Translate

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

भाकरी आणि मेथीची भाजी


इथे आल्यापासून  प्रथमच बिग बझार या मॉल मध्ये गेलो होतो. भारतात आहोत यावर विश्वासच बसत व्हता इतका झगझगाट, चकचकीतपणा सगळीकडे होता.  पण त्याचबरोबर आश्चर्याचा सुखद धक्काहि बसला कारण तिथे चक्क पिठाची गिरणी होती. धान्य तिथून विकत घ्यायचे  आणि ताजे पीठ घरी न्यायचे. सहीच! 

माझी किती दिवसांची इच्छा होती भाकरी करायची, खायची. ती आता पूर्ण होणार या विचारानेच अत्यानंद झाला. झकासपैकी  बाजरी आणि ज्वारी दळून घेतली. अगदी तिथे उभं राहून. तो पिठाच्या गिरणीचा typical गंध, तो चक्की फिरण्याचा घर-घर आवाज मग  त्याचावर ठप-ठप आवाज करत ते पीठ पिशवीत ढकलणारा तो चक्कीवाला असलं सगळं क्षणार्धात कित्ती वर्ष मागे घेऊन गेलं. मग अगदी आई जसं  चक्कीवाल्याला बजावून सांगायची की, "जरा जाडच  ठेवा पीठ  ". तसं मी पण म्हटलं "भैय्या, आटा medium ही पिसना " मस्तच वाटलं. अगदी मोठ्ठ झाल्यासारखं ! अर्हनला पण तिथं उभं राहून चक्की, दळण दाखवलं, सांगितले. जाड कागदी पिशव्यांमध्ये ही पीठ घालून घरी  आणली. मला तर माझं स्वप्न, जीव त्यात बांधून आणल्यासारखे वाटलं. 



मग काल रात्री बेत ठरवला. मेथीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा. कित्येक महिन्यानी भाकरी करणार होते. जरा धाकधूक होती. पण सगळ लक्षातही  होत याची गम्मत वाटली. पीठ भिजवले, भाकरीला लावायला एका वाटीत पाणी घेतले. ती तव्यावर उलटण्यासाठी उलथने, लाटण्यासाठी पोळपाट अशी  जय्यत तयारी झाली. आणि मस्तपैकी भाकऱ्या केल्या.  सगळ्याना छान पोळी पण निघाली. निर्मितीचा एक वेगळाच आनंद मिळाल्यासारख वाटलं. 

भाकरी ज्वारीची केली पण रंग जरा काळपात आला होता. बहुदा बाजरीवर दळले गेले असावी. पुढच्या वेळी हि काळजी घ्यायला हवी अशी मनात नोंद केली.

भाकरीचा बेत ठरल्यावर संध्याकाळीच मेथीची गड्डी निवडली होती. अगदी शिस्तीत आठवून लसून, मिरची अशा तयारीसकट. मस्त पैकी  मेथीची पातळ भाजी केली.  त्यात डाळीच पीठ असल्याने प्रथिनाचा प्रश्न मिटला होता . 

चीन मधल्या मेथीला आपल्या मेथीसारखा कडूपणा नाही जाणवला कधी. त्यामुळे,  हा एक ओळखीच्या चवीचा अजून आनंद. अत्यंत healthy असं जीव ओतून केलेले हे whole-meal तयार झाल्यावर पटकन हे फोटो काढले. आणि अगदी मन लाऊन पोटभर जेवले. जेवल्यावर आमची आजी म्हणते तसं " अन्नदाता अन्न्भूमी सुखी भव ! " अस  आपसूकच तोंडातून निघालं. 



इथे भारतात परत आल्यावर हे असले छोटे छोटे आनंद सापडायला लागलेत. जे कशातच मोजता येणार नाहीत. ज्याचे मोल जे देशाबाहेर राहतात ते नक्कीच अधिक ओळखू शकतील.  हे आनंद सतत भेटत राहोत हीच इच्छा, प्रार्थना !


   

शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

पिल्लू


( हे साधारण ६ वर्षांपूर्वी दिल्लीत असताना लिहिलेले आहे. परत दिल्लीत आल्यावर कबुतर अशीच घरात घुसू लागली आहेत. तेव्हा या लेखाची आठवण झाली म्हणून ...)

एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा. त्यावेळी घरात cooler ही नव्हता. दिल्लीत भासणारी cooler ची अत्यावश्यकता आता चांगलीच जाणवत होती. सुट्ट्यासाठी आणि दिल्ली पाहण्यासाठी म्हणून बहिण घरी आलेली होती. भयंकर उकाडा म्हणून रात्री  बाल्कनीत झोपायचे ठरले. बेड बाल्कनीत हलवला. त्यामुळे उन्हाळा सुसह्य झाला. जवळपास १० दिवस तो बेड बाल्कनीतच होता. नेहमीप्रमाणे कबुतरे येऊन जाऊन असायची. आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी ते routine होते.

१० दिवसांनतर बेड घरात घ्यायचे ठरले. तेव्हा बेडवर  पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा  छोटा TABLE TENNIS चा बॉल दिसला. क्षणार्धात उलगडा झाला, हा बॉल नसून पक्षाचे अंडे आहे. आता त्या अंड्याचे काय करायचे हा गहन प्रश्न होता. तात्पुरते ते तसच उचलून बाल्कनीत एका कोपऱ्यात ठेवले आणि आमचा बेड आत आणण्याचा कार्यक्रम सुरु झाला. बेड हलविला आणि त्याच्याखाली अर्धवट बांधलेल्या घरट्यात अजून २ अंडी दिसली.

मग सापडलेले ते अंडे घरट्यात त्या २ अंड्याबरोबर ठेवले. कबुतराची ती अंडी वाचवायची होती. मग त्यासाठी एक टीपॉय वापरायचे ठरले. एकदा दुपारी लक्षात आले की  घरट्यात दोनच अंडी आहेत. वाईट वाटले. आता उरलेली अंडी तरी वाचवायलाच हवी होती. कावळे टीपॉयच्या उघड्या बाजूतून आत जाऊ शकत होते. घरात एक मोठ्ठ पोत  होत. ते त्या टिपॉयवर घातले. अंडी पूर्णपणे सुरक्षित झाली.   किमान आता ही अंडी तरी कावले नेऊ शकणार नव्हते.

कबुतराच्या 'त्या' जोडीला पोत्याखाली येता -जाता यावे म्हणून पोते थोडे वर उचलून घेतले. त्या जोडीचे त्या अंड्यावर पूर्ण लक्ष होते. ते त्या  टीपॉयखाली कायम असत.

आता वेळ मिळेल तेव्हा त्या कबुतरांच,त्या अंड्यांच निरीक्षण करण्याचा छंदच जडला.

या सगळ्या प्रकाराला एव्हाना २५ दिवस झाले होते. त्या अंड्यातून पिल्ले बाहेर आलेली नव्हती. कधी-कधी वाटायचं खरच पिल्ले बाहेर  येतील का ?

आमच्या कामानिमित्त आम्हा दोघांनाही दिल्लीबाहेर जावं लागणार होतं. आता अंड्यांच काय होणार  ? त्यांच्याकडे लक्ष ठेवणे, निरीक्षण करणे अशक्य होते. आठवडाभर घर पूर्णपणे बंद होते. अधिक सुरक्षितता म्हणून बाल्कनी काड्या आणि प्लास्टिक मिश्रित (typical दिल्लीत मिळणाऱ्या ) पडद्यांनी बंदही करून घेतली.

आठवड्यानंतर निनाद दिल्लीत परत गेला. तेव्हा मी पुण्यात होते. निनादने फोनवरून बातमी दिली..... " कबुतराच्या अंड्यातून एक पिल्लू बाहेर आलंय". खूप आनंद झाला. दुसऱ्या अंड्याच काय झालं हे कळायला काही मार्गच नव्हता. पण किमान एक पिल्लू तरी जगले होते. निनादने तर त्याचा फोटो पण काढला.

त्यानंतर साधारण ४-५ दिवसांनी मी पण दिल्लीला परत गेले. पिल्लू पाहिले. मस्तच होते. प्रथम त्याच्या जवळ जायची भीती वाटली. खूपच छोटे होते ते. त्याचे आई-वडील, कबुतरे त्याच्या जवळपासच असत. पिल्लाचे डोळे काळे होते. पायही काळपट होते. डोक्यावरील केसांचा रंग पोत्याच्या दोऱ्याच्या रंगासारखा  होता. इतर कबुतरांप्रमाणे (किमान त्याच्या आई-वडिलांप्रमाणे) त्याचे डोळे लालसर नव्हते, ना पायही गुलाबी होते. मानेवरही चमकदार गुलाबी-हिरव्या रंगाची छटा नव्हती. पिल्लूच होत ते वाढीच्या मार्गावरच. जरासा आवाज झाला कि घाबरून बसणार !


(फोटो सौजन्य :- इंटरनेट )

नंतरच्या आठ दिवसात ते छान चालू लागलं. बाल्कनीतल्या बाल्कनीत ते फिरत असायचे. त्याची आई त्याला चोचीतून भरवायची. त्याच्या डोक्यावरच्या केसातून चोचीने काहीतरी करायची. कदाचित साफ करत असेल.

काही दिवसांनी  तो टीपॉय हलवायचे ठरवले. आता त्याची गरज नव्हती. उबेसाठी म्हणून पोत मात्र तसच ठेवल . आता पिल्लावर नजर ठेवण  सोप होत. टीपॉय काढला. सुरवातीला पिल्लू घाबरले. पण काही काळच !
आता आम्हाला एकमेकांची सवय झाल्याने दोघांचेही माझे आणि पिल्लाचे एकमेकांना घाबरणे कमी झाले.

एव्हाना पिल्लू उडायला शिकले होते. म्हणजे फरशीवरून टीपॉय च्या कप्प्यापर्यंतच. त्यानंतर ४-५ दिवसात ते 
 टीपॉयवरही बसू लागले. नंतर कपडे वाळवायच्या दोऱ्यांवर आणि त्यानंतर बाल्कनीच्या कठड्यावरही . हे सगळ पाहताना खूप मजा येत होती.   आश्चर्य मिश्रित  कौतुक वाटत होते. जोनाथन सीगल ची गोष्ट आठवायची- विशेषत पिल्लाच्या वाढीचे नवनवीन टप्पे पाहताना. 

अधूनमधून ते पिल्लू पाय लांब करून आळस सोडत असे. पंख वर करून बसत असे. रात्री तर अंगाचे मुटकूळ करून शांत झोपायचे. 

त्या पिल्लाला आता थोडे उडता येत होते. आणि तो टीपॉय काढल्यावरच ते उडण्याचा  प्रयत्न करू लागले. किमान मला तरी तसे वाटत होते. म्हणून २-३ दिवसांनी पोते आणि घरटेही उचलले. कारण पिल्लू बर्यापैकी मोठे झाले होते. त्याला त्यांची फारशी गरज नव्हती. अर्थात हेही माझ मत. खर तर त्या घाणीला आता मी कंटाळले होते. :-)

परवा आणि कालही सकाळी उठून पहिले. पिल्लू बाल्कनी आणि घरातही कुठे दिसले नाही. मग काही वेळाने ते बाल्कनीत दिसले. लागोपाठ २-३ दिवस असेच घडले. आता कळलंय की ते पिल्लू साधारण १ फुट एवढे अंतर  उडू शकते. म्हणून ते बाल्कनीतून उडते. खिडकीच्या कठड्या पर्यंत चालत जाउन पलीकडच्या मोकळ्या  स्ल्याबवर जाऊन बसते.  

एव्हाना पिल्लाची बरीच प्रगती झाली होती. म्हणजे त्याला बाल्कनी बाहेरचे जगही कळायला लागले होते. 

परवा पाउस झाल्यावर पोत्याखाली दडले होते. म्हणजे एक पाउसही अनुभवला तर ! 

मग ठरवले आता खूप झाले. त्या पिल्लाचे अजून लाड नाही करायचे. अजून किती दिवस त्याची काळजी करणार? आता त्याला "जग" कळू देत. स्वतच स्वतःच संरक्षण करू देत. पिल्लाला अंड्यातून बाहेर येऊन जेमतेम १५-२० दिवस झालेत. पण त्यापूर्वीपासून म्हणजे दीड - दोन महिन्यांपासून त्याची शक्य तेवढी काळजी घेतली आहे. 

हा सगळा विचार करून त्या पिल्लाला थोडे घाबरवले. त्यात स्वार्थ तर होताच. पण कबुतराच्या पिल्लाने आता स्वतःचे संरक्षण करावे असाही विचार होताच. 

ते आता असच परत एकदा  बाल्कनीतून उडल्यावर बाल्कनी पडद्यांनी बंद करून घेतली आहे. पण ते पिल्लू खिडकीच्या बाहेर कठड्यांवर बसून आहे. खिडकीच्या काचेतून बघतय माझ्याकडे. त्याला काय माहिती की मी त्याच्यावरच लिहिते आहे म्हणून !  

(पूर्व प्रसिद्धी :- "सकाळ", २४  जून, २००६.)

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

महाभिंतीच्या पलीकडचे-अलीकडेचे!


 (पूर्वप्रसिद्धी "अर्थपूर्ण", दिवाळी २०१२ .)
एक भारतीय, गृहिणी, आई, सामाजिक कार्यकर्ती, भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याची पत्नी अशा विविध भूमिका बजावताना दिसलेल्या चीनचे अंतरंग लेखिकेने येथे प्रकट केले आहेत. भारत आणि चीन या दोन देशांच्या भिन्न राजकीय व्यवस्था आणि परिणामी भिन्न आर्थिक धोरणे, त्यांची अंमलबजावणी करण्याची वेगळी पद्धत ह्या मुख्य धाग्याच्या अवतीभवतीची ही सगळी गुंफण विणून घेतलेला हा आर्थिक-सांस्कृतिक परामर्श आहे.

गेली पाच वर्षे मी चीनमध्ये राहिले. कॉन्सुलर स्पौझेस ऑफ शांघाई या संघटनेची मी उपाध्यक्ष होते. संघटेनच्या माध्यमातून आम्ही समाजकार्य करत होतो. सातत्याने पाच वर्षे चीनमध्ये असताना बैजिंग (बेईजिंग) आणि शांग-हाय या दोन शहरांमध्ये प्रामुख्याने व त्याव्यतिरिक्त नानजिंग, निंगबो, शीआन, लुओयांग, पुथुओशान, हांगचौ, सुचौ, लीयानयुनगांग, इत्यादी छोट्या-मोठ्या शहरांमध्ये जाता आले. 

चीनी शहरांचे प्रथम दर्शन 

कोणत्याही शहराच प्रथम दर्शन होते ते त्याच्या विमानतळावर, रेल्वे किंवा बस स्थानकावरच. ऑगस्ट २००७ मध्ये आम्ही बैजिंग मध्ये प्रथम पोहोचलो ते हौंगकौंग मार्गे, अत्याधुनिक अशा हौंगकौंग-बेईजिंग रेल्वेने. त्यामुळे बेईजिंगचे प्रथम दर्शन झाले ते रेल्वे स्थानकावर. स्थानकाच्या बाहेर पडल्यावर प्रथम जरा बावरल्यासारखे झाले. वेगळा देश, अगम्य भाषा, निराळे दिसणारे अनोळखी लोक... पण एकूण चित्र काही प्रमाणात तरी भारतीय रेल्वे स्थानकासारखेच! तशीच गर्दी, दोन चार अपंग हातात भांडी घेऊन दानाच्या याचनेत, अस्ताव्यस्त सामान पसरून बसलेले लोक, बऱ्यापैकी गजबजाट, लगेच रस्त्याच्या पलीकडे रहदारीने भरलेले रस्ते असं सगळं दिसलं. आणि जरास ओळख असल्यासारखे, हायसं वाटलं. मुंबई, दिल्लीतील रेल्वे स्थानके आणि बाहेरची गर्दी, कोलाहल, घाण इ. अगदी अंगावर आल्यासारखी वाटतात पण इथे तुलनेने सगळ बेताचं होत. 

नंतर मात्र काही महिन्यातच चित्र झपाट्याने बदलताना दिसलं. जसजस ऑलिम्पिक जवळ येऊ लागलं तसं सापाने कात टाकावी तसं बैजिंग बदलले. आणि नंतर ही “ओळखीची” दृश्य लपल्यासारखी झाली ती मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या, ग्रेट वॉलची आठवण करून देणाऱ्या, उंच, सुशोभित अशा दगडी रंगाच्या भिंतीमागे! तिथे मात्र ह्या भारतीयांना परिचित चीनच्या खुणा अजून आहेत. अगदी आपल्या चाळी, झोपडपट्ट्या वाटाव्यात अशा घरातून लोक राहताना दिसले. सगळ तसच मात्र शहराच्या सुशोभीकरणात बाधा येऊ नये म्हणून उंच, आकर्षक भिंतीमागे झाकून टाकलेल... सगळ्या जगभरातून लोक येणार म्हटल्यावर छान दिसावं म्हणून, पसारा कोंबून ठेवल्या सारखं! शहरातील भिंतीमागे लपवलेली गरिबी, दारिद्र्य आणि भिंतीपुढे अलिशान परदेशी बनावटीच्या गाड्या सुसज्ज सहा पदरी रस्त्यांवरून धावत असलेल्या दिसल्या. मला तर सुरुवातीच्या काळात चीन सुद्धा भारतासारखाच विषमता असलेला देश वाटला खरतर तसाच आहे. शहरी-ग्रामीण दरी चीनमध्ये सुद्धा दिसली. जरा मुख्य शहरापासून लांब गेलं तरी लगेचच ‘वेगळा’ चीन दिसतो. आपल्यासारखीच खेडी, त्याच्या पुढील शेती, साध्या पारंपारिक वेशातील लोकं, वगैरे. 

पाच वर्षात काही ओळखीचं, काही अनोळखी सारखं भेटतच राहिलं. मात्र चीनी सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीचा वेग अधिक दिसला. कदाचित, सरकारचे नियंत्रण, पकड असल्यामुळे असेल. अगदी एका रात्रीत होत्याचं नव्हत आणि नव्हत्याचं होत चीनमध्येच होऊ शकतं. याची साक्ष म्हणजे २००८ मधले बेईजिंग ऑलिम्पिक आणि २०१० मधले शांग-हाय वर्ल्ड एक्सस्पो आणि त्याच्या निमित्ताने दोन्ही शहरात झालेला कायापालट हे आहे. 

रस्ते, वीज, पाणी, वाहतूक व्यवस्था अशा मुलभूत पायाभूत सुविधा शहरात तरी अत्यंत सुस्थितीत आहेत. एकूणच चीनमध्ये ज्या वेगाने अतिजलद ट्रेनच (high speed train) जाळं सगळीकडे पसरल आहे ते अवाक करणार आहे. म्याग्लेव (Maglev- Magnetic Levitation) ट्रेन तासाला ३५० किमी वेगाने शहरापासून विमानतळापर्यंत धावते. बेईजिंग, शांग-हाय शिवाय चीनमधील छोट्या शहरांमधील रेल्वे स्टेशन सुद्धा एखाद्या विमानतळाप्रमाणे अत्यंत आधुनिक, स्वच्छ, सुशोभित केली आहेत....पाश्चात्य शहरांच्या तोडीस तोड. 

शांग हाय मधील संध्याकाळी तर “ लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया ” या ओळींची आठवण व्हावी अशा असतात . कृत्रिम दिव्यांचा इतका प्रकाश, झगमगाट कि त्यांच्या माऱ्यापुढे आकाशातले तारे, चांदण्या असं कधी फारसं स्पष्ट दिसलच नाही. शांग-हायला श्रीमंतांचे शहर असं म्हणतात कारण महागड्या शहरांच्या यादीत ते वरच्या क्रमांकावर आहे. या श्रीमंतांच्या शहरात तर परदेशी बनावटीच्या महागड्या गाड्याच मुख्यत्त्वे पाहायला मिळतात. ज्या चालविताना अनेक स्त्रियाही दिसतात. 

चीनी स्त्री शक्ती 

चीनी स्त्री शक्तीचे प्रथम दर्शनाचा हा एक किस्सा सांगण्याचा मोह आवरत नाहीये. बेईजिंग मध्ये असतना मूलाला घेऊन प्रथमच हॉस्पिटल मध्ये गेलो होतो. पोहचलो तर काय हॉस्पिटलच्या पोर्चमध्ये बरीच गर्दी, जोरजोरात भांडणाचे आवाज. स्वाभाविकपणे नजर गेली आणि पाहते तर काय ! एक चाळीशीची बाई एका पंचविशीच्या मूलाला बेदम मारत होती ! चीनी शक्तीच्या या प्रथम दर्शनाने मला अचंभित केलं! 

बाजारात सर्वत्र दुकानदार म्हणून, हॉटेल्स मध्ये वेटर म्हणून किंवा अगदी टोल नाक्यावर चलन फाडणे अशीही कामे स्त्रिया करताना दिसल्या. स्त्रियांचे पोशाख सुद्धा अगदी पाश्चात्त्य पद्धतीचे असतात. असं असूनही, कुणीही “टीपीकल पुरुषी” नजरेने त्यांच्याकडे बघतंय किंवा त्यांची छेडछाड करतय, असं कुठंच आढळल नाही. शांग-हाय, बेई जिंग सारख्या शहरातूनच नव्हे तर इतर ठिकाणी देखील; अगदी रात्री-अपरात्री सुद्धा स्त्रिया निर्भीडपणे वावरताना दिसतात. 

भारताच्या तुलनेने, छोट्या-मोठ्या शहरात स्त्रियांचं स्थान स्त्री-पुरुष समानतेच्या जवळ जाणारे वाटलं. चीनी स्त्रिया अधिक आत्मविश्वासू, निर्भीड, सुरक्षित वाटल्या. त्यांच्याकडेही स्त्रीयांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागतेच. पण परिस्थिती आपल्या इतकी वाईट नाही आढळली. 

यामागे चेअरमन माओ ची स्त्रियांच्या प्रगतीस अनुकूल धोरणे, प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी असलीच पाहिजे या विचाराचा पगडा, किंवा कायद्याचा वचक, भिती असेल. पण या सगळ्यातून आलेली एकूणच आचार-विचारातील शिस्त शहरात पाहायला मिळाली. 

चीनी माणूस आणि शिस्त 

माणूस जडणघडणीत सुद्धा राजकीय व्यवस्था कसा हातभार लाऊ शकते ते भारतीय आणि चीनी माणसातील फरकामुळे अगदी सहज दिसते. 

चीनी माणूस (अगदी कामवाली बाईसुद्धा) दिलेल्या वेळेपेक्षा पाच मिनिटे सुद्धा उशिरा येत नाही. शांग-हाय वुमेन्स फेडरेशन, शांग-हाय चॅरीटी फाउंडेशन या संस्थांबरोबर काम करतानाही एकूण चीनी लोकांची काम करण्याची पद्धत अत्यंत प्रोफेशनल असल्याचं पाहण्यात आलं. आम्हा भारतीयांच्या वेळ पाळण्याबद्धल, दिलेला शब्द पाळण्याबद्धल काय बोलावे? शिस्त चीनी माणसाच्या रक्तात भिनली आहे असे वाटणारे अनेक अनुभव आले. 

शांघाई मध्ये सार्वजनिक बस मध्ये कंडक्टर फक्त लांब पल्ल्याच्या गाड्यांना असतात. बाकीच्या बसमध्ये पुढच्या दराने चढायचे आणि तुमचे कार्ड त्या इलेक्ट्रोनिक मशीनला टेकवायचे कि तुमचे तिकिटाचे नाममात्र पैसे तुमच्या कार्डमधून वजा होतात. कार्ड नसेल तर कॉईन बॉक्स मध्ये पैसे टाकायचे हा साधा नियम लोक प्रामाणिकपणे करतना आढळले. कुणी लक्ष ठेवायला नाही तरी प्रत्येक जण व्यक्तिगत जबाबदारी असल्याप्रमाणे वागताना दिसले. 

बेईजिंग मध्ये असताना, मुख्य रस्त्यवर मध्यभागी किंवा अगदी पादचारी मार्गाच्या शेजारी अनेक गुलाब फुललेले दिसले. पण कोणीही ती फुले तोडताना दिसले नाही. याउलट आपल्याकडे एका शहरात असा प्रयोग केला तर दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत कुंड्याही गायब झाल्या असे चीन भेटीवर आलेल्या एका केंद्रीय नेत्याकडून कळले. 

असं सगळं चीनी लोकांच्या शिस्तीच कौतुक आठवतानाच, समूह मानसिकता आणि कायदा यांचा संबध दाखवणार हा एक किस्सा आठवतोय. भारत औषधनिर्मिती क्षेत्रात चीनपेक्षा पुढे आहे. चीनमध्ये फुफुत्साच्या कर्करोगाचे प्रणाम प्रचंड आहे. प्रदूषण, सिगारेटच व्यसन इत्यादी कारणांमुळे असेल पण त्यावरील उपचारासाठीची औषधे मात्र चीनमध्ये प्रचंड महागडी आहेत. परिणामी हेच शिस्त पळणारे लोक आपल्या भारतीयता मित्रांना भारतातून येताना ही औषधे स्वस्त मिळतात म्हणून आणायला सांगतात. आमचे भारतीय मित्र चीनी मैत्रीसाठी हे करू पाहतात. आता कुणी म्हणेल, भारत आणि चीन युद्ध आणी सीमा ताण असूनही लोक मात्र एकमेकांशी प्रेमाने कसे वागतात? तर, युद्ध, सीमा ताण या गोष्टी सामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत संबंधात शक्यतो येत नाहीत. जसं पाकिस्तान, भारत एकमेकांना शत्रू राष्ट्र मानतात. पण जेव्हा दोन्ही देशातील सामान्य लोक एकमेकांना भेटतात, बोलतात तेव्हा काही मिनिटातच हे शत्रुत्व विरघळून जाते अस दोन देशातील लोकांचा अनुभव आहे. म्हणून तर “पीपल टू पीपल कॉनटॅक्ट” हे धोरण आपल्या सरकारने स्वीकारले आहे. जितके सामान्य नागरिक एकमेकांना भेटतील तितके गैरसमज दूर व्हायला मदत होते. आणि १९६२ युद्ध हे आपण म्हणतो. चीनमध्ये हे युद्ध फक्त बुद्धिमान वर्गाला माहिती आहे. सामान्य चीनी माणसाला नाही. ते १९६२ च्या घटनेला युद्ध मानीत नाहीत!!! 

तर ही फुफुत्साच्या कर्करोगावरील औषधे विमानातून आणायला कायद्याने बंदी आहे आणि त्यासाठी कडक सजाही होऊ शकते. शांग-हाय जवळ असणाऱ्या वूशी शहरात सध्या कैदेत असलेल्या भारतीयांना अशीच कॅन्सर संबंधित औषधांचा मोठा साठा चीन मध्ये विना परवाना आणला म्हणून अटक झालेली आहे. नियम, कायद्याची भीती ‘स्वतःला’ नसली कि हेच चीनी गैरव्यवहार करतातच! इतके प्रचंड लोकसंख्या असल्यावर समूह मानसिकता लक्षात घेता कायद्याच बडगा का आवश्यक आहे हे कळते. म्हणजे माणूस म्हणून आम्ही भारतीय, चीनी सगळे सारखेच की ! आजच्या जागतिकीकरणाच्या युगातही “हिंदी चीनी भाई-भाई” हे अगदी लागू पडते. 

जागतिकीकरण आणि हिंदी चीनी भाई-भाई 

एकूण आशिया व आफ्रिकी देशांच्या मानगुटीवर गोरेपणाचे भूत स्वार आहेच. जिथे जागतिकीकरण जास्त, प्रोडक्ट्सचा बाजार जास्त तिथे हा ‘ गोरेपणाचा आजार’ जास्त ! चीनी ही त्यातलेच. त्यांना अमेरिकेचं, किंवा पांढऱ्या, गोऱ्या कातडीचे आकर्षण. मग त्याच आकर्षणापायी, गोरे करतील तस आपण करायचं ! बाजारात गोरी बनवणारी क्रीम, लोशन, मास्क मोठ्या प्रमाणावर दिसली. जाहिरातींमध्येही पाश्चात्यांचा मॉडेल म्हणून वापर केलाजातो. 

इतकी लोकसंख्या असलेले हा देश असल्यानी परिणामी मोठा ग्रहक वर्ग आहे. नफेखोर कंपन्यांना ह्या लोकांची नाडी सापडली आहे. मग ते म्हणतील तसं, तीच मूल्य श्रेष्ठ! “गोरेपणा हा श्रेष्ठ, काळा रंग म्हणजे उणीव”. लोकांना भुरळ पडण्याच, त्यांची सारा-सार विचार करण्याची बुद्धी बंद करण्याचं सामर्थ्य आकर्षक जाहिरातीत असतं. अगदी मूल्य परिवर्तन करण्याचं. एकूण ह्या कंपन्यांनी आपल्याला मानसिकदृष्ट्या आजारी, निर्बुद्ध बनवलच आहे. ते जसे खेळवणार तसे आपण खेळायचे. 

जागतिकीकरण म्हणा किंवा अमेरिकीकरण त्याचा मोठा प्रभाव भारतासारखाच सर्वत्र दिसला. मोठ्या शहरात जागोजागी मॅकडोनाल्डस, के.एफ.सी., स्टार बक्स- ची दुकाने दिसतात. आपल्यासारखीच त्यांचीही तरुण पिढी तिथे गर्दी करून असते. आपल्यासारखाच या कंपन्यांनी चीनी चवीला साजेसे बदल त्यांच्या उत्पादनात केलेत. या कंपन्यांच्या अत्यंत आकर्षक जाहिरातीचा भडीमार सार्वजनिक ठिकाणी, प्रसारमाध्यमांमध्ये होत असतो. स्वाभाविकपणे त्या लहानग्यांना, युवा पिढीला भुरळ पाडतात. 

चीनी युवा पिढी 

साधारणपणे १९८० नंतर जन्मलेली मुले ही आजची चीनी युवा पिढी. त्यांच्यात आणि त्यांच्या पूर्वीच्या १-२ पिढ्यांत खूप फरक दिसतो, जो स्वाभाविकही आहे. नवीन पिढी स्वकेंद्रतीत दिसते आहे. इंटरनेट, ब्लॉग्सच्या माध्यमातून व्यक्त होते आहे. याच माहितीजालाने माहितीचे भयंकर शस्त्र आता सामान्य नागरिकांना घर बसल्या मिळाले आहे. सावध चीनी राज्यकर्त्यांना ह बदल दिसतोय. एकूण माहितीजालावर येणाऱ्या माहितीवर बारीक लक्ष चीनी सरकार ठेवून आहे. चीनमध्ये फेसबुक, यु ट्यूब, ट्वीटर इत्यादी संकेतस्थळांवर बंदी आहे. 

या माहितीजाळाच्या पसाऱ्याची एक चुणूक म्हणजे हे एक उदाहरण. काही महिन्यापूर्वी जपानमध्ये जेव्हा त्सुनामी आली आणि त्यातून आण्विक प्रदूषण झाले तेव्हाचे... या प्रदूषणामुळे समुद्राचे पाणी आणि परिणामी मीठही आरोग्यास हानिकारक झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा बाजारात नव्याने जे मीठ येणार ते प्रदूषित, आरोग्यास हानिकारक असणार. अशा बातम्या ब्लॉग्सच्या माध्यमातून इतक्या झपाट्याने पसरल्या कि घाबरून लोकांनी मोठ्या प्रमाणात मिठाचा साठा करून ठेवला. परिणामी काही तासातच शांग-हाय आणि इतर अनेक शहरांच्या च्या बाजारातून मीठ नाहीसे झाले होते. 

एकूणच तरुण पिढी माहितीजाल, आधुनिक उपकरणे यांच्याच सहवासात राहत असावी असं वाटणारी दृश्य आजूबाजूला दिसली. आत्ता आत्तापर्यंत जगाशी फारसा संबंध न आलेले चीनी आता इतर देश, त्यातील परिस्थिती याबद्धल जाणून घेण्यास उत्सुक असावेत. मोठ्या शहरतील सार्वजनिक वाहतुकीच्या मेट्रो, बस यात तर सर्रास सगळी तरुण मूलं-मुली हातातल्या आधुनिक अशा मोबाईल, आय-पॅड वर अखंड काहीतरी शोधत किंवा खेळत असतात. ही तरुण मूलं-मुली आजूबाजूला पाहतच नाही. 

सध्या चीनी मुलींच्या आत्मकेंद्रिपणावर टीका सुरु आहे. (जणू काही मुले तशी नाहीतच ) एका टीव्ही वरील टॉक-शो मध्ये एका मुलीने, “ मी जन्मभर मोटारसायकलवर मागे बसून हसण्यापेक्षा फेरारी मध्ये बसून रडणे पसंद करीन ” असं विधान केलं होतं. श्रीमंतीची, भौतिक साधनंची ओळख ह्या देशालाही, ह्या पिढीला खरोखर गेल्या ३०-३५ वर्षातच झाली आहे. त्यामुळे आजच्या १९८० नंतरच्या पिढीला कमी कष्टात, फटाफट नवश्रीमंत होण्यात जास्त रस आहे. ही युवा पिढी स्वकेंद्रित, बिनधास्त, पाश्चात्यीकरण झाल्यासारखी, काहीशी हरवलेली वाटली. माओच्या चीन मधील ‘सांस्कृतिक क्रांतीने’ जे स्वत्व धुवून टाकलं, जी नवीन मुल्ये प्रस्थपित केली त्याची ही फळ म्हणायला हरकत नाही! चीनी सरकारला आता कळून चुकलाय कि जर युवा पिढीला वाचवायचे असेल, हे नवसांस्कृतिक आक्रमण आवरतं घ्यायचे असेल तर उपाय करायला हवेत.पण नेमका कोणता उपाय हा सरकारपुढील मोठा प्रश्न आहे .


स्वसंकृती जतन : सरकारपुढील महत्त्वाचे धोरण 

१९६० च्या दशकातील कडवी माओवादी सांस्कृतिक क्रांती ही एक मोठी चूक होती असं उघडपणे बुद्धिवंत बोलू लागलेत. चेअरमन माओच्या व्यक्तिगत आयुष्यावर, त्याने घेतलेल्या निर्णयांवर लोक टीकात्मक बोलू लागलेत. ही चीनमध्ये होऊ घातलेल्या परिवर्तनाची, सत्ताबदलाची नांदी आहे असे म्हणयला हरकत नाही. नुकताच झालेला बो शिलाय या उभरत्या नेत्याचा पाडाव हे सध्याच्या राजकारणातील कडव्या माओवादाच्या पुनरुत्थानाचा पराभव मानला जातो. कारण बो शिलाय ने छोंगछीग आर्थिक मॉडेल आणि लाल क्रांतीगीतांच्या प्रसारातून पुन्हा एकदा ६० च्या सांस्कृतिक क्रांतीच्या स्मृती जाग्या केल्या होत्या. 

स्वकेंद्रितता, चंगळवाद, बोकळलेला भ्रष्टाचार, नैतिक मुल्यांची घसरण याला उपाय म्हणून आता माओला नव्हे तर गौतम बुद्धाला एकदा आवाहन केल जात आहे. सरकारकडून बुद्ध मंदिर, बुद्धाची विचारसरणी यांचा प्रचार सुरु आहे. क्न्फुशस चे पुनरुज्जीवनसुद्धा अगदी रिती-रीवाजांसह केले जात आहे. पारंपारिक सण साजरे करणे, त्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे असो किंवा “छीपावो” ने सजलेली दुकाने असो (छीपावो म्हणजे चीनी स्त्रियांचा अंगालगत बसणारा पारंपारिक पोषाख.)! एकूणच स्वसंकृती जतन किंवा स्वसंकृती उत्खनन म्हणा, हे एक सरकारपुढील महत्त्वाचे धोरण दिसते आहे. 

वृद्धांचा देश आणि दुसरे मुल 

क्न्फुशसने कुटुंब पद्धतीवर खूप भर दिला होता. आज जसजसा चीन वृद्धांचा देश होऊ लागलाय तसतस क्न्फुशसप्रणीत कुटुंब पद्धती, मुलांची माता-पित्यांबद्दलची कर्तव्ये यांना आता सरकारी महत्त्व आलाय. दररोज वर्तमान पत्रात त्या संबंधी प्रबोधनपर रकाने देखील असतात. 

वृद्धांना पेन्शन, आरोग्याच्या सवलती, सार्वजनिक बसमधून प्रवास मोफत अशा योजनांमुळे सरकारी तिजोरीवर त्याचा ताण पडतो आहे. परिणामी, एक अपत्य धोरणही आता सैल केले आहे. जे दाम्पत्य आपल्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य आहे अशा दाम्पत्याला दुसरे मुल होऊ देण्यास आता परवानगी आहे. इतक्या लोकसंख्येमुळे जीवनावश्यक गरजांच्या, संसाधनांच्या पुरवठ्यावर अधिक ताण येत असला तरी सरकारला ही कसरत करावी लागते आहे असं दिसतंय. त्यातून मग अन्नधान्य सुरक्षिततेसारख्या समस्या निर्माण होत आहेत. 

अन्नधान्य सुरक्षितता 

आकडेवारीच्या भाषेत बोलायचे झाले तर जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारण २२ % लोक चीनी भूभागावर राहतात. तर चीनमधील फक्त १० % जमीन लागवडीयोग्य आहे. या पार्श्वभूमीवर, देशाच्या एकूण गरजेच्या सुमारे ९५% शेती उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवण्याचा विडा चीनने उचलला आहे. स्वाभाविकपणे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते, जनुक तंत्रज्ञान वापरून फळ-भाज्याचे उत्पादन केले जाते. परिणामी उत्पादनाचा दर्जा घसरला आहे. 

याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे कलिंगड स्फोट प्रकरण. कलिंगड लागवड करताना वापरलेल्या रासायनिक खताचं प्रमाण अधिक झाल्यामुळे ढिगाने कलिंगड फटाफट फुटून गेली. या प्रकरणामुळे लोकांनी भीतीने कित्येक दिवस कलिंगड घेणेच थांबविले होते. परिणामी बाजारातली कलिंगड अक्षरश मातीमोल झाली होती. 

येनकेनप्रकारेण पैसा मिळवायच्या वृत्तीमुळे खाद्यापदार्थांत भेसळीच्या समस्येने विक्राळ रूप धारण केले आहे. २००८ मध्ये लहान मुलांच्या दुध पावडरचे प्रकरण खूप गाजले होते. दुध पावडर मध्ये मेलामाईन हे प्लास्टिक भेसळ केल्यामुळे अनेक लहानग्यांना जीवाला मुकावे लागले, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले. हे प्रकरण इतके भयंकर होते की कधीही दुध पावडर न चाखलेल्या आमच्या १ वर्षाच्या मुलालाही अनेक शारीरिक चाचण्या, इंजेक्शन्सला सामोरे जावे लागले. आपल्यापैकी काहींना चीनमध्ये प्रयोगशाळेत अंडी कशी बनवतात ही इमेल आली असेलही. एकूणच चीनमध्ये राहताना अन्नधान्य सुरक्षितता ही काळजीची गोष्ट होती. तिथे दररोज काहीना काही गंभीर अन्नधान्य भेसळ प्रकरणे मोठ्या प्रमाणावर बाहेर येत आहेत. 

आयात कमीत कमी करायची, आंतरराष्ट्रीय बाजारात स्वतःच्या चलनाला मानाचे स्थान मिळवून द्यायचे असं ठरवल्यावर हे सगळं अपरिहार्य असाव का असा प्रश्न पडतो. 

आंतरराष्ट्रीय बाजारात चीनी चलनाचे स्थान 

आर.एम.बी. (Renmin Bi – people’s currency ) हे चीनी चलन पारंपारिक भाषेत ‘युआन’ किंवा ‘ख्वाय’ म्हणूनही ओळखले जाते. आजच्या तारखेनुसार डॉलरच्या तुलनेत चीनी चलन भारतीय चलनापेक्षा ८ पट ताकदीचे आहे. एका डॉलरसाठी आपल्याला साधारण ५५ रुपये मोजावे लागतात तर चीनी माणसाला ६ आर.एम.बी. तर एक चीनी आर.एम.बी. साठी भारतीयांना साधरण ९ रुपये मोजावे लागतात. कारण चीनमध्ये आयाती पेक्षा निर्यात जास्त आहे. त्यांचा जी.डी.पी.चा आकडाही वाढीच्या मार्गाने जाणारा आहे. शिवाय वाढती परदेशी गुंतवणूक आहेच या आणि अशाच कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यपेक्षा चीनी चलनाची पत वरचढ आहे. 

फेब्रुवारी २०१२ दरम्यान भारतात झालेल्या ‘ब्रिक्स परिषदे’त सदस्य राष्ट्रांनी (ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साउथ आफ्रिका) परस्परांतर्गत व्यापारासाठी डॉलर ऐवजी स्वतःच चलन वापरण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. हे पाचही देश म्हणजे आजच्या घडीला जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. जाणकार असं म्हणतात की काही वर्षातच चीनी जी.डी.पी.चा आकडा हा अमेरिकन जी.डी.पी.चाच्या पुढे जाणार आणि अमेरिकन डॉलरची जागतिक बाजारातील जागा चीनी युआन घेणार. अगोदरच, जगभरातील बहुतांशी सगळ्या देशाच्या बाजाराचा ताबा “मेड इन चायना” च्या वस्तूंनी घेतला आहेच. पण या सगळ्याबरोबर “वापरा आणि फेका” सारखी मूल्य सुद्धा चीन निर्यात करतो आहे असं वाटतं. 

वापरा आणि फेका 

गेल्या ५ वर्षात, चीनमध्ये कधीही, कोणीही हातरुमाल वापरताना दिसले नाही. त्या ऐवजी ते लोकं (स्रिया आणि पुरुषही) टीश्यु पेपर वापरतात. एकूणच सर्वत्र “ वापरा आणि फेका” हा दृष्टीकोन पाहायला मिळाला (वस्तूच्या बाबतीत आणि काहीवेळा माणसांच्या बाबतीतही). स्वस्त मालाचा, हलक्या गुणवत्तेच्या वस्तूंचा इतका सुळसुळाट आहे कि लोक एकदा स्वस्त वस्तू घेतात वापरतात आणि ती फेकून देतात. दुरुस्ती, पुनर्वापर वैगेरे प्रकार नाहीच. हे अगदी दैनंदिन वापराच्या वस्तूपासून ते इलेक्ट्रोनिक उपकरणांच्यापर्यंत सरसकट आढळले. याउलट आपण सर्वसामान्य भारतीय एकदा वस्तू घेतली की ती जास्तीत जास्त काळ वापरत राहतो, परत परत दुरुस्त करून वापरतो. 

