प्रतिसादाची साखळी

स्थळ:- होंग-छ्याव रोडवरील एक बस-थांबा, शांग-हाय. वेळ:- दुपारी साधारण १२.३० पात्रे:- आजी, आजोबा, २ छोटी नातवंडे आणि मी . पार्श्वभूमी:- दुपा...

Saturday, April 13, 2013

चैत्र


आज चैत्र शुद्ध द्वितीया.

आतापर्यंत कधीच भारतीय, मराठी महिन्यांकडे इतके लक्ष देण्याची गरज फारशी पडलीच नाही . इंग्रजी महिन्याशीच जास्त संबंध. शाळा, कॉलेज सुरु होणं, परीक्षा, सुट्ट्या पासून ते कुणाकुणाचे वाढदिवस इ. सगळं इंग्रजी महिन्यांवरच अवलंबून. अपवाद फक्त सण. असो.…. 

तर हे अगदी  चैत्र शुद्ध द्वितीया वैगेरे लिहिण्याचं कारण म्हणजे काल आणि आज जे मयूर दर्शन झालय त्यानी थक्क झालेय. याला योगायोग म्हणाव का निसर्गनियम ?

चैत्र महिना - वसंत ऋतू - पालवी - निर्मिती, सृजनाचा काळ - सृष्टीतील चैतन्य - मनाची प्रसन्नता - आनंदी वृत्ती ह्या सगळ्या साखळ्या ठाऊक आहेत. पण हा मोरही असा काही "सुटलाय" की माझी बोलती बंद. विचारचक्र सुरु .व्यक्तिगत अनुभवानुसार, ह्या ठराविक महिन्यात मी "वेगळीच" असते. माझा ताबा कुणीतरी घेतल्यासारख वाटतं. आनंदाचा झरा आतूनच पाझरू लागतो. निसर्गात निर्मितीचे डोहाळे सुरु असतात.  आता खात्री पटली आहे की निसर्ग बदलाशी याचा प्रत्यक्ष संबंध आहे. 

बाई निसर्गाशी फार बांधली गेली आहे. नाळ जोडल्यासारखी. त्यातूनच निर्माण झाल्यासारखी. कित्ती साम्य आहे स्त्रीत आणि निसर्गात ! 

दोन्ही निर्मितीक्षम, अत्यंत संवेदनशील,  अखंड बदल झेलणाऱ्या, परिवर्तनशील. बायकांच्या शरीरात हार्मोन्सचा जो काही खेळ सुरु असतो. त्याचा निसर्गातील निर्मितीक्षमता, बदलाशी सारखेपणा वाटतो. 

सध्या या निसर्ग निरीक्षणाच्या वेडाने चांगलेच  झपाटून टाकलंय. आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम असावा हा. 

आपली संस्कृती, सण-वार हे सुद्धा ह्या निसर्गचक्राशी बांधलेले. सणवार म्हटले की स्त्रिया त्याचा अविभाज्य भाग. सणांच्या निमित्ताने, त्या प्रथा-परंपरा पाळण्याच्या निमित्ताने निसर्गाच्या जवळ जाणं, निसर्गातील बदलांमुळे, आपल्या आतूनच जी एक नैसर्गिक साद येत असते, तिला न्याय देणं, तिचा निचरा करणं हे या सणवारातून होत होतं असं वाटतंय. 

या निसर्गाशी असणाऱ्या नाळेपासून आम्ही दूर झालोय. तोडले गेलोय. औध्योगीकीकरणाने. शेतीशी घटस्फोट घेतल्याने . 

आपली संस्कृती, जीवनशैली हे सगळं कित्ती विचार करून आखलेलं होतं. आपण का असे दुसऱ्यांच्या, पाश्चात्यांच्या चष्म्यातून स्वतःकडे, जगाकडे बघतोय ? 

बारमाही वाहणाऱ्या नद्या ज्याचं पाणी आपल्या आजोबा - पणजोबांनी प्यायलय. शेती, जी आपल्या आजोबा - पणजोबांनी केली आहे. छोटी गावं, जे आपलं मूळ गाव म्हणून आपण सांगतो. पण तिकडे जायची कितीही इच्छा असली तरी नाही जमत आपल्याला. 

सगळं हरवलंय. शांत-आरोग्यपूर्ण जगणं. आपल्याबरोबर.  आपल्या जगण्याच्या चक्रव्युहात. तुट्लोय आपण निसर्गापासून, स्वतःपासून. आटलेत का  आपल्यातील नैसर्गिक आनंदाचे, सारासार विचारांचे झरे ? अडकलोय एका चक्रव्युहात. 

 यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
  
त्याच्या येण्याची वाट बघत. 

 

No comments: