Saturday, April 5, 2014

काली जादू

घरातील विद्युत उपकरणे aka electronic gadgets अपघाती बंद पडणं, खराब होणं हे घरातील 'माणूस' आजारी पडण्यापेक्षा काहीच वेगळं नसतं, असं आता माझं मत व्हायला लागलं आहे. सुस्थितीत चालणार घर एकदम डळमळू लागतं, घराची घडी बिघडू लागते. घराला घरघर लागु लागते. घर चुरगळू लागते.

घरातील हे 'विद्युत सदस्य" अगदी सकाळी उठ्ल्यापासून झोपेपर्यंत बापडे आपल्या दिमतीला हजर असतात. geyser, washing machine, microwave, mixer grinder, refrigerator, electric fan, tube-light, t.v. , iron box, computer, ipad, camera … बाप रे ! यादी संपतच नाहीए . आता इथे लिहिताना कळतंय की आपण कुणाकुणाला घराचा भाग बनवून ठेवलंय. तर अशी ही सगळी "विद्युत सदस्य" मंडळी, एकाच दिवशी, अगदी उत्तम स्थितीत, गुण्यागोविंदाने नांदत आहेत असा सुदिन फार क्वचित येतो.

आताचच उदाहरण घ्या ! माझ्या computer चा anti -virus आज expire होतोय याची आठवण करून देणारी ती दुष्ट सूचना सारखी उबळ आल्यासारखी वारंवार computer screen वर येते आहे. कामं करून घेण्यासाठी डोक्यावर बसणाऱ्या एखाद्या खडूस बॉस किंवा एखाद्या खाष्ट सासुसारखं. 

कालच काय तर, R O water purifier चं servicing करून घेतलंय . कॅमेराच्या lence वर चिरंजीवांच्या कृपेने आलेले ओरखडे साफ करून घेणे, ह्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी कधी होईल हा घोर डोक्यातील कोपऱ्यात जागा व्यापून बसलाय. तो वेगळाच. कॅमेराच हे किरकोळ दुखणं कधी बरं होईल आणि कधी तो कोपरा रिकामा होईल देव जाणे ! 

चालूच असतंय एकापाठोपाठ कुणाचं अपघाती बंद पडणं, कुणाचं किरकोळ दुखणं, कुणाचं vaccination aka servicing due असणं !

असचं काल अचानक आमच्या घरातील इस्त्र्या ( इस्त्री नंबर १ + इस्त्री नंबर २) आजारी असल्याची जाणीव झाली. इस्त्री नंबर १ भारतात खरेदी केलेली. 

बीजिंगला जाताना तिलाही बरोबर नेलं होतं. दैवदुर्विलासाने, तिथे गेल्यावर १-२ महिन्यातच ती अपघाती आजारी पडली. कामवाल्या मावशीनी माझ्या ओढणीला मोठ्ठ भकदाड नामक नक्षी काढून इस्त्रीला काळिमा लावलाच होता. कामवाल्या बाईंच आणि तिच सूत काही जमल नाही म्हणा किंवा इस्त्रीला बीजिंगची हवा मानवली नाही म्हणा ! बाकी चीनसारख्या देशात जाऊन इस्त्रीचा दवाखाना, डॉक्टर शोधण्याइतकं भाषा सामर्थ्य नव्हतं तेव्हा आमच्यात. आणि पुन्हा चीन आणि टाकाऊ माल उत्पादन यांच्या घट्ट नात्याबद्धल इतक्या कथा ऐकल्या- वाचल्या मुळे आमची भारतीय, खात्रीदायक Philips ची इस्त्री तिकडे कुणाच्या ताब्यात द्यायला नकोच वाटलं.

मग काय ! इस्त्री नंबर २ घरात आणली. तिचं, मावशीचं आणि आमचं सुत जमलं. आम्ही अधून मधून तिच्या चेहऱ्याला काळा रंग देत होतो. ते ती बिचारी दुष्ट लागू नयेत म्हणून लावलेला तीट समजत असावी. बाकी पाहता चीनमधील पाचएक वर्ष ती विना तक्रार आमच्या सेवेस तत्पर असायची. अजूनही आहे. काळ्या रंगासह. 

पण आता झालयं काय की, चीनमधले इलेक्ट्रिक socket इथे चालत नाही. त्याला adapter लागते. पुन्हा ती वजनाला जरा भारी पण आहे आणि तिच्या चेहऱ्याला काळं फासल्याचा राग उफाळून येउन ती तो राग कपद्यांवर काढायची भीती असतेच. म्हणून सध्या ती किरकोळ आजारी ह्या यादीत आहे.

इस्त्री नंबर १ तेव्हा जी कोमात गेली होती ती ५-६ वर्षांनी भारतात परत आल्यावरच कोमातून बाहेर आली. भारतातलीच हवा तिला मानवत असावी. कारण, दिल्लीतल्या एका इस्त्रीच्या डॉक्टरने अगदी शंभरेक रुपयात तिच्यावर इलाज केला आणि ती "जिवंत" झाली. केवढं बरं वाटलं होतं मला तेव्हा ! तिच्यावर काळिमा असला तरीसुद्धा !

२-३ दिवसांपूर्वी, सकाळी ऑफिसला निघण्यापूर्वी नवऱ्याला साक्षात्कार झाला की, आपल्या घरात एक 'धड' इस्त्री नाही ! झालं ! इस्त्रीच्या डॉक्टरला फोन झाला. ते बहुधा बरेच व्यस्त असावेत कारण १ दिवस वाट पाहूनही त्याच्याकडून प्रतिसाद शुन्य. जरा वैतागले आणि म्हटलं, जरा आपणच प्रयोग करूयात. काय फक्त त्वचा काळवंडली आहे एवढचं ना !

प्रयोग सुरु.. घाबरत घाबरत सगळ्यात आधी नेलपेंट remover नामी मलम इस्रीच्या चेहऱ्याला लावले. पण डाग जाईना. 

म्हटलं चला, गुगल बाबाला विचारुयात त्याच्याकडे काही दवा आहे का माझ्या आजारी इस्त्रीसाठी ! आता मीच डॉक्टर होते. गुगल बाबाने लगेच prescription रूपी दवा सुचवल्या. काही प्रात्यक्षिकं you tube ह्या त्याच्या सहकाऱ्याने दाखवली. 

मी पण आता इरेला पेटलेच होते. सुचवल्याप्रमाणे उपाय सुरु केले. कुणी पाश्चात्य बाई सांगतात म्हणून व्हिनेगर लावले. काही फरक दिसेना. नंतर कुणी बुवा म्हणाले, "बेकिंग पावडर आणि पाण्याची पेस्ट करून लावा, लागलीच गुण येतो. मग, "बरंय बुवा" म्हणत ती पेस्ट बनवली. ती पेस्ट बनत असताना फसफस आवाज करू लागली. बुडबुडे दिसू लागले. मला तर मी एखादी वैद्य, मांत्रिक असल्यासारखं वाटलं. ती फसफसलेली पेस्ट लावली इस्त्रीला. एका फडक्याने रगडली ती काळ्या डागांवर. परिणाम काही लगेच तरी दिसेना. म्हटलं थांबाव थोडं. कदाचित पेस्ट सुकल्यावर काळं निघून जाईल. पण कशाचं काय! काळं कसलं त्याला 'कळा'च म्हणावं वाटू लागलं.

किचनमधून एकेक रसायन बाहेर निघत होती आणि त्या इस्त्री नंबर १ ला जाऊन भिडत होती. अगदी मीठ वापरून दुष्ट सुद्धा काढली तिची. एकूण परिणाम शुन्य. विकार गंभीर, जुना, चिवट आहे तरं ! 

सगळे विदेशी बाई -बुवा करून झाले. अखेर गुगल जाळावर you tube ने एक प्रात्यक्षिक दाखवणारा, इस्त्रीचा डॉक्टर सुचविला. भारतीय होता तो. काय बोलत होता ते काही ऐकू येत नव्हतं ! मग त्याचा गुण ज्यांना आला त्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या आणि तो तथाकथित मूक डॉक्टर काय सांगतोय ते पाहण्याचा प्रयत्न केला. हा डॉक्टर कसला ?, मांत्रिक, काळी जादू करणारा वाटला कुणी ! कारण त्याच्या इस्त्रीच्या चेहऱ्यातून काळा धूर येताना दिसत होतं आणि तो पठ्ठा इस्त्री गरम करून हे अघोरी उपाय दाखवत होता. 

घरगुती उपायांनी अपयश आल्याने मीसुद्धा त्रस्थ होते. मग तो अघोरी उपाय करायचं ठरवलं. त्या काळ्या जादुगाराने सांगितलेले सगळं साहित्य जमा केलं. घरात काळा धूर होऊ शकतो म्हणून खिडक्या उघड्या ठेवल्या. त्याने सुचवले होते की, दुष्ट लागलेली निघून जाते. खूप जळकट वास घरभर येतो. तेव्हा शक्यतो इस्त्रीला खिडकीपाशी न्यावे जेणेकरून वास वाऱ्यावर निघून जाईल. त्याने सांगितलेल्या सगळ्या सूचना पाळल्या आणि इस्त्री थोडी गरम केली. एका हातात गरम होत असलेली इस्त्री, दुसऱ्या हातात चिमटा , चिमट्यात कावळ्याच पाप ( Crocin tablet ) , असा एकूण देखावा होता. कावळ्याच पाप घेऊन त्या काळ्यावर फिरवलं. आणि काय ! ते काळं फसफसू लागलं, धूर येऊ लागला, लागलेली दुष्ट उतरत होती म्हणून कि काय, जळकट वासही येऊ लागला. फसफसून आलेलं काळं पुसून काढलं. राहिलेल्या काळ्यावर राहिलेलं कावळ्याच पाप फिरवून संपवलं. " लोहा लोहे को काटता है, जहर जहर को मारता है " अशा भयंकर उपमा वापरलेल्या म्हणीची आठवण झाली. माझ्या इस्त्रीला लागलेली इडापिडा निघून गेली. मनातल्या मनात त्या भारतीय बुद्धीला धन्यवाद दिले. 

माझ्या पुनरुजीवन मिळालेल्या, जुनाट त्वचारोगातून सुटका झालेल्या इस्री नंबर १ कडे मी कौतुकाने पाहतच राहिले. काय दिसत होती ! बेदाग ! धो डाला !

अजूनही जेव्हा जेव्हा तिच्यावर नजर पडते आहे तेव्हा मला कौतुकच वाटते आहे. इस्त्रीचं , गुगल बाबाचं, भारतीय बुद्धिमत्तेचं आणि स्वतःच ;-) !