आत्ताच नेटफ्लिक्स वर , “आर यू देअर गॉड ? इट्स मी, मार्गारेट” नावाचा एक अमेरिकन सिनेमा पाहिला. सिनेमा आटोपशीर, साधारण दीड तासाचा आहे. त्याच्या विषयामुळे कुतूहल जागं झालं. तो विषय म्हणजे ११ वर्षांची एक मुलगी आणि तिची एकूणच तिच्या सद्य आयुष्याविषयीची संभ्रमावस्था. आणि दुसरे महत्वाचं म्हणजे त्याखाली, नेटफ्लिक्सची लाल मथळ्याची “लिविंग सुन” ही नोटीस ! 😀 त्यामुळे भागंच होतं “आर यू देअर गॉड ? इट्स मी, मार्गारेट” पाहणं!
सिनेमा छानच आहे . साधारण त्या वयाच्या मुली असणाऱ्या पालकांनी आवर्जुन पाहण्यासारखा. ज्युडी ब्लूम यांच्या १९७० मधील याच नावाने प्रकाशित कादंबरीवर आधारित आहे . ह्या कादंबरीला अमेरिकेत राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळालेला आहे. आश्चर्य म्हणजे पुरस्कार मिळालेला असला तरी कादंबरीवर आक्षेपही घेतले गेले होते. स्वतःचा धर्म ठरवण्याचं मुलीला दिलेलं स्वातंत्र्य आणि मासिक पाळी या विषयांवर मुक्त चर्चा या दोन मुद्द्यांमुळं !
सिनेमात व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य असणारी अमेरिकन संस्कृती जागोजागी दिसते. कदाचित कथानक रंजित करायचा भाग सुद्धा असू शकतो तो ! पण सांस्कृतिकदृष्टया पारंपारिक भारतीय मनाला काही-काही ठिकाणी, आजही ते सगळं न पटणारं, न मानवणारं वाटलं. असं असलं तरी त्या वयाच्या मुलीच्या मानसिक अवस्थेत डोकावण्यात लेखिका यशस्वी झालेय हे नक्की !
सिनेमा घडतोय १९७० मध्येच. मध्यवर्ती भूमिकेत आहे अर्थातच कथानायिका मार्गारेट ! ही एक गोड, बहुतांशी घराघरांत ऊर्जेचा स्रोत म्हणून वावरणाऱ्या मुलींसारखीच, एक उत्साही, आनंदी मुलगी.
सिनेमा जिथे सुरू होतो, त्या प्रसंगात मार्गारेट एका उन्हाळी शिबिराला गेलेली आहे . मैत्रिणी, शिबिराच्या ठिकाणची धमाल, जणू “दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे”. या विश्वात असते. मजेत असते.
सहल संपून मुलगी घरी परतते. घरभर पसरलेली खोकी पाहून आश्चर्यचकित होते. हे सगळं काय आहे असा प्रश्न विचारते. “आपण बोलू नंतर, तू आधी शिबिराबद्धल सांग”. असं आई-बाबा म्हणतात.
तिची आजी सुद्धा तिथेच आजूबाजूला असते. तिला मात्र काही राहवत नाही आणि ती मार्गारेटचा शिबिर वृत्तांत ऐकून न घेताच बातमीचा बॉम्ब फोडते ! तो म्हणजे तिच्या बाबांना प्रमोशन मिळाल्यामुळे, आता जिथे ते रहात आहेत ते न्यूयॉर्क सोडून न्यूजर्सीला जावे लागणार आहे!
असं अचानक शाळा, सगळ्या मैत्रिणी, ११ वर्ष ज्या ठिकाणी राहिली ते ठिकाण सोडून जाणं तिच्यासाठी अर्थातच आश्चर्यकारक आणि स्वीकारायला अवघड होतं.
तिची आई हुशार, संवेदनशील. ती न्यूयॉर्कमधल्या शाळेत चित्रकला शिक्षिका म्हणून काम करत असते. ती तिला समजावते. ह्या शिफ्टिंग चे फायदे, दुसरी बाजू तिला सांगते. जसं सुंदर घर, तिच्या आईचं जॉब सोडून पूर्ण वेळ घरी राहण्याचा प्लॅन, म्हणजे मग दोघी एकमेकींना जास्त वेळ देऊ शकणार, इतर मुलींच्या आयांप्रमाणे तिची आई सुद्धा शाळेत पालक- शिक्षक संघटनेचा भाग होणार, शाळेत येऊन मदत करणार इत्यादी ऐकून मार्गारेट तो अपरिहार्य निर्णय स्वीकारते. आणि ते त्रिकोणी कुटुंब न्यूजर्सीला स्थलांतरित होतं.
आता इकडे न्यूयॉर्कमध्ये तिची आजी, बाबांची आई, एकटीच पडणार असते. आजी आणि नात जणू मैत्रिणीच होत्या. एकमेकींशिवाय त्यांना चुकल्याचुकल्यासारखे होतं हे सिनेमाभर अनेक प्रसंगातून दिसत राहतं.
इथे नवीन शहरातआल्यानंतर लगेचच तिची नवीन शेजारीण आणि तिच्याच वयाची मुलगी, स्वतःहून तिच्या घरी येऊन मैत्रीचा हात पुढे करते. स्वाभाविकपणे खुश होऊन मार्गारेटची आई मार्गारेटला तिच्याकडे जाण्याची परवानगी देते.
पण ही मुलगी जरा आगाऊ सदरात मोडणारी आहे. तिला तिच्या सद्य वयापेक्षा जास्त वयाच्या मुलींच्या आयुष्याचं आकर्षण आहे. थोडक्यात, उगाचच आहे त्या वयात न राहता पुढे जायची घाई, उत्सुकता आहे. ती या सरळस्वभावी मार्गारेटला तिच्या अमलाखाली आणायचा प्रयत्न करत राहते. तिच्या अमलाखाली राहतील अशा ३/४ मुलींचा एक सिक्रेट ग्रुप तयार करते. ब्रा, मासिक पाळी, मुलांबद्दलच आकर्षण या मार्गारेटच्या मनालासुद्धा अजून न शिवलेल्या गोष्टींची ओळख करून देते. आपली गोंधळलेली, नव्या ठिकाणी आलेली, साधी सरळ कथानायिका त्या सिक्रेट ग्रुपचा भाग होऊन राहते. मासिक पाळी आणि त्यामुळे शरीर-मनात होणारे बदल, त्याची पूर्वतयारी याची (अर्धवट माहितीतून) चर्चा करणे हा यांच्या ग्रुपचा मुख्य हेतू. ६ व्या इयत्तेत असणाऱ्या या सगळ्या मुली. यांच्या वर्गातील एकीला चौथीत असतानाच मासिक पाळी सुरू होते. ती इतर मुलींपेक्षा खूपच मोठी दिसत असते. त्यातून मग स्तन या विषयाचं अनाठायी आकर्षण. हे सगळं १९७० च्या अमेरिकेत घडतयं हे लक्षात घेण्यासारखं.
मार्गारेटला चिंता की अजून तिला यातील काहीच लक्षण का दिसत नाहीत. ती तिच्या आईला या बद्दल विचारते. ९ ते १६ वर्षापर्यंत ही मासिक पाळी, पिरियड्स केव्हाही येऊ शकतात. प्रत्येक मुलीचं शरीर वेगळं असतं. हे आई तिला समजावते. पण तरी तिची संभ्रमावस्था संपत नाही. तिची ही गोंधळलेली मनोवस्था एबी फोर्ट्सन या युवा अभिनेत्रीने अत्यंत उत्तम वठवली आहे.
इकडे आईसुद्धा पूर्वी ठरवल्याप्रमाणे शाळेतील इतर आयांसारखी पालक शिक्षक संघटनात भाग घेते. तिची राहिलेली ती एक हौस पण पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असते.
मार्गारेटच शाळा, अभ्यास हे सुद्धा सुरूच आहे. शाळेत तिला एक प्रकल्प, रिसर्च प्रोजेक्ट मिळते. ती धर्म या विषयाशी संबंधित असल्याने तिला स्वतःच्या धार्मिक आइडेंटिटी बद्दल प्रश्न पडतो. आपण आपल्या आईच्या आईवडिलांना अजून कधीच पाहिलं नाही असंही ती शिक्षकांना सांगते.
घरी जाऊन आईला त्याबद्दल विचारते. आई गोष्टींचा उलगडा करते. आपल्या कथनायिकेच्या आई वडिलांनी आंतरधर्मीय विवाह केलेला असतो. त्यामुळे मार्गारेटची आई ख्रिश्चन तर वडील ज्यू धर्मीय! त्यांनी असा विवाह केल्यापासून मार्गरेटच्या आई च्या पालकांनी तिच्याशी संबंध ठेवलेला नसतो. त्यांनी कधीच आपल्या नातीला सुद्धा पाहीलेलं नसतं. हे मात्र आपल्या टिपिकल हिंदी सिनेमाची आठवण करून देणार वाटलं! “तुम हमारे लिये मर गयी हो”. असं म्हणणारे आपल्या सिनेमातील नटीचे आई वडील आठवले.
मार्गारेटचे पालक दोघेही सुशिक्षित आणि उदारमतवादी. त्यामुळे मुलीवर ते कोणताच धर्म लादत नाहीत. सिनेमात जेव्हा जेव्हा ती गोंधळात पडते तेव्हा मात्र ती “ अरे देवा, तू कुठे आहेस?” असा प्रश्न विचारत राहते.
मुलीने आपल्या पालकांबद्दल प्रश्न विचारल्यावर मार्गारेटची आई तिच्या स्वतःच्या आई वडिलांना नवीन वर्षाचं एक ओळीचे ग्रीटिंग कार्ड पाठवते. ते चक्क त्याला उत्तर देतात. आणि तिला भेटायला येतो असंही कळवतात.
आता नेमकं हे आजी आजोबा येणार, त्याच दिवशी दुसऱ्या आजीचं ( वडिलांच्या आईचं) आणि नातीचं भेटायचं ठरलेलं असतं. पण हे ख्रिश्चन आजी आजोबा आपल्या नातीला प्रथमच भेटणार म्हणून आई त्या ज्यू आजीसोबतच्या भेटीचा बेत रद्द करते.
हे त्या ज्यू आजीला सहन होत नाही. मग ती सुद्धा अचानक त्यांच्या घरी न सांगता हजर होते. तेव्हा घडणारे नाट्य, विनोद पाहण्यासारखे. मानवी स्वभाव आणि हक्क भावना, वयाने मोठ्या असलेल्या लोकांचा बालिशपणा यावर बोलणारे ! हे घरात घडणारं नाट्य सहन न होऊन मार्गारेट तिथून वैतागून आपल्या खोलीत निघून जाते.
हे सगळे वरकरणी शांत झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशीसुद्धा आई- मुलगी दोघी दमलेल्या आहेत. हे सगळे वर्षभरातले बदल, घडलेल्या घटना यांनी त्या दोघी दमल्यात. त्या एकमेकींशी बोलतात. गोष्टी उलगडतात. गुंते सुटायला मदत होते.
आईसुद्धा इतर आयांसारखे वागायचा, त्या चौकटीत बसायचा प्रयत्न करत होती. पण तो आपला पिंड नाही हे अनुभवातून तिला उलगडतं. ती आई पुन्हा तिच्या आवडीचचं चित्रकला शिक्षिकेचं काम करायला लागते.
मार्गारेटसुद्धा तिच्या पिंडाला सोसवेल तसेच ग्रुपिझम इत्यादींच्या भानगडीत न पडता सगळ्यांशी मैत्रीपूर्ण वागायला सुरुवात करते. त्या आगाऊ मुलीच्या अमलातून बाहेर पडायचं धाडस करते. एका अर्थी मायलेकी“स्वधर्म” ओळखतात आणि तो स्वीकारतात. एका अर्थी परिपक्व, मोठं होणं नाही का ?
सिनेमा शेवटाला येतो, तेव्हा मुलगी शारीरिकदृष्ट्या सुद्धा मोठी होते. बदलाचा, मोठे होण्याचा तो आंबट गोड प्रवास, त्यातल्या वेदना, सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मजा येते. वेगळा विषय, वेगळी संस्कृती तरीही मानवी मनाच्या समान धाग्यांची वीण, एक माणूस म्हणून आपण सगळे सारखेच हे दाखवून देते.
स्थलांतर, त्यातून येणारी आव्हाने, होणारे बदल, त्या प्रक्रियेमुळे एक व्यक्ती म्हणून होणारी वाढ. हा स्थलांतराचा समान धागा नुकत्याच वाचलेल्या पुस्तकात आणि ह्या सिनेमातही सापडला. योगायोगच !