खर तर, आज चीनी वस्तुंनी बाजार भरले आहेत, आपल्याला कितीही जपावे वाटले तरीही ! हलक्या दर्जाच्या वस्तू घेताना केवळ पर्याय नाही म्हणून आपण घेतो असं जाणवलं. कारण मुळातच भारतात ते इतके स्वस्त मिळतात मग दर्जाचा फार विचार न करता घेतो आपण. विशेषतः शोभेच्या वस्तू किंवा प्लास्टिकच्या बरण्या-डबे अशा वस्तू, खेळणी याबाबत हे जास्त दिसते. मुलं बाजारात गेल्यावर खेळण्यासाठी हट्टच करतात, मग १५० रुपयांचं चांगले खेळण घेण्याऐवजी २० रुपयांचं चीनी बनावटीच खेळण आपण घेऊन देतो. तात्पुरती का होईना आपण खूष, मुल खूष. एकतर वेळ निभावून जाते आणि पैसे कमी लागतात. पण एकूण वापरा आणि फेका हे मूल्य आपल्यालाही स्वीकारावं लागलाय हे खरं आहे. 

या वरून “१२७ अवर्स” हया सत्य कथेवर आधारित सिनेमाची आठवण झाली. या सिनेमातील मुख्य कलाकार घळी मध्ये अडकून पडलेला असतो. सुटका करण्यासाठी स्वतःच्या जवळील सर्व हत्यारे तो वापरून बघतो. त्याच्याकडे एक चाकू असतो. त्या चाकूने तो दोरी कापण्याचा प्रयत्न करतो. पण फसतो. तेव्हा तो म्हणतो, “ डोन्ट बाय द चीप, मेड इन चायना मल्टी टूल. आय ट्राइड टू फाईंड माय स्वीस आर्मी नाईफ, बट...धिस थिंग केम फ्री विथ अ पलॅश लाईट. पलॅश लाईट वॉज अ पीस ऑफ शीट टू!!” एकूण काय तर, “वापरा आणि फेका” हे जगालाच स्वीकारावं लागलय आणि त्याला चीन आणि आपणही जबाबदार आहोतच. 

भारत आणि चीन या दोन्ही अतिप्राचीन सभ्यता, संस्कृती. सांस्कृतिक, आर्थिक, वैचारिक देवाणघेवाणीचा प्राचीन इतिहास असलेली ही दोन महान राष्ट्रे. दोन्हीच्या इतिहासात डोकावले तर अनेक साम्यस्थळे सापडतात. चीन आणि भारताच्या तथाकथित प्रगतीचा आढावा घेतला तर काय चित्र दिसते ? 

चीन, जागतिक महासत्ता होऊ पाहणारा किंबहुना झालेला देश. ज्याची स्पर्धा अमेरिकेशी आहे आणि ज्याच्याबद्धल जगभर उत्सुकता, कुतूहल आहे. भारत, ज्याला जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून संबोधले जाते. ज्याच्याबद्धल सुद्धा जगभर उत्सुकता, कुतूहल आहेच. 

चीन आणि आपल्यात फरक वाटला तो मानसिकतेचा. चीनी मानसिकता भावनांपेक्षा तर्काला महत्त्व देते. तसाच त्यांचा आचार-विचार आहे. व्यवहाराचा विचार येतो तेव्हा चीनी भावना बाजूला ठेवतात. नागरिकांच्या व्यक्तीगत हक्कांपेक्षा पार्टीने ठरवलीले राष्ट्रहित मोठे हे चीनचे धोरण आहे. चीनने जी काही तथाकथित प्रगती केली आहे त्यामागे कायद्याचा वचक, दहशद, शिस्त, प्रसंगी मानवी हक्कांची पायमल्ली आहे. 

भारताच्या प्रगतीला अधिक टिकाऊ मानणे हे आजकाल प्रचलित आहे. पण पक्षीय मतमतांतराच्या गलबल्यात आणि एकमेकांवर कुरघोडी करू पाहणाऱ्या दबावगतांच्या राजकारणात मुख्य प्रगतीची वाट बऱ्याचदा हरवल्यासारखी वाटते. 

चीनी आणि भारतीय जनतेने स्वतःच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या राजकीय, आर्थिक वाटा निवडल्या आहेत. त्यांचे आपापले गुण-दोष आहेत.प्रसंगी दोन्ही देशांना कुम्पणपलीकडचे गवत अधिक हिरवे वाटते. म्हणूनच या दोन खंडप्राय पौर्वात्य शेजारी देशातील घडामोडींचा, वाटचालीचा अभ्यास अत्यंत रंजक आहे. 


गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१२

हातावरची भाकरी


काल रात्री पडल्यापडल्या दुर्गा भागवतांचं "दुपानी" वाचत होते. 
ह्या पुस्तकाच स्वरूप एखाद्या blog सारखच आहे.


यात दुर्गा बाईनी "अचानकातला लाभ " यात मानिनी सिनेमातील अरे संसार संसार या गाण्यातील दृश्यांबद्धल लिहिलंय. मुख्यत्वे, रत्नमाला या अभिनेत्री चुलीजवळ बसून भाकरी करते आहे याबद्धल खूपच छान लिहिलंय. विचार करायला लावणार आहे.  कुतूहल म्हणून ते गाणे you tube वर शोधले. ते सापडले. त्यातील "अरे संसार संसार दोन जीवांचा विचार " या ओळी विशेष भावल्या :-)) 

गाण्याची लिंक ...






शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२

गोष्ट हुआंग दी ची


ही गोष्ट आहे चीनच्या इतिहासपूर्व काळातील.  चीनच्या शैशवातील, बाल्यावस्थेतील. 

आपल्यासारखीच चीनमध्ये सुद्धा पितृसत्ताक समाजव्यवस्था होती. ह्या व्यवस्थेतील आदिम जमातींचे हे प्रमुख, म्होरक्या, म्हणजेच सम्राट. चीनच्या इतिहासपूर्व काळात पाच सम्राट विशेष प्रसिद्ध होते. या पाच सम्राटाशिवाय अनेक छोट्यामोठ्या टोळ्या सुद्धा चीनभर होत्या. ते   पाच सम्राट म्हणजे चुआन त्सुई, दिखू, याव, श्वन आणि  कथानायक, हुआंग  दी.   

चीनी भाषेत हुआंग म्हणजे पीत किंवा पिवळा.  (चीनी लोकांना पीतवर्णी म्हणून ओळखले जाते !  आणि चीनची प्रमुख नदी सुद्धा  "हुआंग ह " म्हणजेच   "पीत नदी" !  ) आणि  दी म्हणजे देव किंवा सम्राट. जन्मजात बुद्धिवान असलेला हुआंग  दी मोठा झाल्यावर त्याच्या जमातीचा प्रमुख म्हणून निवडला गेला. आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना कायम मदतीस तत्पर असा त्याचा स्वभाव होता म्हणे. शूर  हुआंग  दी ने यांदी नावाच्या जमातीचा पराभव केला आणि हि यांदीची जमात त्याच्या अधिपत्याखाली आली. हि नवीन जमात आता "यान-हुआंग" जमात म्हणून ओळखली जाऊ लागली. हुआंग दी त्याचा प्रमुख झाला.  त्याने यांदीला आपला सहाय्यक म्हणून नेमले. असं म्हणतात, आज अस्तित्वात असणाऱ्या चीन राष्ट्राच बीजारोपण ह्याच "यान-हुआंग" संकरात झाले.  चीनी लोक स्वतःला " हुआंग दी आणि यान दी चे वंशज म्हणवतात !  

ह्या हुआंग आणि यान जमाती एकत्र झाल्या पण त्यांची संकट काही संपली नाहीत. त्यांच्या ताब्यातील भूप्रदेशाच्या दक्षिणेकडून एका जमातीने त्यांच्या वर हल्ला करण्याची योजना आखली. ह्या जमातीचा प्रमुख म्हणे फार उद्धाम होता. पूर्वी एकट्या असणाऱ्या यांदीचा त्याने पराभव केला होता.  त्यामुळे त्याला वाटले की ह्या यान-हुआंग टोळ्या माझ्यापुढे "कीस झाड कि पत्ती !" 

अस म्हणतात की,  हा टोळीप्रमुख (छौ)अत्यंत अक्राळ-विक्राळ, सामर्थ्यवान होता. त्याला ८१ भाऊ होते. त्यांना मानवी डोकी आणि प्राण्यांची शरीरे होती. प्रत्येकजण अष्टभूज होता. लोहासम कठीण असं त्यांचा भालप्रदेश होता. रंगीबेरंगी मुखवटे धरण करणारे हे बंधू माती आणि दगड सुद्धा खाऊन फस्त करत ! असली महाभयंकर टोळी चालून येणार ही बातमी कळताच या हुआंग आणि यान टोळ्यानी जय्यत तयारी सुरु केली. दगड कोरून त्यापासून धारदार कुर्हाडी, चाकू अशी शस्त्रास्त्रे मोठय प्रमाणावर तयार केली. आणि त्याला तोडीस तोड असं सैन्य आणि सैन्याला प्रशिक्षणही. इतकच नव्हे तर अत्यंत शास्त्रीय, सूक्ष्म अशी व्यूहरचनाही तयार केली. 

ह्या दोन जमातीत एक घनघोर लढाई झाली. त्याला तोंड फुटले ते  "हुआंग ह- पीत नदीच्या उत्तरेला. (आजच्या चीनच्या उत्तर-पूर्व दिशेला) "सर्व नद्यांना बांध घाला, त्या अडवा." अशी सूचना   हुआंग  दी ने आपल्या सेनापतीस दिली. जेणेकरून चालून आलेले सैन्य प्रचंड हुआंग ह च्या पात्रातच बुडून अखेरचा श्वास घेईल. 

प्रत्यक्षात मात्र तसं होऊ शकल नाही. कारण म्हणे पवन देव आणि पर्जन्य देवतेची खास मर्जी ह्या चालून  येणाऱ्या टोळी प्रमुखावर होती.  त्यांनीच   भयंकर वादळ आणि पाऊस पाडून यान-हुआंग दी च्या सैन्याची दाणादाण उडवली. यान-हुआंग दी ने हान बाव नदीला साकड घातले. प्रत्युत्तरादाखल तिने रणरणत्या उन्हाच अस्त्र वापरले. आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 

पहिल्याच टप्प्यात नामुष्की झालेल्या आक्रमणकारी टोळीला त्याची सर्व अस्त्र, शक्ती  वापरायला भाग पडल. जादूटोण्याचा वापर करून त्याने गडद धुके निर्माण केले. जे म्हणे तीन दिवस, तीन रात्र होते. परिणामी, यान-हुआंग च सैन्य आपल्या दिशा धुक्यात हरवून बसले. शत्रूसैन्या दृष्टीपथात येणे अशक्य वाटल्यावर हुआंग  दी ने सैन्याला आपापसात एकत्र राहण्याची सूचना दिली. त्याने सेनापतीस आदेश दिला कि, एक दिशादर्शक रथ तयार करण्यात यावा. जेणेकरून धुक्यातही दिशा ज्ञान होईल. सेनापतीने रथ तयार केला. ह्या रथाच्या मदतीने शत्रूच्या मुख्यालयावरच हल्लाबोल झाले.

त्यावेळी हे शत्रूसैन्या आपल्या मुख्यालयात आनंदोत्सवात मग्न होते. यान-हुआंग च सैन्य धुक्यातच हरवले आणि मी विजयी झालो अशा भ्रमात ते होते. या अनपेक्षित आक्रमणामुळे ते पुरते गोंधळून गेले. यान-हुआंग ने त्यांच्या प्रमुखास बंदी बनविले. ह्या अभूतपूर्व लढाई नंतर यान-हुआंग आणि हा छौ ह्या तिन्ही जमाती एकत्र झाल्या. जणू हळूहळू विस्तारत जाणाऱ्या चीनची ही  नांदीच होती.

तृप्ती

बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१२

Ukadiche Modak and Samosa in Dumpling Planet


Context: Dumpling Planet is an International Recipe Cookbook published in Shanghai. 

This cookbook was a charity project by the Consular Spouses of Shanghai and Shanghai Women's Federation.

I had an opportunity to work as Vice-President of the organisation. And most importantly to share Indian dumplings recipes with the world. I shared the recipe of Samosa and the Ukadiche Modak. 

It was sheer pleasure to work as VP and to share my cuisine. 

This is video clip of the news coverage on Marathi News Channel SAAM Marathi.   :-)




गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१२

“काठ बदलल्यावर "

चीनच्या काठावर बसून,
भारत जसा माझ्यापर्यंत पोहोचत होता, 
दिसत होता, भासत होता, 
तो आता भारताच्या काठावरून बघताना, 
त्रासदायक वाटतो आहे, 
झळा पोहोचत आहेत, 
भारताबाहेर असताना त्या दूर होत्या, 
इथे पावलो पावली, 
जगण्याचा संघर्ष जाणवतोय, 
नकारात्मकता माझ्यावर, 
आक्रमण करते आहे, 
असही काहीस वाटतंय,
फार त्रास होतोय, 
आजूबाजूची एकंदर परिस्थिती पाहून, वाचून.
वेळ लागतोय बदल स्वीकारायला,
स्वाभाविक आहे, 
उत्तर शोधण्याचा, समानधर्मी शोधण्याचा, 
मन प्रयत्न करतयं 
- तृप्ती 

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

बुटक्यांच्या देशात सगळे उंच...उंच.

इथे सध्या उन्हाळा सुरु आहे. शाळांना सुट्ट्या आहेत. आणि चीनी पालक, मुलांना कुठे न कुठेतरी गुंतवून ठेवत आहेत. त्यापैकी एक activity म्हणजे मुलाची उंची वाढावी म्हणून करवून घेतलेले व्यायाम, मैदानी खेळ. आपले मुल आपल्यापेक्षा उंच असावं अशी चीनी पालकांची स्वाभाविक अपेक्षा. 

7 फूट 6 इंच उंची असलेला प्रसिद्ध चीनी बास्केटबॉल पटू याव मिंग हा एक त्यांचा आदर्श, role -model . बास्केटबॉल सारख्या खेळणे उंची वाढते. कारण बास्केट मध्ये बॉल टाकण्यासाठी हाताने (stretching) प्रयत्न करण्याबरोबर उड्याही माराव्या लागतात. आणि पायाच्या हाडांच्या उंचीवरच बहुतांशी उंची ठरत असते. व्यायामाने या हाडांवर ताण येतो त्यामुळे वाढीचे हार्मोन्स स्त्रवू लागतात, हाडातील कॅल्शिम च्या चयापचयाला वेग येतो. आणि ती वाढतात. म्हणूनच उंच उड्या मारणे, लटकण्याचे व्यायाम, चौड्यावर उभं राहून हात आकाशाच्या दिशेने ताणून चालणे असेही व्यायाम उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पालक मुलांकडून करून घेतायत. 

चीनी आणि त्यांचा physical appearance आणि एकूणच सगळ्या जगाला सगळ्या क्षेत्रात मागे टाकण्यासाठी त्याचे जे अथक प्रयत्न दिसतात ते पाहून थक्क व्हायला होतं . एकीकडे ऑलिम्पिक सारख्या जागतिक पातळीवर त्याचं यश दिसतच आहे. तर दुसरीकडे इथे त्याची ground level वर, सामान्य चीनी लोकांच्या दैनंदिन जीवनात सुद्धा झपाटलेपणाची झलक दिसते आहे. "चीनी म्हणजे बुटके" हा आता इतिहास झालाय हे काही नव्याने सांगायला नको. अगदी ताजे उदाहरण म्हणजे लंडन ऑलिम्पिक मध्ये चीनी खेळाडूंनी मिळवलेली पदके . 

व्यक्तीची शारीरिक उंची ठरवणारे घटक म्हणजे अनुवांशिकता, आहार, व्यायाम, भोवतालचं वातावरण आणि पुरेशी झोप. अनुवांशिकता हा मुख्य घटक. पण आहार-विहाराच्या जोडीने बहुतांश प्रमाणात यावर मात करता येऊ शकते हे चीनी लोकांनी सिद्ध करून दाखवलंय. आहाराचा विचार करता मुबलक प्रमाणात कॅल्शियम असलेले दुध, कबुतर, मउ पाठ असलेले कासव इत्यादीचा मुलांच्या आहारात जाणीवपूर्वक समावेश केला जातो. Traditional Chinese Medicine नुसार उन्हाळ्यात " यांग" म्हणजे उष्ण उर्जेचं वातावरणात वर्चस्व असतं , ती जोमात कार्यरत असते. ही यांग उर्जा वाढ, स्नायुंची ताकद यांच्याशी निगडीत असते. परिणामी हाडांची वाढ उन्हाळ्यात अधिक होते आणि उन्हाळ्यात उंची वाढते. TCM च्या मते, चांगल्या हाडांसाठी हाड खाल्ली पाहिजेत. चांगल्या यकृतासाठी चांगलं यकृत खाल्लं पाहिजे. हे TCM चं तर्कशास्त्र मला तरी जरा अचाट वाटलं एकूण काय तर मुलांची हाड चांगली होण्यासाठी चीनी आया बराच काल उकळवले हाडांचे सूप आपल्या मुलांना खायला घालतात.सगळे उपाय थकल्यावर वाढीच्या हार्मोन्स ची injections याच्याकडे एक पर्याय म्हणून पालक पाहू लागलेत. गाढ झोपेमध्ये वाढीचे हार्मोन्स स्त्रवू लागतात त्यामुळे व्यायामाच्या जोडीला पुरेशी झोप हि आवश्यक मानली जाते. 

