कर्दळ नजरेस पडली.
कर्दळ पाहिली की आजही मन क्षणार्धात पंचवीसेक वर्ष मागे जातं. गावाकडे. गावातल्या घरात. परसात. कर्दळीकडे !
दिवाळीच्या सुट्ट्या असल्या की गावी जायचो आम्ही. सकाळच्या नाश्त्याला बच्चेमंडळी जमली की स्वयंपाकघरातून फर्मान कानी पडायचं. " जा ! कर्दळीची पानं घेऊन या !". मग आम्ही परसात जाऊन कर्दळीची पानं आणत असू. ती धुवायची अन मग आमची पंगत बसायची. अजून त्यावर ठेवलेली तिळकूट-पुरी आठवते.
का बरं आजकाल अशा छोटया-छोट्या गोष्टी trigger च काम करत आहेत ? मन भूतकाळात घेऊन जात आहेत ? चाळीशीच्या उंबरठ्यावर म्हणून ? की त्या सगळ्यापासून भौतिक दृष्ट्या दूर आहे म्हणून? की settled होतेय म्हणून ?
सुटलंय ते सगळं आता. निसटलंय. इतिहासजमा. फक्त आठवणींच्या पटलावर त्यांचं अस्तित्व! ते आठवणींचे बंध! त्यांना जपायचा, गोंजारायचा प्रयत्न करते मी. तात्पुरती रमते मी त्यात.
असं म्हणतेय खरं. पण खरं सांगू, असाही अनुभव आलाय आता की, हे असं लिहून काढलं की मी मुक्त होते. एकेक बंधातून.
विचारांना, भावनांना शब्दात गुंफून. तुमच्या सोबत वाटून, तुमच्याही झोळीत घालून. एकदा ते वाटून टाकले की No more triggers !!! फक्त त्रयस्थपणे पाहणे आणि हसणे. मोकळे झालो म्हणून. अजून पुढे चालायला.
अजून बंधांच्या शोधार्थ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा