Tuesday, November 13, 2018

निर्मिती

निर्मिती,
आविष्कार
विस्तवाच्या वेदनेचा

निर्मिती,
उच्छवास
अंतरातील आर्ततेचा

निर्मिती,
मेळ
मनाशी माध्यमाचा

निर्मिती,
ध्यानावस्था
प्रवास भेदापासून अभेदाचा

निर्मिती
प्रयोग
निर्भीड निरागसतेचा

निर्मिती,
सोहळा
रंध्र रंध्र रोमांचकारी

निर्मिती,
अभिव्यक्ती
काळ्याशार कल्लोळाची

निर्मिती,
बीजं
घणाघाती घावांची

निर्मिती,
प्रक्रिया
आतुन खोल- खोल झिरपण्याची

निर्मिती,
साक्ष
जनांच्या जिवंतपणाची

निर्मिती,
एकरूपता
कला-कलाकाराची

निर्मिती,
जुगलबंदी
साद-प्रतिसादाची

निर्मिती,
आशा
निराधाराला आधाराची

निर्मिती,
परतफेड
शेवटच्या श्वासापर्यंत
पहिल्या श्वासाची

- तृप्ती,
सिंगापुर