उंच होण्यासाठी काही मजेशीर समजुती (?) पण चीनी लोकांमध्ये आहेत. जसं तांदुळापेक्षा पेक्षा गहू खाल्ला तर उंची वाढायला मदत होते. कशावरून तर, चीनच्या उत्तरेकडील प्रांतातील लोक दक्षिणेकडील लोकांपेक्षा अधिक उंच आहेत. आणि त्यांच्या आहारात गहू हा मुख्य घटक असतो म्हणून !:-) 

एकूणच आजूबाजूला हे पाहिल्यावर पटतं, चीन म्हणजे झपाटलेला देश आहे.... मर्यादा ओलांडण्याच वेड लागलेला.....

मंगळवार, १७ जुलै, २०१२

परत, असचं काहीतरी .......


माझं आवरावारीच सत्र अजून सुरूच आहे. कुठे कुठे काय काय सापडतंय. साठवून ठेवलेलं. जीव अडकवून ठेवलेलं.

अर्हन झाल्यापासूनचे त्याचे कपडे. आता त्याला न होणारे.

खराब झालेले टाकून देणे, अजून चांगले असलेले कुणाला तरी देण्यासाठी बाजूला ठेवणे असं classification सुरु आहे. त्याचे आता वापरत नसलेले 2 पंचे, towel एकीकडे ठेवलेत. कळत नाहीए कोणत्या catagory त टाकू. पडलेत बापडे टेबलावर माझी वाट बघत आता ही बाई आपल्याला कुठे टाकते असा विचार करत !

तर हे 2 पंचे. Actually, माझ्या cotton च्या ड्रेसच्या मोठ्या ओढण्या खास शिउन केलेले. अंग पुसायला काहीतरी मऊ कापड असावं म्हणून. ते ड्रेसही माझे आवडते होते. हे पंचे त्याच्या अगदी जन्मापासून ते तो 2 वर्षाचा होईपर्यंत वापरलेत. आता त्यांचे काय कराव हा प्रश्न आहे. फेकून द्यायला जीव होत नाही आणि कुणाला देण्यासारखे तर नाहीत.


काय attachment आहे ना ! गम्मतच आहे. का एवढा विचार करावा लागतोय इतक्या छोट्या कापडाचा ?

Hmm...




त्या कापडाबरोबर सगळ्या सुखद आठवणी आहेत.... त्याला स्पर्श आहेत ओल्या अंगाचे.....गंध आहे बाल्याचा...... ओल्या अंगाला उब देणारा हा साधारण 1.5 मीटर चा कपड्याचा तुकडा. उगाचच जीव गुंतवून ठेवतोय ! असा टाकवतच नाहीये. 

Kitchen मध्ये वापरेन त्यांना.

कशाकशात जीव गुंततो....अवघडच असतं, असं पटकन तो सोडवणं....वेळच लागतो...हळूहळू ....

.............................................................................

ता. क :-  ही post facebook friends नी वाचून बऱ्याच comments dilya. विशेषतः, प्रवीणदाच्या 'गोधडी' या शब्दाने  आणि " Treasure "  ह्या विश्वास सरांच्या comment मुळे. मग काय,  त्यांनी अजून विचार करायला भाग पाडलं. विचारचक्र नेहमीप्रमाणे जोरात फिरू लागलं. साप्ताहिक  सकाळचा एक जुना  "बालसंगोपन" विशेषांक आहे माझ्याकडे. त्यात या विषयी एक लेख वाचल्याचं आठवलं. तो मीना चंदावरकर यांचा " सुखद स्मृतींचे अनुभव " हा लेख परत एकदा वाचला. आणि  " भावनिक गुंतवणुक " म्हणून ते 2  पंचे पुन्हा कपाटात विराजमान झालेत . 

 तरी अजून काय-काय, किती काळ आणि कशासाठी साठवून ठेवू असा प्रश्न आहेच. :-). कारण  असं  करून आपण  अजून  अडकत जातोय का असाही प्रश्न पडतो .  

बुधवार, ११ जुलै, २०१२

असंच काहीतरी...

आवरा-आवर करताना जुनी diary सापडली. जरा चाळली. ही पान वाचली.  share करायला हरकत नाही अस वाटलं म्हणून इथे post करते आहे. 



तारीख:- ३ जून २००८. 

लिहायला घेतलंय तर खर. पण माहिती नाही, खात्री नाही की  किती वेळ मिळेल लिहायला ! सुरुवात झाली हेही नसे थोडके !

हे लिहिण्यातून काय होईल ? मला समाधान मिळेल. ही विस्तृत diary आहे. स्वतःसाठी.... स्वतःला समजण्यासाठी... 

कदाचित, अजून कुणाला तरी माझ्या अनुभवातून फायदाही होईल. विषय आहे की,  मी आई झाल्यामुळे आयुष्यात झालेला मोठा बदल. 

हे सगळ खूप व्यक्तिगत आहे. व्यक्तीसापेक्ष आहे. जे routine सध्या सुरु आहे. त्याबद्धल प्रश्न, काळजी आहे. जोपर्यंत ती आतून असते तोपर्यंत ठीक असते. पण जेव्हा इतर कोणामुळ हे शांत पाणी सैरभैर होत तेव्हा प्रवाहाची गतीच बदलते. 

स्थितप्रज्ञता ! किती आवश्यक आहे हे तेव्हा कळते. निंदकाचे घर असावे शेजारी. शाळेत शिकलेला सुविचार प्रत्यक्षात अंमलबजवणी करताना फार जड जातोय झेपायला. एकूण काय तर, स्वतःवर, स्वःताच्या निर्णयांवर, शक्तींवर, भविष्यावर विश्वास हवा. "नमनाला घडाभर तेल" झालंय. आता सुरुवात करतेच. 

सध्या प्रश्न आहे तो स्वतःसाठी मिळणाऱ्या वेळेचा. स्वतःच्या space चा ! अर्हन आता वर्षाचा होईल. आता असं वाटायला लागलंय की मला without disturbance वेळ मिळायला हवा. तसा थोडाफार मिळतो. तो मी वर्तमानपत्र वाचन, e-mails , social networking , diary लिहिणे यासाठी वापरते. खूप त्रास कधी होतो ?
 " बाकी तू काय करतेस? " या (खोचक ?) प्रश्नानंतर !

 मला वाटतं की  ही संभ्रमावस्था, चिडचिड ...माझ्यासारख्या अनेक आयांची होत असणार. विशेषतः परदेशात, without any support मुलं वाढवणाऱ्यांची. म्हणजे परिस्थिती व्यक्तिगत असली तरी त्यातून होणारी भावनांची आंदोलनं खूपच सामायिक, common असणार. 

आजतरी माझ्या आजूबाजूला अनेक आया दिसतात. अशीच लहान मुले असणाऱ्या, नोकरी करणाऱ्या आणि पूर्ण वेळ मुलांकडे पाहणाऱ्या किंवा घरातून काम करणाऱ्या. प्रत्येक जण मानसिक, भावनिक चढ-उतार अनुभवत आहे. त्यात मुलं घडवण्यातील, वाढवण्यातील आनंद आहेच. पण संभ्रमही आहेच. आपण काय करत आहोत याबद्धल. I

जे आपल्याकडे आहे त्यापेक्षा जे नाही त्याकडे पाहिल्यामुळे तर कित्येकदा "इतर प्रभावा" मुळे स्वतःच्या निर्णयाबद्धल साशंकता निर्माण होते. खर तर आई झालेली प्रत्येक  स्त्री यातून गेलेली असते. तरी मग या बायका असं का वागतात ? हा प्रश्न तर पडतोच. " मुलांना वाढवणं, बाल संगोपन "  हे जिव्हाळ्याचे विषय, " स्वतःच मुल असावं " ही बहुतेक प्रत्येकीला असणारी आंतरिक इच्छा. जरी DINK चा ट्रेंड असला तरी !

अर्हन उठला have to go :-)