery, approx. 1 cup ghee, 1 tbsp cardamon powder, 2 tbsp dry ginger (soonth...